कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना एनसीसीच्या मानद कर्नल पदाचा बॅज प्रदान करताना ब्रिगेडियर समीर साळुंखे व कर्नल डी.एस. सायना. |
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना एनसीसीच्या मानद कर्नल पदाची बॅटन प्रदान केल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना ब्रिगेडियर समीर साळुंखे. |
एनसीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत मानद कर्नल तथा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
मानद कर्नलपद स्वीकारल्यानंतर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत कुलगुरू डॉ. शिर्के. |
कोल्हापूर, दि. ७ एप्रिल: राष्ट्रीय छात्र
सेनेच्या (एन.सी.सी.) राष्ट्रीय मुख्यालयामार्फत मानद कर्नलपद बहाल करण्यात येणारे
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के हे महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांमधील एकमेव कुलगुरू आहेत, अशी
माहिती एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर समीर साळुंखे यांनी आज येथे दिली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांना आज सकाळी राष्ट्रीय छात्र सेनेचे (एन.सी.सी.) मानद कर्नलपद प्रदान
करण्याचा समारंभ पार पडला. या समारंभात ते
बोलत होते.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील,
कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह एनसीसी, कोल्हापूर ग्रुपचे
ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल समीर मोहिते, लेफ्टनंट कर्नल एस.बी. सरनाईक, कर्नल
डी.एस. सायना, कर्नल एस. गणपती, कर्नल मंजुनाथ हेगडे, कर्नल विजयन थोरात आदी
उपस्थित होते.
ब्रिगेडियर साळुंखे म्हणाले, नवी दिल्ली येथील एनसीसी मुख्यालयाला मानद कर्नलपदासाठी गत वर्षी देशभरातून
एकूण सोळा कुलगुरूंच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. तथापि, त्यापैकी अवघ्या
सहा नावांना मंजुरी मिळाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन कुलगुरूंचा समावेश आहे. त्यात शिवाजी विद्यापीठाचे डॉ.
शिर्के आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
संजय सावंत यांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाने सदैव एनसीसीला प्रोत्साहन
देण्याची भूमिका स्वीकारली आहे. यामुळे या विद्यापीठाच्या कुलगुरूंना मानद कर्नलपद
बहाल करताना अवर्णनीय आनंद होतो आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मानद कर्नल तथा कुलगुरू
डॉ. शिर्के म्हणाले, एनसीसी ही भारतीय लष्करापेक्षाही अधिक युवकांची
संख्या असणारी शिस्तबद्ध संघटना असून प्रशिक्षित व देशप्रेमाने भारित नागरिक
निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने नेहमीच एनसीसीला प्रोत्साहन
दिले आहे. विविध शिबिरे आणि अन्य उपक्रम यांमुळे परीक्षांना मुकणाऱ्या एनसीसी
छात्रांची फेरपरीक्षा घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान न होऊ देण्याची दक्षता
विद्यापीठाकडून घेतली जाईल. त्याचप्रमाणे या छात्रांनी सशस्त्र सैन्यदलातही अधिकारीपदी
जावे, यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) परीक्षांची तयारी करवून
घेण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या कामी ब्रिगेडियर साळुंखे आणि
त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्या कामी विद्यापीठ सर्वोतोपरी सहकार्य
करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कुलगुरूंच्या दालनात झालेल्या या समारंभात ब्रिगेडियर साळुंखे यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. शिर्के यांना एनसीसीच्या इतमामाप्रमाणे
मानद कर्नलपदाचे बॅज आणि एनसीसी बॅटन प्रदान करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व एनसीसी अधिकारी व छात्र यांनी
त्यांना मानवंदना देऊन अभिनंदन केले. या कार्यक्रमानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी
सर्व उपस्थितांसह विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास
पुष्प वाहून अभिवादन केले.
यावेळी कॅप्टन डॉ. सुधाकर खोत यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर कॅप्टन सुनिता भोसले यांनी आभार मानले. शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड आणि मेजर डॉ. ए.एन. बसुगडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. आर.जी. कुलकर्णी, आयक्यूएसी संचालक डॉ. एम.एस. देशमुख, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. ए.एम. गुरव, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. नमिता खोत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment