शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेमधील विविध गटांतील सामन्यांमधील चुरशीचे क्षण. (छायाचित्रे: सचिन कामत व अमर खोत) |
मोहाली, चंदीगढ, भटिंडा,
राजस्थान विद्यापीठांना सुवर्णपदके
कोल्हापूर, दि. २७
जानेवारी: मल्लांची ताकद, चिवटपणा आणि निर्णयक्षमता यांचा कस
पाहणाऱ्या ग्रीको-रोमन प्रकारांतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांना शिवाजी
विद्यापीठात आजपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पंजाब-हरियाणाच्या कुस्तीपटूंनी
जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. आज चार विविध वजनी गटांच्या
कुस्तींमध्ये चंदीगढ विद्यापीठ (मोहाली), पंजाब विद्यापीठ (चंदीगढ), गुरू काशी
विद्यापीठ (भटिंडा) आणि सिंघानिया विद्यापीठ (राजस्थान) या चार विद्यापीठांनी
सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.
पुरूषांच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गेल्या २२
जानेवारीपासून विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात सुरू आहेत. या स्पर्धेतील फ्रीस्टाईल कुस्ती
स्पर्धांचा पहिला टप्पा २२ ते २४ जानेवारी या कालावधीत पार पडल्यानंतर आजपासून (दि.
२७) ग्रीको-रोमन प्रकारांतील कुस्ती स्पर्धांना प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या
या स्पर्धेत देशभरातील १३१ विद्यापीठांचे ८९४ कुस्तीपटू सहभागी झाले आहेत.
ग्रीको-रोमन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ५५ किलो, ६३ किलो, ७२ किलो आणि ८२ किलो
या चार वजनी गटांतील कुस्ती स्पर्धा झाल्या. स्पर्धकांच्या तयारीचा कस पाहणाऱ्या
या स्पर्धेतील अनेक लढती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या होत्या. काही लढती अत्यंत
लक्षवेधी ठरल्या. विशेषतः ७२ आणि ८२ किलो वजनी गटांतील लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या.
तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठीची झटापट आणि त्याला चकित करण्यासाठीची
धडपड यांचा सुरेख मेळ घालत स्पर्धक स्वतःला सिद्ध करीत एकेक फेरी पार करीत राहिले.
शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंची वाटचाल या चार गटांमध्ये बाद फेऱ्यांतच थांबली.
आता उर्वरित सहा वजनी गटांमध्ये त्यांना पदकासाठी परिश्रम करावे लागतील.
आज झालेल्या विविध वजनी गटांचा निकाल अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके यानुसार
पुढीलप्रमाणे:
५५ किलो: ललित (सिंघानिया विद्यापीठ,
झुनझुना, राजस्थान), संजीव (देश भगत विद्यापीठ, मंडी, पंजाब), हिमांशू सिंग (राजस्थान
विद्यापीठ, जयपूर), अनुप कुमार (डॉ. राम मनोहर लोहिया अवध क्रीडा विद्यापीठ,
अयोध्या, उत्तर प्रदेश)
६३ किलो: रवी (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा), अश्वनीकुमार सिंग
(महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी), अंकित (चौधरी रणबीरसिंह विद्यापीठ,
जिंद, हरियाणा), राम परवेश (वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूर, उत्तर
प्रदेश)
७२ किलो: विशाल (पंजाब विद्यापीठ, चंदीगढ), जगमल सिंह (पंडित
दीनदयाळ उपाध्याय शेखावती विद्यापीठ, शिखर), सचिन (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा),
साहील (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, पंजाब)
८२ किलो: अंकित बूरा (चंदीगड विद्यापीठ, मोहाली), अंकित (चौधरी
रणबीरसिंह विद्यापीठ, जिंद, हरियाणा), अमन (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक),
सुंदर (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा)
दरम्यान, आज सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या
हस्ते मॅटपूजन व विविध वजनी गटांतील सलामीच्या कुस्त्या लावून स्पर्धेस प्रारंभ
करण्यात आला. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, भारतीय विद्यापीठ महासंघाचे
(एआययू) निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास
विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र
पवार, स्पर्धा संचालक दिलीप
पवार, तांत्रिक संचालक बंकट
यादव, आंतरराष्ट्रीय रेफ्री
नवनाथ ढमाळ आदी उपस्थित होते.
स्पर्धेत उद्या, शनिवारी ६० किलो, ६७ किलो, ७७ किलो आणि ९७ किलो या वजनी
गटांतील, तर अखेरच्या दिवशी, रविवारी (दि. २९) ८७ व १३० किलो गटांतील सामने होतील.
शिव-वार्ता व महाखेल युट्यूब वाहिन्यांद्वारे थेट प्रक्षेपण
शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या या स्पर्धेचे विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ आणि ‘महाखेल कुस्ती’ या युट्यूब वाहिन्यांद्वारे थेट
प्रक्षेपण करण्यात येत असून शेकडो कुस्तीप्रेमी नागरिक व विद्यार्थी या स्पर्धेचा
ऑनलाईन आनंदही घेत आहेत.
No comments:
Post a Comment