Saturday, 14 April 2018

लोकशाहीत नैतिक मूल्यांचा ऱ्हास चिंताजनक: डॉ. गोपाळ गुरू




भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी (डॉवीकडून) डॉ. जे.एस. बागी, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. गोपाळ गुरू, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एस.एस. महाजन.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू.


शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: लोकशाहीत नैतिक मूल्यांचा ऱ्हास होणे ही चिंतेची बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा.डॉ. गोपाळ गुरू यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही संकल्पना या विषयावर ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
Dr. Gopal Guru
डॉ. गुरू म्हणाले, डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत लोकशाहीत एक व्यक्ती, एक मत याच्या बरोबरीने एक व्यक्ती, एक मूल्य या तत्त्वाला नितांत महत्त्व आहे. माणुसकी हे महत्त्वाचे मूल्य आहे. ते वृद्धिंगत होण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे लोकशाही होय. मात्र, सद्यस्थितीत या मतांचे वस्तूकरण होऊन त्याचे मूल्य बाजारीकरणाच्या माध्यमातून वसूल करण्याचा प्रयत्न दिसतो, तेव्हा त्या मताचे अवमूल्यन तर होतेच, मात्र तिथे नैतिकतेचाही अधःपात, पराभव होतो.  लोकशाही हा शब्द सातत्याने वापरून आपण तो गुळगुळीत करून टाकला आहे. त्याचे निःसत्त्वीकरण केले आहे. तथापि, लोकशाहीच्या नितीमत्तेची बाजू मात्र आपण सोयीस्कररित्या विसरून टाकतो. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचार व कार्यामुळे लोकशाहीच्या संकल्पनेला नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. या नैतिक अधिष्ठानाच्या बळावर समाजातील शोषित, वंचित, आदिवासी, भटके-विमुक्त आदी समाजघटकांना जेव्हा त्यांचे म्हणणे मांडण्याची, विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते, तेव्हा तिथे खऱ्या लोकशाही प्रस्थापनेची सुरवात होते. अशा प्रकारची स्वातंत्र, समता व बंधुता या मूलभूत मूल्यांवर अधिष्ठित लोकशाही बाबासाहेबांना अभिप्रेत होती.
आंबेडकरांच्या लोकशाही संकल्पनेत सन्मान, आत्मसन्मान आणि बुद्धिप्रामाण्यवाद यांना अत्युच्च महत्त्व असल्याचे सांगून डॉ. गुरू म्हणाले, सन्मान आणि आत्मसन्मान यांच्यातील द्वंद्वही समजून घेणे ही महत्त्वाची गरज आहे. सध्या भौतिकवादी व्यवस्थेच्या भोवतालामध्ये विविध प्रकारचे सन्मान, प्रतिष्ठा मिळविणे ही सोपी बाब आहे. मात्र, त्यातून आत्मसन्मान मिळेलच, याची खात्री नाही. आजच्या बाजारपेठीय लोकशाहीमध्ये एखाद्याने कोणती आणि किती किंमत मोजून सन्मान प्राप्त करून घेतला आहे, यावरुन या द्वंद्वाला नवे परिमाण प्राप्त होते. आणि त्यावरुनच आत्मसन्मान प्राप्ती होणार की नाही, याची निश्चिती होते, असेही ते म्हणाले. डॉ. गुरू यांनी आपल्या व्याख्यानात लोकशाही आणि आधुनिकता, लोकशाही आणि वैचारिकता, लोकशाही आणि बाजारीकरण यांमधील द्वंद्वांची अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानकोंदणातला हिरा असे गौरवोद्गार काढून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, जागतिक ज्ञानाचे असे एकही क्षेत्र नाही की ज्याचा बाबासाहेबांनी अभ्यास केला नाही. अभ्यास आणि कृतीशीलतेचा अनोखा संगम त्यांच्याठायी झाला होता. त्यातून त्यांची विविध ज्ञानरुपे समाजासमोर आली. इतका प्रचंड व्यासंग एकाच वेळी कवेत घेणे, हे सर्वसामान्य मानवाच्या कुवतीपलिकडचे होते, म्हणून बाबासाहेब हे महामानव ठरतात. बाबासाहेबांनी शिका, संघर्ष करा व संघटित व्हा असा संदेश दिला. शिक्षणातून माणसाला माणसाची वेदना वाचता आली पाहिजे. ती वाचता आली की संघर्षाची मानसिकता निर्माण होते. आणि त्या सकारात्मक मानसिकतेमधून येणारा संघर्ष व्यवस्था परिवर्तन घडवून विकासाच्या प्रेरणा निर्माण करतो. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून मानवी हक्कांचे संरक्षण करणारी अत्युत्कृष्ट व्यवस्था या देशात निर्माण केली, असे गोरवोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धांचे पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यांचा निकाल पुढीलप्रमाणेः- निबंध स्पर्धा- अमोल पांडुरंग कांबळे (प्रथम), तेजश्री तेजपाल मोहोरेकर (द्वितिय), प्रशांत उत्तम कांबळे व नवनाथ लोखंडे (तृतीय-विभागून). पोस्टर स्पर्धा- तेजश्री तेजपाल मोहोरेकर (प्रथम), अमितकुमार यशवंतराव कांबळे (द्वितिय), तेजस्विनी वसंतराव सलामे (तृतीय).
यावेळी केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रमुख पाहुणे डॉ. गोपाळ गुरू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. जे.एफ. पाटील यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment