Tuesday, 10 April 2018

संवेदनशील विषयांबाबत सांगोपांग चर्चा आवश्यक: डॉ. जॉन वॉलेस वॅन डोरेने

शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. जॉन वॉलेस वॅन डोरेने. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. व्ही. वाय. धुपदाळे, कुलगुरू डॉ. सी.एस. पाटील आणि डॉ. जी.एम. वाघ.


विद्यापीठात चौदा दिवसीय आंतरराष्ट्रीय विधी कार्यशाळेस प्रारंभ
 कोल्हापूर, दि. १० एप्रिल: जागतिक स्तरावर आज अत्यंत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक समुदायाला भेडसावणारे अनेक प्रश्न मानवजातीसमोर उभे ठाकले आहेत. अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या समग्र संवेदनशील विषयांवर सांगोपांग चर्चा होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या स्कू ऑफ लॉ येथील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ.जॉन वॉलेस वॅन डोरेने यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विधी अधिविभागामार्फत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील व्हर्चुअल क्लासरुममध्ये चौदा दिवसीय (दि.१० ते २४ एप्रिल) आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या द्घाटन समारंभात डॉ. वॅन डोरेने बोलत होते. यावेळी हुबळीच्या कर्नाटका स्टेट लॉ युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. सी.एस. पाटील अध्यक्षस्थानी होत.
यावेळी डॉ. वॅन डोरेने म्हणाले, जगातील सध्याच्या घडामोडींसह भ्रष्टाचार, फाशीची शिक्षा, समलैंगिक अधिकार, गर्भपात, बोलण्याचा निषेध करण्याचा अधिकार, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे संरक्षण, स्थलांतर यासारखे अनेक संवेदनशील विषय आपल्यासमोर आहेत. त्यांच्याविषयी जागतिक स्तरावर सकारात्मक चर्चा होऊन योग्य पद्धतीचा तोडगा काढणे आवश्यक आहे. अशा चर्चेसाठी सर्वच राष्ट्रांनी तितकाच सकारात्मक प्रतिसाद देणेही अपेक्षित आहे. समताधिष्ठित जागतिक समुदायाच्या निर्मितीचे उद्दिष्ट घेऊन समस्त प्रमुख राष्ट्रांनी आता एका व्यासपीठावर येऊन सांविधानिक मार्गांचा अवलंब करून दुष्प्रवृत्ती नष्ट करण्याच्या दृष्टीने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तसे न झाल्यास मानवजातीच्या अस्तित्वासमोरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहील.
यावेळी कुलगुरु डॉ. सी.एस. पाटील म्हणाले, संविधानाप्रती अढळ विश्वास हा लोकशाहीचा खरा पाया आहे. त्यामुळेच लोकशाहीचे कामकाज सुव्यवस्थितपणे चालू आहे. भारतीय संविधान हा आपल्या देशाचा वारसाच नव्हे, तर आपल्या जीवनाच मार्गदर्शक आहे.
यावेळी आर.एल.लॉ कॉलेज, बेळगांव येथील डॉ.जी.एम.वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. विधी अधिविभागप्रमुख डॉ. व्ही.वाय. धुपदाळे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. आर. नारायणा यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. यावेळी विधी तज्ज्ञ, संशोधक विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment