Saturday 21 January 2023

नदीचे प्रदूषण निश्चितपणे आटोक्यात आणणे शक्य: जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह. मंचावर (डावीकडून) राज डोंगळे, अजय कोराणे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. एस.एन. सपली.

कोल्हापूर, दि. २१ जानेवारी: नद्यांना पूर येण्यामागे अनेक नैसर्गिक व कृत्रिम कारणे आहेत. तो नियंत्रित आणण्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल. तथापि, प्रदूषणाच्या अनुषंगाने विविध कृती कार्यक्रम राबवून ते एक ते तीन वर्षांत निश्चितपणाने आटोक्यात आणता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंचगंगा- पूर आणि प्रदूषण या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात बोलताना डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, नदीला आई मानण्याची आपली परंपरा आहे. मात्र, आपण जेव्हा या आईपासून कमाईचा स्वार्थी विचार करू लागलो, तेव्हापासून आपण तिच्या शोषणाला कारण झालेलो आहोत. नदीचा तिच्या क्षेत्रावर पूर्ण अधिकार असतो. पण, आपण तो मान्य करीत नाही. नदी तिच्या निर्मलतेसह वाहात राहते, म्हणून तर तिला आपण नदी म्हणतो. आपल्याला संविधानाने जो जगण्याचा, स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान केलेला आहे, तितकेच आपण नदीचे वाहण्याचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे.

महाराष्ट्रात राबविलेल्या चला, नदीला जाणून घेऊ या, या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभल्याचे सांगून डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, या उपक्रमात सुरवातीला ७५ नद्या घेतल्या होत्या. ही संख्या १०८ पर्यंत गेली. त्यातून राज्यातील अनेक नद्या अत्यवस्थ असल्याचे वास्तव सामोरे आले. पंचगंगा त्यापैकी एक आहे. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत नद्या प्रदूषित न होऊ देण्याची जबाबदारी सज्जन साधुसंतांनी घेतली होती. आता मात्र विद्येच्या क्षेत्राने त्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. महापूर रोखण्यासाठी पावसाच्या अगदी पहिल्या थेंबापासून प्रयत्न करावे लागतील. ते वेळखाऊ आहे. मात्र, प्रदूषण मात्र आपण आपल्या काही वाईट सवयींना आळा घालून रोखू शकतो.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, प्रदूषण हे मानवनिर्मित असल्याने ते रोखणे शक्य आहे. डॉ. सिंह यांनी विद्यापीठाने या कामी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने तीन टप्प्यांवर काम करता येईल. पहिला म्हणजे विद्यापीठात या अनुषंगाने झालेले सर्व संशोधन व अभ्यास यांची नोंद करणे, दुसऱ्या टप्प्यात त्या सामग्रीचे विश्लेषण करणे आणि तिसऱा टप्पा हा निष्कर्षाचा असेल. एकूणात या प्रकल्पाच्या निदानाचे कार्य सर्वंकष पद्धतीने साकार होईल. संशोधक विद्यार्थ्यांनीही सामाजिक व पर्यावरणीय प्रश्न घेऊन तदअनुषंगिक प्रकल्प हाती घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी उपरोल्लेखित त्रिस्तरीय समितींच्या अनुषंगाने कुलगुरू डॉ. शिर्के यांनी संशोधन संकलनासाठी पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आसावरी जाधव, सामग्री विश्लेषणासाठी तंत्रज्ञान अधिविभागातील डॉ. पी.डी. पाटील आणि निष्कर्ष समितीमध्ये डॉ. जी.एस. कुलकर्णी, डॉ. सचिन पन्हाळकर आणि डॉ. प्रकाश राऊत यांची नावे जाहीर केली.

यावेळी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, आर्किटेक्ट असोसिएशनचे सचिव राज डोंगळे उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. एस.एन. सपली यांनी आभार मानले.

सामंजस्य कराराचे डॉ. राजेंद्र सिंह साक्षीदार

यावेळी शिवाजी विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनिअर्स यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ, ज्ञान आणि तंत्रज्ञान निर्मिती करणे, विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देणे आणि विविध परिषदा, कार्यशाळा आदींच्या आयोजनातून ज्ञानप्रसार करणे असा या कराराचा हेतू आहे. या करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. शिंदे यांनी तर संघटनेच्या वतीने श्री. कोराणे यांनी स्वाक्षरी केल्या. करारावर साक्षीदार म्हणून डॉ. राजेंद्र सिंह यांनी स्वाक्षरी केली. याचा संदर्भ देऊन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पुढच्या खेपी डॉ. सिंह हे आपल्याला या कराराचे फलित विचारणार आहेत, हे लक्षात घेऊन उद्यापासूनच त्या दृष्टीने कामाला सुरवात करावी, असे सूचित केले.

No comments:

Post a Comment