शिवाजी विद्यापीठाच्या शुभम सिंदनाळेला रौप्यपदक
शिवाजी विद्यापीठात झालेल्या ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेतील १३० किलो वजनी गटातील पदक विजेत्यांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह डॉ. सुरेश कुमार मलिक, डॉ. महादेव देशमुख, डॉ. शरद बनसोडे. |
१३० किलो वजनी गटातील ग्रीको-रोमन कुस्तीच्या उपांत्य सामन्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या शुभम याने कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या केवल सिंगला अस्मान दाखविले तो क्षण. |
कोल्हापूर, दि. २९ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात गेले आठवडाभर सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेचा आज शानदार समारोप झाला. गेल्या तीन दिवसांत झालेल्या ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेचेही सर्वसाधारण विजेतेपद याच विद्यापीठाने पटकावले आहे.
ग्रीको-रोमन स्पर्धेत चंदीगढ येथील पंजाबी विद्यापीठ उपविजेते ठरले, तर भटिंडा
येथील गुरू काशी विद्यापीठास तृतीय स्थान मिळाले. यजमान शिवाजी विद्यापीठाच्या शुभम
सिंदनाळे याने १३० किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले.
शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रवीणराजे घाटगे (कागलकर)
सरकार, भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेश कुमार मलिक, विद्यापीठाच्या
मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत
राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते विजेतेपदाच्या ट्रॉफींचे वितरण करण्यात
आले. यावेळी विद्यार्थी विकास विभाग संचालक
डॉ. प्रकाश गायकवाड, स्पर्धा संचालक
दिलीप पवार, तांत्रिक संचालक
बंकट यादव, आंतरराष्ट्रीय रेफ्री
नवनाथ ढमाळ, विजयसिंह यादव, महेंद्र पाटील आदी उपस्थित
होते. डॉ. विजय रोकडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले, तर क्रीडा संचालक डॉ. शरद
बनसोडे यांनी आभार मानले.
स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे दहा कुस्तीपटू सहभागी झाले. त्यांनी उत्कृष्ट
कामगिरीचे प्रदर्शन केले. आज १३० किलो वजनी गटामध्ये विद्यापीठाच्या शुभम सिंदनाळे
याने रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाच्या सतीश याला अत्यंत जोरदार टक्कर
दिली. अत्यंत तुल्यबळ झालेल्या अंतिम लढतीत सतीशने शुभमवर ५-१ अशी गुणांवर मात केली.
त्यामुळे शुभमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शुभम हा गडहिंग्लजच्या शिवराज
महाविद्यालयाचा कुस्तीपटू आहे. काल याच महाविद्यालयाच्या रोहन रंडे याने ग्रीको-रोमन
कुस्तीमध्ये ९७ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. अक्षय मंगावडे याने फ्रीस्टाईल
कुस्तीमध्ये १२५ किलो वजनी गटात विद्यापीठास कांस्य पदक मिळवून दिले आहे.
आज झालेल्या ८७ किलो वजनी गट ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये विद्यापीठाच्या विजय
डोईफोडे यानेही उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करीत पाचवे स्थान प्राप्त केले. विजय हा
मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचा कुस्तीपटू आहे.
स्पर्धेत आज तिसऱ्या, अखेरच्या दिवशी ८७ किलो व १३० किलो वजनी गटांतील स्पर्धा
पार पडल्या. त्यामध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या कुस्तीपटूंची
नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे:-
८७ किलो: मोहित खुकर (चौधरी चरणसिंग विद्यापीठ, मीरत), सुरजीत सिंग (एमजेपी रोहिलखंड विद्यापीठ,
बरेली, उत्तर प्रदेश), करमबीर (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर), रामसिंग
बलिया (जननायक चंद्रशेखर विद्यापीठ, बल्लिया, उत्तर प्रदेश).
१३० किलो: सतीश (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), शुभम सिंदनाळे (शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर), आशिष (सिंघानिया विद्यापीठ, झुनझुनू, राजस्थान), दीपांशू (आयटीएम विद्यापीठ, ग्वाल्हेर).
आदर्श व पारदर्शक स्पर्धेचा वस्तुपाठ: डॉ. मलिक
शिवाजी विद्यापीठाने कुस्ती स्पर्धा किती पारदर्शक पद्धतीने घ्याव्यात, याचा आदर्श
वस्तुपाठच या स्पर्धांच्या आयोजनाद्वारे घालून दिलेला आहे, असे कौतुकोद्गार भारतीय
विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेश कुमार मलिक यांनी आज कुस्ती स्पर्धेच्या
समारोप समारंभात बोलताना काढले. यजमान शिवाजी विद्यापीठाने क्रीडापटूंसह सर्वच संघ
व्यवस्थापक, प्रशिक्षक आदींची अतिशय उत्कृष्ट व्यवस्था केली. उत्तम सोयीसुविधा पुरविल्या.
ही बाबही सर्वांसाठीच आदर्श स्वरुपाची आहे. त्याबद्दल भारतीय विद्यापीठ
महासंघाच्या वतीनेही त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment