Friday, 13 April 2018

विद्यार्थ्यांना किमान एक कलाविषय शिकवायला हवा: डॉ. जब्बार पटेल यांची अपेक्षा


ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार' प्रदान करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. जे.एफ. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. भारती पाटील.



डॉ. जब्बार पटेल


शिवाजी विद्यापीठात डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात


कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: कलात्मक विषयांच्या बाबतीत जाणीव निर्मिती होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून किमान एक तरी कलाविषय शिकवायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार डॉ. पटेल यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख १ लाख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. पटेल बोलत होते.
Dr. Jabbar Patel
यावेळी डॉ. श्रीमती मणी पटेल यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. जे.एफ. पाटील, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. जब्बार पटेल म्हणाले, आपल्या समाजात कलात्मक विषय तुलनेने कमी शिकविले जातात. जीवनात कला-संस्कृतीचे महत्त्व मोठे आहे. ते लक्षात घेता या शिक्षणाच्या संदर्भात जागृतीची मोठी गरज आहे. सिनेमा असो अगर कोणतीही कलाकृती या माणसाच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत करतात. त्या दृष्टीने कला क्षेत्राकडे पाहण्याची गरज आहे. कलेच्या क्षेत्रात सृजनशील निर्मितीसाठी कलाकारामध्ये धाडस असणे अत्यावश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी कोणताही शिक्षक हा जातिवंत बंडखोर असला पाहिजे, त्या बंडखोरीतूनच विद्यार्थ्यांना घडविण्याची ऊर्मी जन्माला येत असते, असे मतही डॉ. पटेल यांनी व्यक्त केले.
डॉ. पटेल यांनी या प्रसंगी आपल्या नाट्य व चित्रपट क्षेत्रातील वाटचालीचा पटच उपस्थितांसमोर उलगडला. ते म्हणाले, नाटक हा माझ्यासाठी सर्जनशीलतेचा भाग आहे. रंगमंचावरील प्रायोगिकतेमुळेच भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखे महान नाट्यकर्मी घडले. घाशीराम कोतवालमधला राजकीय संदर्भ इतका सशक्त होता की, त्यामधून राज्यव्यवस्थेला अशा घाशीरामांची सातत्याने असणारी गरज अधोरेखित होते. सामना हा माझ्या पहिल्या चित्रपटाच्या मुहुर्ताचा पहिला प्रसंग कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत चित्रित करण्यात आला. मुहुर्ताची फटमार करायला भालजी पेंढारकर, चंद्रकांत मांढरे आणि लता मंगेशकर यांचे येणे आणि कॅमेऱ्यासमोर डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले असा एक मोठाच योग त्या निमित्ताने जमून आला. लता मंगेशकरांनी त्यावेळी कोणतीही बिदागी न घेता केवळ शब्दाखातर सख्या रे.. हे गीत म्हटले. मंगेशकर कुटुंबियांशी जडलेल्या या जिव्हाळ्यातूनच पुढे जैत रे जैतसारखा वेगळा चित्रपट घडून आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाशी निगडित आठवणी सांगताना डॉ. पटेल म्हणाले, या चित्रपटाच्या निमित्ताने देशातल्या दलित, शोषित वर्गाचं दुःख मला अभ्यासता आलं, मांडता आलं. बाबासाहेबांवरील लोकांची निष्ठा आणि प्रेम आजही इतकं प्रचंड आहे की, महाड आणि नागपूर येथील चित्रीकरणादरम्यान दोन ते अडीच लाख लोक स्वतःच्या घरचे जुने कपडे नेसून आणि घरून भाजी-भाकरी घेऊन सहभागी झाले. बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी जगभर फिरुन योग्य अभिनेत्याचा शोध घेतला, तो अखेर दाक्षिणात्य अभिनेता मामुटीवर येऊन संपला. मामुटीने ज्या पद्धतीने बाबासाहेबांना पडद्यावर साकार केले, त्याला तोड नाही. बाबासाहेबांची विद्वत्ता आणि त्यांची ममतापूर्ण आक्रमकता या अभिनयाद्वारे दाखविण्यास अशक्य असलेल्या गोष्टी त्याने अप्रतिमरित्या साकारल्या, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. एस.एम. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज यांच्यावरील माहितीपट करताना आलेले अविस्मरणीय अनुभवही डॉ. पटेल यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या महान चित्रपटकर्मीला पुरस्कार देताना शिवाजी विद्यापीठ परिवाराला अतिशय आनंद होतो आहे. डॉ. पटेल यांचा जीवनपट त्यांच्याच तोंडून ऐकण्याची अत्यंत दुर्मिळ अशी संधी या निमित्ताने लाभली. त्यांच्या कलाकृतींना सृजनशीलतेचं एक अभिनव असं कोंदण लाभलेलं आहे. त्यांच्या अजरामर कलाकृती या निरंतर आनंददायी ठरणाऱ्या आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्याविषयी चित्रफीतीचे प्रदर्शन करण्यात आले. डॉ. जे.एफ. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मानव्य विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी डॉ. मणी पटेल यांना सौ. अनिता शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह कणबरकर कुटुंबीय, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment