शिवाजी विद्यापीठात आयोजित प्राचार्यांच्या विशेष बैठकीत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित प्राचार्यांच्या विशेष बैठकीत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. समोर उपस्थित प्राचार्य व प्रतिनिधी. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीस उपस्थित प्राचार्य व प्रतिनिधी. |
शिवाजी विद्यापीठात प्राचार्यांची एकदिवसीय विशेष बैठक
कोल्हापूर, दि. ७
एप्रिल: नजीकच्या काळात
शैक्षणिक क्षेत्राला नव्या धोरणासह अनेकविध बदलांना सामोरे जावे लागणार आहे.
त्यासाठी महाविद्यालयांनी आपल्या क्षमता ओळखून त्या अधिक वृद्धिंगत करण्याकडे लक्ष
केंद्रित करणे आवश्यक आहे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात आयोजित प्राचार्यांच्या विशेष एकदिवसीय बैठकीच्या उद्घाटन
सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि प्रभारी
कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केव्हाही लागू होऊ
शकते. त्या दृष्टीने विद्यापीठ तयार आहे. महाविद्यालयांनीही तयारीत राहावे. मात्र,
या धोरणापलिकडेही अनेक नवनव्या अभ्यासक्रम, योजना, उपक्रम आणि मूल्यमापनाच्या अभिनव
पद्धती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून येत आहेत. या बदलांचा नियमित आढावा
घेण्यासाठी आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी महाविद्यालयांनी त्यांच्या
स्तरावर एक स्वतंत्र कक्ष निर्माण करावा. युजीसीकडून वेळोवेळी वेगवेगळे मसुदे
वेबसाईटवर ठेवले जातात. त्यांच्याविषयी चर्चा करून महाविद्यालयांनी आपली मते,
सूचना, अभिप्राय युजीसीला द्यायला हवीत. विद्यापीठाच्या पत्रांची वाट न पाहता
विद्यापीठालाही आवश्यक तेथे विधायक सूचना कराव्यात. या सूचनांचे स्वागतच करण्यात
येईल. त्या दृष्टीने महाविद्यालयांनी तयारी करणे आवश्यक आहे.
कुलगुरू डॉ. शिर्के पुढे म्हणाले, अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी) मुळे विद्यार्थी
कोणत्याही विद्याशाखेतील असला तरी त्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम शिकण्याची
मुभा असणार आहे. त्याद्वारे ते त्यांचे ५० टक्क्यांपर्यंतचे क्रेडिट्स प्राप्त करू
शकतात. त्यामुळे आपला विद्यार्थी अन्य ठिकाणच्या अभ्यासक्रमांकडे आकर्षिला जाणे
स्वाभाविक आहे. तथापि, आपणही अन्य ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आवडतील, आकर्षित
करतील, अशा अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याची गरज आहे. ज्या विषयात आपण सक्षम
आहोत, ते अधिक उत्तम व दर्जेदार पद्धतीने विकसित करावेत. त्या माध्यमातून आपले
स्वतंत्र असे अस्तित्व आणि स्थान निर्माण करावे. एखाद्या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी
एखाद्या विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा, असे विद्यार्थ्याला वाटण्याजोगे
वातावरण निर्माण करावे. तेव्हाच या स्पर्धात्मक वातावरणात आपले अस्तित्व अबाधित
राहू शकेल.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी आपल्या स्वागत व
प्रास्ताविकात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने येऊ घातलेल्या आव्हाने, संधी
आणि लाभ या अनुषंगाने तपशीलवार मांडणी केली. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले. कोविड-१९च्या साथीमुळे सुमारे दोन
वर्षांच्या खंडानंतर प्रथमच ऑफलाईन स्वरुपात प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात
आली. बैठकीस मोठ्या संख्येने प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment