Tuesday 10 January 2023

जैवरेणूंपासून नॅनो-धातूकण बनविण्याची नवी पद्धती विकसित

कर्करोगावरील उपचारांत उपयुक्त; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनास राष्ट्रीय पेटंट प्राप्त

 

सोने व पॅलेडियमची मेटल नॅनो-पार्टीकल्स



डॉ. किरण पवार

मेघा देसाई



कोल्हापूर, दि. १० जानेवारी: फौंड्रीच्या सांडपाण्यामध्ये आढळणाऱ्या जिवाणूंच्या जैवरेणूंपासून नॅनो मेटल पार्टीकल्स (नॅनो-धातूकण) बनविण्याची सुलभ व अल्पखर्चिक पद्धती विकसित करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांना यश आले आहे. या संशोधनास नुकतेच भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे.

विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स बायोटेक्नॉलॉजी येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण दगडू पवार आणि विद्यार्थिनी संशोधक मेघा प्रकाश देसाई यांनी सदरचे संशोधन केले आहे. नॅनो-बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील हे एक महत्त्वपूर्ण संशोधन असून वैद्यकशास्त्र, पर्यावरण, बायोसेन्सिंग आदी क्षेत्रांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

डॉ. पवार देसाई यांनी नॅनो-धातूकण (मेटल नॅनोपार्टीकल) तयार करण्यासाठी उपयोगी असणाऱ्या जिवाणूपासून बायोमॉलेक्यूल (जैवरेणू) मिश्रण तयार करण्याची नवीन पद्धत विकसित केली आहे. या जैवरेणू मिश्रणाचा उपयोग करून पर्यावरणपूरक, कमी खर्चिक, सुलभ, सोप्या व जलद पद्धतीने मेटल नॅनोपार्टीकल्स तयार केले आहेत. या संशोधनासाठी वापरले गेलेले जिवाणू हे कोल्हापूरनजीकच्या गोकुळ शिरगाव येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) क्षेत्रातील फौंड्रीमधील सांडपाण्यामधून मिळविण्यात आले. त्यानंतर त्याची ओळख पटवून (आयडेंटिफिकेशन), आंतरराष्ट्रीय डिपॉझिटरी ऑथोरिटी (IDA) म्हणून मान्यता असलेल्या पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर मायक्रोबियल रिसोर्सेस  (NCMR) येथे जमा केले. या जीवाणूंचा वापर करून त्यापासून जैवरेणू मिश्रण तयार करण्याची नवीन पद्धती त्यांनी विकसित केली. त्यापासून विविध प्रकारचे मेटल नॅनोपार्टीकल्स तयार केले. त्यासाठी आवश्यक असे सर्व प्रक्रिया मापदंड (रिएक्शन पॅरामीर) निश्चित केले. या जैवरेणू मिश्रणाचा उपयोग करून सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलॅडियम यासारखे विविध नॅनोपार्टीकल्स तयार करण्यात यश आले. या कणांचा उपयोग जैवतंत्रज्ञान जैववैद्यकीय शास्त्रामध्ये केला जाऊ शकतो. या जैवरेणू मिश्रणापासून द्विधातू (bimetallic) व त्रिधातू (tri-metallic) नॅनोपार्टिकल्स तयार करण्याच्या पद्धतीवरही पुढील संशोधन करण्यात येत आहे.

या नवीन विकसित केलेल्या पद्धतीच्या उपयुक्ततेची माहिती देताना डॉ. पवार म्हणाले की, या पद्धतीचा अवलंब करून अल्पखर्चात सोप्या, सुलभ व जलद पद्धतीने जैवसुसंगत (बायोकम्पॅटिबल) मेटल नॅनोपार्टिकल्स तयार रता येऊ शकतात. हे मिश्रण पावडर स्वरूपामध्ये उपलब्ध असून यामार्फत बनवलेले जैवसुसंगत (बायोकम्पॅटिबल) मेटल नॅनोपार्टिकल्स हे जैवतंत्रज्ञान, जैववैद्यकीय, पर्यावरण शास्त्र, बायोसेन्सिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये उपयोगी होऊ शकतात. २१व्या शतकामध्ये जगातील मानवजातींना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः कर्करोगासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक उपचार पद्धतीला पर्याय म्हणून संशोधक नॅनो-जैवतंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करत आहेत. यामध्ये मेटल नॅनोपार्टिकल्सचा उपयोग कर्करोगपेशीविरोधक (anticancer) कर्करोग औषध वितर (drug delivery) म्हणून केला जातो. भविष्यात उपरोक्त पद्धतीने बनवलेले मेटल नॅनोपार्टिकल्स हे नॅनो-जैवतंत्रज्ञान आधारित कर्करोग उपचार पद्धतीमध्ये उपयुक्त ठरू शकतात. तसेच, हे मेटल नॅनोपार्टिकल्स सूक्ष्मजीव प्रतिरोधक म्हणून आणि घातक विषारी घटकांच्या शोधासाठी नॅनो-बायोसेन्सर म्हणूनही वापरले जाऊ शकतात.

भारतीय पेटंटसोबतच या संशोधन पद्धतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पीसीटी-पेटंट मान्यतेसाठीची  प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील कुलसचिव डॉ. विलास शिंदे, स्कूलचे समन्वयक डॉ. किरणकुमार शर्मा यांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले.

 

मानवजातीच्या कल्याणासाठीचे महत्त्वाचे संशोधन: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागात झालेले सदरचे पेटंटप्राप्त संशोधन हे मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने झालेले एक महत्त्वाचे संशोधन आहे. वैद्यकशास्त्रासह जैवतंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन, बायोसेन्सिंग आदी विविध क्षेत्रांमध्ये या संशोधनाचे उपयोजन शक्य आहे. या संशोधनाबद्दल संशोधकांचे अभिनंदन करतो आणि याबाबतच्या पुढील संशोधनासाठी सदिच्छा देतो, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.


No comments:

Post a Comment