Showing posts with label Dr. Devanand Shinde. Show all posts
Showing posts with label Dr. Devanand Shinde. Show all posts

Monday, 3 June 2019

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे

औरंगाबाद विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार



Dr. Devanand Shinde
कोल्हापूर, दि. ३ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त प्रभारी कार्यभार सोपविण्यात येत असल्याचा आदेश कुलपती कार्यालयाकडून आज प्राप्त झाला आहे. कुलगुरू डॉ. शिंदे उद्या (दि. ४ जून) कार्यभार स्वीकारतील.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे तिसरे विद्यापीठ आहे. यापूर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या दोन विद्यापीठांच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभारही सांभाळला आहे. औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने पुढील आदेश होईपर्यंत डॉ. शिंदे यांच्याकडे तेथील प्रभारी कार्यभार असणार आहे.
या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ज्या मातृसंस्थेत मी शिकलो, जिथे वाढलो, जिच्या बळावर कुलगुरू पदापर्यंत मजल मारू शकलो, त्या मातृसंस्थेच्या कुलगुरूपदी काम करण्याची संधी मा. कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांनी दिली, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. त्यासाठी कुलपती महोदयांचा मी मनापासून ऋणी आहे. ही संधी मिळण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मोलाचा वाटा आहे, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्यामुळेच मला अन्यत्रही कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे, याविषयी मी कृतज्ञ आहे. विशेष म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर या त्रयींच्या कर्मभूमीमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी दिलेली समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची पालखी घेऊन ज्ञानमार्गावरुन वाटचाल करता येते आहे, याचे मोठे समाधान वाटते, अशी भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.

Thursday, 27 December 2018

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना यंदाचा

प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते १२ जानेवारीला प्रदान समारंभ



कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची माहिती

Dr. N. D. Patil
कोल्हापूर, दि. २७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना आज जाहीर करण्यात आला. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शनिवार, दि. १२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (स्व.) प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्काराची संयुक्त निर्मिती करण्यात आली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव (२०१६), रयत शिक्षण संस्था (२०१७), ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल (२०१८) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती देताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नेते व विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडणीत डॉ. एन.डी. पाटील यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. समाजकारणासाठी राजकारणाचा वापर करणाऱ्या एका ध्येयनिष्ठ विचारवंतांच्या फळीचे ते प्रतिनिधी आहेत. नैतिकता हा त्यांच्या प्रत्येक कार्याचा आणि आंदोलनाचा प्रमुख कणा आहे. त्या बळावरच त्यांनी अगदी अलिकडच्या टोल हटाव आंदोलनापर्यंतची अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, शेतकरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची चळवळ असो किंवा आजही अव्याहत सुरू असलेला कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमाप्रश्नाचा लढा असो, डॉ. पाटील यांनी या साऱ्या चळवळींना प्राप्त करून दिलेले नैतिक अधिष्ठान ही फार मोलाची बाब आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आग्रही असणाऱ्यांत आघाडीवर असलेल्या डॉ. पाटील यांनी स्थापनेनंतरच्या कालखंडातही विद्यापीठाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीच्या सदस्यत्वापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे अधिसभा सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता असा अनेकांगांनी झाला. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या योगदानाबद्दल सन २००६मध्ये विद्यापीठाची सर्वोच्च मानद पदवी डी.लिट. देऊन त्यांचा गौरव केला आहे.

यावेळी शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले की, समितीच्या अवघ्या एकाच बैठकीत आणि एकमताने यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. एन.डी. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकारिता आणि शिक्षण या पाच क्षेत्रांत अधिकारपूर्ण आणि सहज वावर असणारे हे व्यक्तीमत्त्व आहे. संविधान आणि कायद्याच्या शिस्तीतच त्यांनी आपला संघर्ष मांडला. रायगड येथील विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी (सेझ) संपादित केलेल्या सुमारे ३६ हजार एकर जमिनीसाठीचा लढा हा ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. छोट्या छोट्या शेतकऱ्यांना संघटित करून व्यवस्थेविरुद्ध अशा प्रकारचा लढा यशस्वी करणे सहजशक्य बाब नव्हती. मात्र पाटील सरांनी केवळ आपल्या शिस्तबद्ध व्यूहरचनेच्या बळावर तो यशस्वी केला. अद्यावत संदर्भांच्या अभ्यासासह भूमिका घेण्याचा त्यांचा गुणधर्म हा एकमेवाद्वितिय स्वरुपाचा आहे. त्यांना पुरस्कार देताना होणारा आनंद हा त्यामुळे खूप मोठा आहे.


यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील, प्राचार्य डॉ. बी.ए. खोत आदी उपस्थित होते.



डॉ. एन.डी. पाटील यांचा संक्षिप्त परिचय


संपूर्ण नाव : डॉ. नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ ढवळी (नागाव), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म
शिक्षण : एम.ए. (अर्थशास्त्र), पुणे विद्यापीठ, (१९५५); एल.एल.बी. पुणे विद्यापीठ (१९६२)
अध्यापन कार्य:
  • १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच कमवा व शिकाया योजनेचे प्रमुख व रेक्टर
  • १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य:
  • शिवाजी विद्यापीठ पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य (१९६२)
  • शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य (१९६५)
  • शिवाजी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य (१९६२-१९७८)
  • शिवाजी विद्यापीठ सामाजिकशास्त्र विभागाचे डीन (१९७६-१९७८)
  • सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य (१९९१)
  • रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- (१९५९ पासून)
  • रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – (१९९० पासून)
  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – (१९८५ पासून)
राजकीय कार्य:
  • १९४८ शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
  • १९५७ मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
  • १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी एकूण १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
  • १९६९- १९७८, १९८५ २०१० शे.का.प.चे सरचिटणीस
  • १९७८-१९८० सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी)
  • १९९९-२००२ निमंत्रक, लोकशाही आघाडी सरकार
  • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते.
मिळालेले सन्मान / पुरस्कार:
  • भाई माधवराव बागल पुरस्कार (१९९४)
  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड डी.लीट.पदवी (१९९९)
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद) भारत सरकार (१९९८ २०००)
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ डी.लीट. पदवी (२०००)
  • विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद (२००१)
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर डी.लीट. पदवी (२००६)
  • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे:
  • रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल- सदस्य
  • समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी उपाध्यक्ष
  • अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र अध्यक्ष
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा अध्यक्ष
  • जागतिकीकरणविरोधी कृती समिती मुख्य निमंत्रक
  • म.फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर अध्यक्ष
  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, बेळगाव अध्यक्ष
  • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन:
  • समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
  • शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका) (१९६२)
  • काँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका) (१९६२)
  • शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका) (१९६३)
  • वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट (पुस्तिका) (१९६६)
  • महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे (White Paper) कृष्णस्वरूप (पुस्तिका) (१९६७)
  • शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत (पुस्तक) (१९७०)
  • शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी? (पुस्तिका) (१९९२)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (पुस्तिका)
  • नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण, (२००१) (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने)
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य:
  • चेअरमन पदाच्या काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा, साखरशाळा, नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षक केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिकाया योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्रे, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना यांची राबवणूक, दुर्बल शाखा विकास निधी, महर्षी वि. रा. शिंदे अध्यासन केंद्र आदींची स्थापना, कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती. 
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

Tuesday, 19 June 2018

आंतरराष्ट्रीय कुलगुरू परिषदेसाठी डॉ. देवानंद शिंदे तैवानला रवाना



Dr. Devanand Shinde
कोल्हापूर, दि. १९ जून: तैवान येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडो-तैवान कुलगुरू परिषदेसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे काल तैवानला रवाना झाले.
तैवान सरकार, तैपेई इकॉनॉमिक एन्ड कल्चरल सेंटर इन इंडिया (टीईसीसी) यांचा शिक्षण विभाग आणि भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) यांच्या संयुक्त विद्यमाने तैवानच्या राष्ट्रीय त्सिंग हुआ विद्यापीठात येत्या २१ जून रोजी इंडो-तैवान कुलगुरू परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी एआययूचे अध्यक्ष प्रा. पी.बी. शर्मा आणि सरचिटणीस प्रा. फुरकान कमर यांच्या नेतृत्वाखाली देशातील विविध विद्यापीठांच्या ११ कुलगुरूंचे शिष्टमंडळ रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात राज्य अकृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
या परिषदेत भारत आणि तैवान या दोन देशांमधील उच्चशैक्षणिक सहसंबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय उच्चशिक्षण क्षेत्रांतील विविध प्रवाहांचा वेध घेण्याच्या दृष्टीने विविध सत्रांत सर्वंकष चर्चा करण्यात येणार आहे.
कुलगुरू परिषदेत सहभागी होण्याबरोबरच भारतीय कुलगुरूंचे शिष्टमंडळ नॅशनल तैपेई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल त्सिंग हुआ युनिव्हर्सिटी, नॅशनल सिंक्रोट्रॉन रेडिएशन रिसर्च सेंटर (एनएसआरआरसी), नॅशनल तैवान युनिव्हर्सिटी, नॅशनल पॅलेस म्युझियम, नॅशनल शिएँग काई-शेक मेमोरियल हॉल आदी शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देणार आहेत.

तैवानची उच्चशिक्षण व्यवस्था अभ्यासण्याची संधी: कुलगुरू डॉ. शिंदे
इंडो-तैवान आंतरराष्ट्रीय कुलगुरू परिषदेच्या निमित्ताने तैवानमधील उच्चशिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करण्याची एक महत्त्वाची संधी चालून आली आहे. तैवान येथील उच्चशिक्षण संस्था, विद्यापीठे, संशोधन व विकासाची यंत्रणा, त्यांमधील संधी आदी बाबींची माहिती घेणे आणि उभय देशांतील शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा महत्त्वाचा ठरेल, असे मत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.

Friday, 20 April 2018

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना एनसीसीचे मानद कर्नलपद



२६ एप्रिल रोजी विशेष प्रदान सोहळ्याचे आयोजन 
 

Dr. Devanand Shinde
 कोल्हापूर, दि. २० एप्रिल: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन.सी.सी.मध्ये कर्नल कमांडंट या मानद कर्नलपदाचा बहुमान प्रदान करण्याचा निर्णय एनसीसीच्या केंद्रीय मुख्यालयाकडून घेण्यात आल्याचे विद्यापीठास कळविण्यात आले आहे. येत्या गुरूवारी (दि. २६ एप्रिल) विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. शिंदे यांना विशेष सोहळ्याद्वारे कर्नलपदाचा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली आहे.

कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय छात्र सेनेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयाकडून विद्यापीठाच्या कुलगुरूंना एनसीसीचे मानद कर्नलपद प्रदान केले जाते. एनसीसीच्या विविध उपक्रमांना विद्यापीठ परिक्षेत्रात प्रोत्साहन व चालना देण्यामधील कुलगुरूंची प्रमुख भूमिका लक्षात घेऊन हा बहुमान त्यांना देण्यात येत असतो. त्यानुसार शिवाजी विद्यापीठास मुंबईस्थित एनसीसी महाराष्ट्र महासंचालनालयाचे अपर महासंचालक मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांच्याकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. कोल्हापूर ग्रुपचे एनसीसी प्रमुख ब्रिगेडियर पी.एस. राणा, कर्नल एम.आर. चौधरी, कर्नल एफ.एफ. अंकलेश्वरा आणि ऑनररी मेजर रुपा शहा यांनी कुलगुरूंची प्रत्यक्ष भेट घेऊन हे पत्र त्यांना प्रदान केले. त्यानुसार, एनसीसीतर्फे येत्या गुरूवारी (दि. २६ एप्रिल) सकाळी १० वाजता विद्यापीठात विशेष गार्ड ऑफ ऑनर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांना अत्यंत सन्मानपूर्वक मानद कर्नलपद प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी कुलगुरू एनसीसीच्या छात्रांकडून सलामी स्वीकारतील. त्यानंतर कुलगुरू पत्रकार परिषदेस संबोधित करतील, अशी माहितीही कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिली.

 

Wednesday, 21 June 2017

शिवाजी विद्यापीठाच्या योग शिबिरात १५०० साधकांचा सहभाग



शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन उपक्रमाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. छायाचित्रात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव, माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. आर.आर. देशपांडे, डॉ. संदीप पाटील आदी.


योग साधना करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

योग शिबिरात सहभागी झालेले मान्यवर.







शिवाजी विद्यापीठाच्या योग शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झालेले योग साधक.

कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठ श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लोककला सभागृहात गेली दोन वर्षे सुरू असलेल्या मोफत योग शिबीराचा द्विवर्षपूर्ती समारंभ तसेच तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सकाळी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दैनिक महाराष्ट्र टाइम्स परिवारही आजच्या योग दिन उपक्रमात सहभागी झाला. आजच्या विशेष योग शिबिरात सुमारे १५०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह आबालवृद्धांचा समावेश होता.
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज शिवाजी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते ९ या वेळेत पार पडला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून 'योगशक्ती - योगयज्ञ'अंतर्गत योग प्रशिक्षण कार्यक्रम सलग दोन वर्षे राबविण्यात येत आहे. या योग उपक्रमाचा दैनंदिन २००हून अधिक साधक लाभ घेतात.
या वेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, या दोन वर्षांत नागरिकांमध्ये योगसाधनेविषयी जागृती निर्माण करण्याबरोबरच त्यांना योगसाधना करण्यास प्रवृत्त करण्यात शिवाजी विद्यापीठ यशस्वी झाले आहे, याचे समाधान वाटते. साधकांचा हा प्रतिसाद पाहता हे मोफत योग शिबीर कणेरी मठाच्या सहकार्याने या पुढेही राबविण्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी जाहीर केले.
यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव यांनी, या निरंतर योग शिबिराच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूरच्या नागरिकांशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडले गेले आहे, याबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमात सहभागी होताना टाइम्स समूहास अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. अॅस्टर आधार हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पाटील यांनी हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाच्या दक्षता या विषयी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.डी. शिंदे, महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय जाधव, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, माणिकराव पाटील-चुयेकर, अॅस्टर आधार हॉस्पिटलचे संचालक आर.आर. देशपांडे, डॉ. संदीप पाटील, महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर गुरूबाळ माळी यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी सेवक उपस्थित होते.
यावेळी योग प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली. यापुढील काळातही साधकांनी दररोज सकाळी ६.३० ते ७.३० या कालावधीत विद्यापीठाच्या लोककला सभागृहात निरंतर मोफत योग शिबिराचा उत्तम आरोग्यासाठी जरुर लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. दिव्यांग असूनही विद्यापीठाच्या योग शिबिरात सलग दोन वर्षे सहभागी होणारे योग साधक सुरेश माने यांचा यावेळी कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. आर.व्ही. गुरव यांनी स्वागत तर डॉ. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र मकोटे यांनी सूत्रसंचालन केले, तर शिरीष देसाई यांनी आभार मानले.