Sunday, 8 January 2023

कोल्हापूरची कुस्ती जगभर पोहोचविणार: ग्रीसचे माहितीपट निर्माते मारिओस


ऑनलाईन पत्रकारितेच्या माजी विद्यार्थ्यांचा विद्यापीठात मेळावा

 

ग्रीस येथील माहितीपट निर्माते मॅलपित्सास मारिओस आणि दिमित्रिस सिद्रीदिस यांचे स्वागत करताना पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव. सोबत डॉ. आलोक जत्राटकर आणि अभिजीत गुर्जर. 

कोल्हापूर, दि. ८ जानेवारी: कोल्हापूर हे कुस्तीचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे येथील मातीतील कुस्तीची परंपरा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन ग्रीस येथील माहितीपट निर्माते मॅलपित्सास मारीओस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या ऑनलाईन पत्रकारिता माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. अध्यासनाच्या नवीन इमारतीमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी ग्रीस येथील माहितीपट फोटोग्राफर दिमित्रीस सीद्रीदिस, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, व्हिज्युअल स्टोरीटेलर अभिजीत गुर्जर, ऍड. वर्षा शिंदे उपस्थित होते.

मारिओस म्हणाले, कोल्हापुरातील कुस्ती परंपरा आमच्या कुतुहलाचा विषय आहे. ग्रीसमध्येही कुस्तीची परंपरा आहे; मात्र कोल्हापुरातील मातीतील कुस्ती हा वेगळा प्रकार असून तो आमच्यापेक्षा समृद्ध आहे. त्यामुळे आम्ही या परंपरेचा अभ्यास करत आहोत. अलीकडे मातीतील कुस्ती हा प्रकार फारसा पहावयास मिळत नाही. तरीही कोल्हापुरातील नागरिकांनी ही परंपरा नीट जोपासली असल्याचे आम्हाला कौतुक वाटते. ही गौरवशाली परंपरा जगभरातल्या प्रेक्षकांना माहित व्हावी, या उद्देशाने आम्ही कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेवर माहितीपट तयार करत आहोत. यातून कोल्हापूरची कुस्ती जगभर पोहोचेल, असा विश्वास आहे.

शिवाजी विद्यापीठाचा परिसर अतिशय भारावून टाकणारा आहे, असे नमूद करून ते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये व्हिज्युअल मानववंशशास्त्र या विषयात आम्ही काम करत आहोत. हा विषय अभ्यासक्रमाचा भाग झाला तर जगभरातल्या अभ्यासक संशोधकांना त्याचा उपयोग होऊ शकतो.

दिमित्रीस म्हणाले, खासबाग मैदानातील कुस्ती कॅमेराबद्ध करणे हा एक रोमांचकारी अनुभव होता. कोल्हापुरातील कुस्ती शौकीनांचे निरीक्षण केल्यानंतर त्यांची कुस्तीविषयीची जवळीक लक्षात आली. कोल्हापुरातील नागरिकांकडून मिळत असलेले प्रेम आम्ही विसरू शकत नाही. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. विद्यार्थ्यांमुळे आम्ही येथील तालीम संस्था तसेच अन्य पदाधिकाऱ्यांपर्यंत सहज पोचू शकत आहोत. विद्यापीठाचे आमच्या माहितीपटातील योगदान विशेष उल्लेखनीय आहे.

डॉ. आलोक जत्राटकर यांनी आजी- माजी विद्यार्थ्यांमध्ये स्नेहबंध प्रस्थापित व्हावेत आणि अध्यासनाच्या यापुढील शैक्षणिक कारकीर्दीला माजी विद्यार्थ्यांचे योगदान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ऍड. वर्षा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. मोहन कांबळे यांनी आभार मानले. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी सांगली, कोल्हापूर परिसरातील आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment