कोल्हापूर, दि. ४ एप्रिल: महाराष्ट्राचे मा. राज्यपाल तथा
शिवाजी विद्यापीठाचे कुलपती श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्या,
मंगळवारी (दि. ५ एप्रिल) विद्यापीठाच्या ५८व्या दीक्षान्त समारंभात घोषित करण्यात
आलेली राष्ट्रपती व कुलपती यांची सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच, शहीद तुकाराम ओंबाळे विशेष
पारितोषिकही प्रदान करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू
सभागृहात उद्या दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती प्रभारी कुलसचिव
डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी दिली आहे.
कुलसचिव डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचा ५८वा दीक्षान्त समारंभ शनिवार, दि. ५ मार्च २०२२ रोजी मा. कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके यांच्या प्रमुख
उपस्थितीत ऑनलाईन स्वरुपात पार पडला. या समारंभात एकूण ६२,३६० स्नातकांना
पदवी प्रदान करण्यात आल्या. तसेच
विद्यापीठाच्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कुलपती सुवर्णपदक प्राप्त
स्नातकांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात क्रीडा, बौद्धिक व कला क्षेत्र आणि एनसीसी, एनएसएस यांमधील गुणवत्ता तसेच व्यक्तीमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण ज्ञान, वागणूक व नेतृत्व
गुण यामध्ये आदर्श ठरल्याबद्दल विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागात द्वितिय
वर्षात शिकणाऱ्या श्रीमती ऐश्वर्या आकाराम मोरे (मु.पो. वडरगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या विद्यार्थिनीस शिवाजी विद्यापीठाचे
राष्ट्रपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे एम.ए. (हिंदी) परीक्षेत
सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या
श्रीमती स्वाती गुंडू पाटील (मु.पो. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर)
या विद्यार्थिनीस कुलपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले. या दोन्ही विद्यार्थिनींना कुलपती श्री. कोश्यारी यांच्या
हस्ते सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील केंट क्लब, कोल्हापूर निर्मित ‘शहीद तुकाराम ओंबाळे विशेष कला, साहित्य, सांस्कृतिक प्रावीण्य पारितोषिक व
स्मृतिचिन्ह’ मयुरेश मधुसुदन शिखरे (विवेकानंद
महाविद्यालय, कोल्हापूर) या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहितीही
कुलसचिव डॉ. शिंदे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' (https://www.youtube.com/c/ShivVarta) या युट्यूब वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment