तीन जणांच्या चमूत शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. तुकाराम डोंगळे यांचा सहभाग
डॉ. तुकाराम डोंगळे |
प्रा. सुनील कदम |
प्रा. सचिन चव्हाण |
कोल्हापूर, दि. २५ एप्रिल: शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागातील डॉ. तुकाराम डोंगळे यांच्यासह येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या मेकॅनिकल इंजीनिअरिंग शाखेचे विभाग प्रमुख प्रा. सुनील कदम तसेच पुणे येथील भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रा. सचिन चव्हाण यांना “प्रोब स्टेशन फॉर मेजरींग सेमी-कंडक्टर डिव्हाइसेस” या उपकरणासाठी पेटेंट प्राप्त झाले आहे.
सदरचे उपकरण अत्यंत कमी खर्चात तयार करण्यात आले असून त्याचा उपयोग सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे विविध गुणधर्म तपासण्यासाठी होणार आहे. हे उपकरण सूक्ष्म डिव्हाइसेस जसे की, ट्रान्झिस्टर, एलईडी, डायोड आणि मेमरी डिवाइस यांचे गुणधर्म तपासण्यासाठी उपयुक्त होऊ शकतो. सदरचे उपकरण आपल्याला सध्या अन्य देशांतून आयात करावे लागते. परंतु स्वदेशी बनावटीच्या या उपकरणाच्या निर्मितीमुळे यावरील आयात खर्चही वाचविता येणे शक्य होणार आहे.
सदरच्या उपकरणांमध्ये एकूण सात प्रमुख घटक आहेत. यामध्ये बेस, चक, प्लॅन्टन, कॅमेरा, तापमान नियंत्रक व मायक्रो मॅनिप्युलेटर यांचा समावेश आहे. या उपकरणाचा उपयोग सध्या शिवाजी विद्यापीठातील नॅनोसायन्सचे बी. एस्सी, एम. एस्सी. व संशोधक विद्यार्थी आपल्या संशोधनासाठी करत असून अनेक विद्यार्थ्यांनी आपले संशोधक प्रकल्प पूर्ण केले आहेत. अशा प्रकारे सदरचे उपकरण हे नॅनोसायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रामधील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन वृद्धीसाठी उपयुक्त ठरत आहे. अशा प्रकारच्या संशोधनातून अधिकाधिक उपयुक्त साधनसुविधांची निर्मिती होणेही अपेक्षित
आहे.
सदरचे पेटंटबाबत महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री तथा सेक्रेटरी, भारती विद्यापीठ, पुणे डॉ. विश्वजीत कदम, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत तसेच भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment