Saturday, 7 January 2023

शिवाजी विद्यापीठात कला-क्रीडाविषयक उपक्रमांनी

श्रीमंत शाहू महाराजांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात

 

श्रीमंत शाहू महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठात विशेष सांगितिक कार्यक्रमात सादरीकरण करताना संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.

श्रीमंत शाहू महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष बास्केटबॉल प्रदर्शनीय सामन्यांचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवर अधिकारी व बास्केटबॉलपटू.


कोल्हापूर, दि. ७ जानेवारी: कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस शिवाजी विद्यापीठाने कला, क्रीडाविषयक उपक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा केला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी शाहू छत्रपती महाराजांना दीर्घायुरारोग्य लाभो, अशा सदिच्छा या प्रसंगी दिल्या.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विद्यापीठाच्या संगीत नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने स्वरार्पण या सांगीतिक कार्यक्रमाचे राजर्षी शाहू सभागृहात सादरीकरण केले. विभागाच्या डॉ. शिवानी ढेरे यांच्यासह प्रियांका मिरजकर, प्रतीक्षा पोवार, हर्षदा परीट, नम्रता पंडित, अनिकेत निर्मळे या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत रामदास यांनी रचलेल्या अभंगासह अनेक नवी-जुनी मराठी हिंदी, गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमामध्ये संदेश गावंदे (तबला), विक्रम परीट (ऑक्टोपॅड), सौरभ सनदी (ढोलकी), आकाश साळोखे (सिंथेसायझर) यांनी साथ केली. अतुल परीट यांनी स्वागत केले. कोल्हापूर आकाशवाणीच्या निवेदिका ऐश्वर्या बेहेरे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीत नाट्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. अंजली निगवेकर, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, निखिल भगत यांच्यासह सहयोगी शिक्षकांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

तत्पूर्वी, सकाळी ९ वाजता विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागामार्फत श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त बास्केटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील, कुलसचिव डॉ. शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांच्यासह महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालकांच्या उपस्थितीत या विशेष प्रदर्शनीय सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगीही उपस्थितांनी शाहू महाराजांना वाढदिनानिमित्त दीर्घायुरारोग्य चिंतिले.

No comments:

Post a Comment