Friday 29 April 2022

धर्माधारित संकुचित विचारधारा देशहितासाठी घातक: डॉ. अशोक चौसाळकर

 

शिवाजी विद्यापीठात 'गांधी विचार: आकलन व औचित्य' या त्रिखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन करताना डॉ. किशोर बेडकीहाळ, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अरूण भोसले आणि डॉ. भारती पाटील.


‘गांधी विचार: आकलन व औचित्य’ या त्रिखंडात्मक ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

 

कोल्हापूर,  दि. २९ एप्रिल: धर्मावर आधारित संकुचित विचारधारा राजकीय सत्ता मिळवून देईल, पण अंतिमतः देशहितासाठी ती घातक ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने ‘गांधी विचार: आकलन व औचित्य’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ‘गांधी विचार: समकालीन संदर्भ’ या विषयावर ते बोलत होते.

कार्यशाळेत ‘गांधी विचार: आकलन व औचित्य’ या त्रिखंडात्मक ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ. अशोक चौसाळकर व किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते करण्यात आले. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुण भोसले होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असला पाहिजे. राजकीय पक्षांतर्गत लोकशाही असली पाहिजे. परंतु आज असे दिसून येत नाही. जातीय आणि धार्मिक सौहार्द बिघडविण्याचे प्रयत्न होत आहेत. यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते आहे. महात्मा गांधींनी आयुष्यभर अशा कुरापतखोर राज्यकर्त्यांचा विरोध केला. धर्म आणि राष्ट्र याबाबत महात्मा गांधींची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी धर्मावर आधारित राष्ट्रवादाचा कधीही पुरस्कार केला नाही. त्यांचे विचार समाजात दुही पसरवणारे नव्हे, तर ऐक्य निर्माण करणारे आहेत.

अध्यक्षीय मनोगतात डॉ भोसले म्हणाले, गांधीविचार साचेबद्ध आणि बंदिस्त नाहीत, तर ते प्रवाही व मानवजातीच्या प्रगतीसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. हे विचार आजच्या काळात कधी नव्हे इतके औचित्यपूर्ण बनले आहेत.’

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात किशोर बेडकिहाळ यांनी गांधीजींची धर्मकल्पना आणि आजचे वास्तव या विषयावर, तर तिसऱ्या आणि चौथ्या सत्रामध्ये अनुक्रमे गांधीजींचा राष्ट्रवाद व चौथी औद्योगिक क्रांती या विषयांवर डॉ. चैत्रा रेडकर व विजय तांबे यांनी मांडणी केली. या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक सहभागी झाले.

साधना प्रकाशनाच्या गांधींवरील त्रिखंडात्मक ग्रंथांचे संपादन किशोर बेडकिहाळ, डॉ. अशोक चौसाळकर व रमेश ओझा यांनी केले आहे. याप्रसंगी डॉ. चैत्रा रेडकर व डॉ. भारती पाटील यांनी तिन्ही खंडांवर मनोगत व्यक्त केले. केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सचिन भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment