Monday 23 January 2023

आंतरविद्यापीठ स्पर्धांत पारंपरिक कुस्तीचाही समावेश करावा: श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

 शिवाजी विद्यापीठात अखिल भारतीय कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन रोपट्यास पाणी घालून करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज. सोबत (डावीकडून) डॉ. शरद बनसोडे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. प्रकाश गायकवाड.


शिवाजी विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात रोपट्यास पाणी घालताना हिंदकेसरी दीनानाथ सिंह. सोबत (डावीकडून) डॉ. शरद बनसोडे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश गायकवाड.

शिवाजी विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेतील उद्घाटनाची कुस्ती लावताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज. सोबत (डावीकडून) डॉ. रामचंद्र पवार, डॉ. शरद बनसोडे, डॉ. सुरेशकुमार मलिक, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, दिलीप पवार, डॉ. प्रकाश गायकवाड आदी.



शिवाजी विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज. सोबत (डावीकडून) डॉ. शरद बनसोडे, एआययूचे निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसिचव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड.


कोल्हापूर, दि. २३ जानेवारी: अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावरील स्पर्धांत मॅटवरील कुस्तीच्या बरोबरीने पारंपरिक मातीतील कुस्तीचाही समावेश करावा, अशी सूचना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केली.

शिवाजी विद्यापीठात आज अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती (पुरूष) स्पर्धांचा उद्घाटन समारंभ आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रोत्साहनामुळेच कुस्तीचा देशभरात प्रसार झाला. जागतिक कीर्तीचे नामवंत मल्ल कोल्हापूरच्या या मातीमध्ये घडले. त्याचप्रमाणे देशभरातील मल्लांसाठी ही कुस्तीची प्रेरणाभूमी ठरली. तालमीतील सराव, मातीतील कुस्ती आजही या भूमीत जपली जाते. मात्र, सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्ती खेळविली जाते आहे. बदलत्या काळानुसार हे ठीक असले तरी पारंपरिक कुस्ती जपण्याची जबाबदारीही आपण उचलली पाहिजे. त्यासाठी भारतीय विद्यापीठ महासंघाने त्यांच्या क्रीडा कार्यक्रमात पारंपरिक कुस्तीचा समावेश करावा, यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदकेसरी दीनानाथ सिंह म्हणाले, कुस्तीच्या नभांगणातील सारे तारे जणू काही शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उतरल्याचा भास होतो आहे. आमचा काळ हा शाळेऐवजी तालमीत जाण्याचा होता. आता मात्र शिक्षण आणि कुस्ती एकत्रितपणे साध्य होते आहे. आता खेळ विद्यार्थ्याला नोकरीपासून सर्व काही मिळवून देण्यास सक्षम आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी दर्जेदार खेळ आणि जीवन या दोहोंची तितक्याच उत्तम पद्धतीने सांगड घालून या क्षेत्राची सेवा करावी, असे आवाहन केले.

यावेळी एआययूचे निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक यांनी शिवाजी विद्यापीठात सन २००७मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची आठवण जागविली. त्यावेळी स्पर्धा पारदर्शकतेने कशी घ्यावी, याचा मानदंड या विद्यापीठाने प्रस्थापित केला. यंदाही त्याच धर्तीवर पारदर्शकपणाने स्पर्धा पार पाडल्या जातील, याची ग्वाही त्यांनी दिली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी श्रीमंत शाहू महाराज यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसादादाखल भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक यांना पारंपरिक कुस्तीचा एआययूच्या क्रीडा स्पर्धांत समावेश करण्याबाबत विचार करण्याची विनंती केली. शिवाजी विद्यापीठाच्या दर्जेदार क्रीडा परंपरेचा आढावा घेतानाच विद्यापीठाला लौकिक मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

यावेळी कुस्तीच्या क्षेत्रातील दिग्गज असणाऱ्या महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उत्तमराव पाटील, हिंदकेसरी विनोद चौगुले, बाबासाहेब शिरगावकर, रंगराव हर्णे, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, साईचे प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण, उप-महाराष्ट्र केसरी अशोक माने, संभाजी वरुटे, राम सारंग, अक्षय डेळेकर, बंकट यादव, नवनाथ ढमाल, रोहिदास कांबळे, संभाजी पाटील आणि दिलीप पवार यांचा श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.

उद्घाटन समारंभानंतर विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकपरंपरा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यामध्ये लोकसंगीत आणि लोकगीतांचे बहारदार सादरीकरण केले. त्यानंतर पराईपट्टम या दुर्मिळ होत चाललेल्या लोकनृत्याचे सादरीकरणही केले.

क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रकाश कांबळे आणि डॉ. अभिजीत वणिरे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

शाहू महाराजांच्या हस्ते उद्घाटनाची कुस्ती

उद्घाटन समारंभामध्ये आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा मल्ल साहील आर. आणि कुरूक्षेत्र विद्यापीठाचा मल्ल आशिष जगपाल यांच्यात ९७ किलो वजनी गटातील कुस्ती लावण्यात आली. हा सामना आशिष याने १२-०२ असा गुणांवर जिंकला.

दुसऱ्या दिवशी चार वजनी गटांत रंगले ४६२ सामने

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती (पुरूष) स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी चार विविध वजनी गटांचे मिळून एकूण ४६२ सामने रंगले. आज दिवसभरात ६१ किलो (१२१ सामने), ७० किलो (१३३ सामने), ७९ किलो (१२० सामने) आणि ९७ किलो (८८ सामने) असे सामने झाले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून सुरू झालेले हे सामने उद्घाटन समारंभापुरते स्थगित होऊन पुन्हा रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

No comments:

Post a Comment