पदवी स्तरावरच विद्यार्थ्यास दोन पेटंट; दहा आंतरराष्ट्रीय शोधनिबंध आणि बरंच काही...
कोल्हापूर, दि. २७ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या
विशेष अनुदानातून शैक्षणिक वर्ष 2012-13पासून सुरू करण्यात आलेल्या स्कूल ऑफ नॅनो-सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी या अधिविभागाची बी.एस्सी.-एम्.एस्सी. (एकत्रित) अभ्यासक्रमाची पहिली बॅच सन २०१६-१७मध्ये उत्तीर्ण होऊन बाहेर पडली आहे. या पहिल्या बॅचच्या
अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले संशोधनाचे कसब सिद्ध
करून घवघवीत यश मिळविले आहे. त्यांच्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा
विद्यापीठाचा निर्णय अत्यंत समयोचित असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मत स्कूल ऑफ नॅनो-सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीचे समन्वयक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.
पी.एस. पाटील यांनी दिली.
विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान
अधिविभागाच्या या पहिल्या पंचवार्षिक बॅचच्या कामगिरीचा आढावा घेताना डॉ.पाटील म्हणाले, एम्.एस्सी.च्या शेवटच्या वर्षातील दहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधन प्रकल्पाच्या दरम्यान दहा आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये आपले शोधनिबंध प्रकाशित केले. या विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांची निवड दक्षिण कोरिया आणि तैवान येथील विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये पीएच.डी. साठी निवड झाली. त्यात नवाज मुलाणी (हॅनयाँग नॅशनल युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरिया), प्रवीण पवार, विजय पाटील आणि ऋतुराज पाटील (चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरिया), रोहन पास्ते आणि मानसी हुपरीकर (नॅशनल डाँग हौ युनिव्हर्सिटी, तैवान), प्रितम पाटील (म्याँगजी नॅशनल युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरिया), यांचा समावेश आहे. या विदयार्थ्यांचे संशोधनातील योगदान पाहता कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे चांगले संशोधन प्रकाशित करण्यासाठी दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिप देऊ केली आहे.
याखेरीज विभागातील आठ विद्यार्थ्यांची ‘स्प्रिंगर नेचर’सारख्या आंतरराष्ट्रीय प्रकाशन समुहात ‘सायन्टिफिक रायटर’ या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यात राहुल टिक्के, काजल चौगुले, वैष्णवी सुतार, ऋषीकेश गुरव, असिफ मुजावर, सुयोग माने, प्रितीलता जाधव आणि सुदर्शन पाटील यांचा समावेश आहे. तसेच नीलम यादव या विद्यार्थिनीस पॅरिस एसयुडी युनिव्हर्सिटीची अत्यंत प्रतिष्ठेची ‘इरॅस्मस मुंडस’ फेलोशीप मिळाली आणि ती सध्या तेथे एम.एस. करीत
आहे. शुभदा पाटील या विद्यार्थिनीची जेम्स वॅट नॅनो फॅब्रीकेशन सेंटर येथे एम.एस. या पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून विभागात एम.फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमही सुरु होत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढण्यासाठी
विभागामार्फत करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती देताना डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला आणि संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी विभागात पदवी स्तरापासूनच लघु-संशोधन प्रकल्प राबवले जातात. बी.एस्सी. भाग-१साठी ‘प्रेरणा’ बी.एस्सी. भाग-२ साठी ‘कल्पना’, बी.एस्सी. भाग-३ ‘सृजन’ एम्.एस्सी. भाग-१साठी ‘निर्मिती’ अशा उपक्रमांतून लघुप्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना संशोधनास व पेटंट (स्वामीत्व हक्क) फाईल करण्यास प्रोत्साहित केले जाते. त्याचेच फलित म्हणून समाजास उपयुक्त अशा संशोधनासाठी धनश्री साबळे या विदयार्थिनीला ‘गॅस सेन्सर’ निर्मितीसाठी ‘झी-२४ तास यंग इनोव्हेटर अवॉर्ड’ मिळाले, तर अजित पवार या विद्यार्थ्याला ‘वॉटर प्युरिफिकेशन’साठी मराठी विज्ञान परिषदेच्या संशोधन महोत्सवात प्रथम क्रमांक मिळाला. पदवीच्या दुसऱ्या वर्षातील दिग्विजय पाटील याने चामडी चप्पलला हायड्रोफोबिक कोटींग आणि गणित विषयात नवीन फॉर्म्युला मांडला. पदवी शिक्षणाच्या कालावधीतच त्याने दोन पेटंटस् स्वतःच्या नावावर केली आहेत.
विद्यार्थ्यांची तयारी कशा प्रकारे करून घेतली
जाते, याविषयी सांगताना डॉ. पाटील म्हणाले, जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेच्या ॲलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट, डी.ए.ए.डी. (जर्मनी), युरोपमधील इरॅस्मस मुंडस, मेरी क्यूरी, अमेरिकेतील
रामन, जपान सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ सायन्स (जेएसपीएस), नॅशनल इन्स्टिटयूट फॉर मटेरियल सायन्स
(एनआयएमएस) दक्षिण कोरियाची ब्रेन पुल, सिंगापूरमधील नॅशनल युनिव्हर्सिटी
ऑफ सिंगापूर (एनयुएस) ऑस्ट्रेलियाची व्हाईस चान्सलर (व्हीसी) फेलोशीप तसेच इतर मानाचे विदयावेतन मिळवण्यासाठी अधिविभागामध्ये मार्गदर्शन केले जाते. या फेलोशीपचे सर्वसाधारण विदयावेतन एक हजार ते दीड हजार अमेरिकी डॉलर प्रतिमाह इतके असते. हे विदयावेतन मिळवण्यासाठी टीओईएफएल, आयईएलटीएस
परीक्षांविषयक मार्गदर्शन करण्यावर विशेष भर दिला जातो. या प्रशिक्षणातून इंग्रजी विषयातील लेखन, वाचन व समज येण्यास मदत होते. या महत्त्वाच्या विदयावेतनाद्वारे पीएच.डी. केल्यास पोस्ट डॉक्टरेटसाठी भरीव विदयावेतन (३०००-४००० अमेरिकी डॉलर प्रतिमाह) मिळू शकते. शैक्षणिक वर्ष २०१६-१७मध्ये आयईएलटीएस या परिक्षेमध्ये नॅनो सायन्स विभागाचे पाच विदयार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामुळे त्यांना युरोप आणि इतर विकसित देशांमध्ये पीएच.डी.साठी प्रवेश मिळविणे शक्य झाले आहे. या माध्यमातून भरपूर संशोधनाचा अनुभव प्राप्त करुन नामवंत शास्त्रज्ञ होता येते किंवा स्वतःच्या उद्योगाची निर्मितीही करता येते. त्या दृष्टीने भविष्यात विद्यार्थ्यांना आंत्रप्रेन्युअरशीपमार्फत रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा विचार असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करीत असून अभियांत्रिकी, फार्मसी, टेक्स्टाईल, डेंटीस्ट्रीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कन्सल्टन्सीमार्फत मार्गदर्शन केले जाते. इतर विद्यार्थ्यांना अधिविभागातील उपकरणांचा त्यांच्या संशोधनासाठी उपयोग करुन घेता यावा, याकरिता अधिविभागात नॅनो सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी सेंटर (एनआयएफसी)ची स्थापना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रवेश परीक्षेविषयी...
शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजीची प्रवेश क्षमता ६० विदयार्थीं इतकी असून इच्छुक
विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. अधिविभागात बी.एस्सी.-एम्.एस्सी. (एकत्रित) पाच वर्षांच्या प्रवेशासाठी बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर ३ मे २०१८ पासून १६ जून २०१८पर्यंत उपलब्ध करुन दिले जातील. प्रवेश परीक्षा दि. २५ जून २०१८ रोजी स्कूल ऑफ नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी ०२३१-२६०९४९० या क्रमांकावर
संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment