Saturday 28 January 2023

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती (पुरूष) स्पर्धा २०२२-२३:

शिवाजी विद्यापीठाच्या रोहन रंडे यास रौप्यपदक

 दुसऱ्या दिवशीही पंजाब, हरियाणाच्या विद्यापीठांना सुवर्णपदके

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळविणारा शिवाजी विद्यापीठाचा कुस्तीपटू रोहन रंडे (२). सुवर्णपदक मिळविणारा सोनू (१) आणि कांस्य मिळविणारे रविंदर व रॉबिन सिंग (३).


कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या रोहन रंडे या कुस्तीपटूने ९७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. विद्यापीठाचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे.

सदर स्पर्धेमध्ये  पंजाब आणि हरियाणा येथील विद्यापीठांच्या कुस्तीपटूंनी चार विविध गटांमध्ये सुवर्णपदके जिंकली. उद्या स्पर्धेचा अखेरचा दिवस आहे. स्पर्धेत देशभरातील १३१ विद्यापीठांचे ८९४ कुस्तीपटू सहभागी झाले आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात गेल्या २२ जानेवारीपासून राष्ट्रीय कुस्त्यांचा थरार पाहायला मिळतो आहे. कालपासून सुरू झालेल्या ग्रीको-रोमन स्पर्धेमुळे तर सामने अधिकच रंगतदार बनले आहेत. अत्यंत चपळतेने व चुरशीने होत असलेले हे सामने पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांचीही गर्दी होते आहे.

स्पर्धेमध्ये पंजाब-हरियाणाच्या कुस्तीपटूंचे निर्विवाद वर्चस्व असले तरी यजमान शिवाजी विद्यापीठाच्या कामगिरीकडेही सर्वांचेच लक्ष लागून आहे. विद्यापीठाचे स्पर्धेत सहभागी दहा कुस्तीपटू बाद फेरीच्या सामन्यांमध्ये अत्यंत चुरशीने प्रतिस्पर्ध्यांना झुंजवित आहेत. पदकाच्या दृष्टीने कालचा दिवस सुना गेला असला तरी आज रोहन रंडे याने ही उणीव भरून काढली. ९७ किलो वजनी गटात त्याने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली, मात्र अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या सोनू याच्याकडून त्याला पराभव पत्करावा लागला. रोहनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रोहन हा गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

६० किलो वजनी गटात शिवाजी विद्यापीठाच्या संतोष हिरुगडे याने अत्यंत चिवट खेळीचे प्रदर्शन करीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तो अर्जुननगरच्या देवचंद महाविद्यालयाचा कुस्तीपटू आहे.

आज ९७ किलो, ७७ किलो, ६७ किलो आणि ६० किलो अशा चार वजनी गटांचे कुस्ती सामने खेळविण्यात आले. यामध्ये अनुक्रमे गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर (पंजाब), लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा (पंजाब), महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक (हरियाणा) आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र (हरियाणा) या चार विद्यापीठांनी सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.

आज झालेल्या विविध वजनी गटांचा निकाल अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके यानुसार पुढीलप्रमाणे:

६० किलो: हर्ष राणा (कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र), हरदीप सिंग (पंजाब विद्यापीठ, चंदीगढ), अजीत कुमार (महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी), दिनेश कुमार (चौधरी रणबीरसिंह विद्यापीठ, जिंद, हरियाणा).

६७ किलो: अनिल (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), सौरभ (कलिंगा विद्यापीठ, छत्तीसगढ), अंकित (देश भगत विद्यापीठ, मंडी), अमित कुमार (पंडित दीनदयाळ उपाध्याय शेखावती विद्यापीठ, शिखर).

७७ किलो: करण (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा), रोहित बूरा (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), अभिमन्यू (पंजाब विद्यापीठ, चंदीगढ), सागर (कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र).

९७ किलो: सोनू (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, पंजाब), रोहन रंडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), रविंदर (तंत्रज्ञान विद्यापीठ, जयपूर), रॉबिन सिंग (बाबा मसिनाथ विद्यापीठ, रोहतक).

भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक यांच्यासह क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, स्पर्धा संचालक दिलीप पवार, तांत्रिक संचालक बंकट यादव, आंतरराष्ट्रीय रेफ्री नवनाथ ढमाळ आदींच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा अत्यंत सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत आहेत.

उद्या स्पर्धेचा अखेरचा दिवस असून ८७ व १३० किलो वजनी गटांतील कुस्ती स्पर्धा सकाळच्या सत्रात ८ वाजल्यापासून घेण्यात येतील. त्यानंतर दुपारच्या सत्रात पुरस्कार वितरण कार्यक्रमाने आठवडाभर सुरू असलेल्या या स्पर्धेचा समारोप होईल.

No comments:

Post a Comment