Sunday, 22 January 2023

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती (पुरूष) स्पर्धा: दिवस पहिला, सत्र पहिले

शिवाजी विद्यापीठात फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धांना जल्लोषी सुरवात; चार वजनी गटांत रंगले ४८० सामने

 

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेमधील शिवाजी विद्यापीठाचा कुस्तीपटू अमोल बोंगार्डे (लाल जर्सी) आणि कुरूक्षेत्र विद्यापीठाचा शुभम यांच्यातील कुस्तीचा एक क्षण.



कोल्हापूर, दि. २२ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात आजपासून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती (पुरूष) स्पर्धांना मोठ्या जल्लोषात सुरवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ५७ किलो, ६५ किलो, ७४ किलो आणि ८६ किलो अशा चार वजनी गटांमधील ४८० सामने रंगले.

विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आज सकाळी भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा निरीक्षक सुरेश मलि, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष संभाजी वरूटे, शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा माजी क्रीडा विभागप्रमुख डॉ. प्रकाश गायकवाड यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होऊन स्पर्धांना सुरवात झाली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सकाळच्या सत्रात स्पर्धास्थळास भेट देऊन पाहणी केली. क्रीडा संचालकांसह स्पर्धा निरीक्षकांची भेट घेऊन स्पर्धा सुरळीत होण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या.

आज सकाळी सहा वाजल्यापासूनच दाखल झालेल्या कुस्तीपटूंची वजने घेण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास स्पर्धांना प्रत्यक्ष सुरवात झाली. दिवसभरात चार मॅटवर ५७ किलो वजनी गटात १२२,  ६५ किलोमध्ये १२७, ७४ किलो गटात ११५ आणि ८६ किलो वजनी गटात ११६ से एकूण ४८० सामने झाले. सामने रात्री उशीरापर्यंत सुरू राहिले.

सध्या सुरू असलेल्या फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात शिवाजी विद्यापीठाच्या दहा खेळाडूंचा सहभाग आहे. सकाळच्या सत्रात शिवाजी विद्यापीठाअंतर्गत गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयाचा पैलवान अमोल बाबुराव बोंगार्डे याने गुजरात विद्यापीठाच्या शाहेबाज खानला पराभूत करून पुढील फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, या कुस्ती स्पर्धेसाठी देशातील १९५ विद्यापीठांनी नोंदणी करून सहभाग दर्शविला आहे. येत्या आठवडाभरात देशभरातील २५६० बलदंड आणि चपळ पैलवान कुस्तीतील स्वतःचे कसब दाखवण्यासाठी व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

स्पर्धा संचालक दिलीप पवार, तांत्रिक संचालक बंकट यादव, आंतरराष्ट्रीय रेफ्री नवनाथ ढमाळ यांच्या देखरेखीखाली स्पर्धा नियोजन समितीचे कामकाज अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे.

No comments:

Post a Comment