शिवाजी विद्यापीठात आयोजित अधिकार मंडळांच्या एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर. |
विद्यापीठात ‘अधिकार मंडळांच्या
कार्यपद्धती’विषयी एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात
कोल्हापूर, दि. ५
एप्रिल: विद्यापीठामधील सर्व अधिकार मंडळे, सभागृहे ही शैक्षणिक स्वरुपाची आहे, हा
महत्त्वाचा संकेत ध्यानी ठेवून या सभागृहांमध्ये ज्ञानाधिष्ठित चर्चा व्हावी, अशी
अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त
केली.
महाराष्ट्र सार्वजनिक
विद्यापीठे कायदा-२०१६ नुसार नव्याने अस्तित्वात आलेल्या अधिसभा, विद्यापरिषद आणि
व्यवस्थापन परिषद यांसह विविध अधिकार मंडळांच्या सदस्यांना अधिनियम, परिनियम,
विविध अधिकार, नियम, संकेत आदींविषयी अवगत करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात आज ‘अधिकार मंडळांची
कार्यपद्धती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यापीठाच्या
वि.स. खांडेकर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शिंदे
यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
Dr. Devanand Shinde |
कुलगुरू डॉ. शिंदे
म्हणाले, विद्यापीठ कायदा हा अत्यंत विद्यार्थीकेंद्री असून संशोधनास चालना,
उद्योगांसमवेत सहकार्यवृद्धी आणि सामाजिक जबाबदारीचे भान अधोरेखित करणारा आहे. या
चतुःसूत्रीच्या आधारे क्षमता संवर्धन (कॅपॅसिटी बिल्डींग) करण्याच्या दृष्टीने
सर्वच अधिकार मंडळांनी कार्य करणे अभिप्रेत आहे. त्यासाठी कायदा आणि उपरोक्त चार
स्तंभांच्या आधारे व्यवस्था समजून घेण्याची मानसिकता निर्माण व्हायला हवी.
त्याद्वारे कायदा जाणीवपूर्वक समजून घ्या आणि आपल्या सहकाऱ्यांनाही समजून सांगा.
ही कायदा समजून घेण्याची प्रक्रिया निरंतर असून त्याचा अभ्यास आणि त्या अभ्यासाचा
स्वतःबरोबरच इतरांना आणि व्यवस्थेला सकारात्मक लाभ करून देणे ही अत्यंत महत्त्वाची
बाब आहे.
विद्यापीठाचे चार वैधानिक
अधिकारी हे चार महत्त्वाची महाद्वारे आहेत, याची जाणीव करून देताना कुलगुरू डॉ.
शिंदे पुढे म्हणाले, विद्यापीठाच्या अधिकार मंडळांवर विविध क्षेत्रांतील गुणवंत,
अनुभवी व ज्ञानी सदस्यांचा समावेश आहे. त्यांची निवड ही त्यांची गुणवत्ता व
क्षमतेच्या बळावरच झालेली आहे, याचे भान सदस्यांनी जपणे गरजेचे आहे. या सदस्यांनी शैक्षणिक
बाबींसंदर्भात प्र-कुलगुरू यांच्याशी, प्रशासकीय बाबींसंदर्भात कुलसचिवांशी,
परीक्षाविषयक बाबींसाठी परीक्षा व मूल्यमापन संचालकांशी तसेच वित्तविषयक बाबींच्या
माहितीसाठी वित्त व लेखाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास प्राधान्य द्यावे.
विद्यापीठाच्या या सर्व अधिकाऱ्यांशी अधिकार मंडळ सदस्यांचा थेट संवाद प्रस्थापित होणे
गरजेचे आहे. आपल्या सूचना, समस्या, प्रश्नांची मांडणी करणे जितके महत्त्वाचे,
तितकेच त्यासाठीचा पाठपुरावाही महत्त्वाचा आहे. विद्यापीठीय अधिकार मंडळांच्या
निर्मितीमागे कायद्याने विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे लक्ष्य बाळगले असून त्याच्या
साफल्याच्या दृष्टीने अधिकार मंडळ सदस्यांनी कार्यरत राहायला हवे. असे
क्षमताधिष्ठित सदस्य घडविणे, हाच या कार्यशाळेच्या आयोजनामागील प्रमुख हेतू
असल्याचेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन
मंडलाचे संचालक महेश काकडे उपस्थित होते. कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी मान्यवरांचे
ग्रंथभेट देऊन स्वागत केले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून कार्यशाळेचे
उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेस विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांचे सदस्य,
प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment