Friday 22 April 2022

शिवाजी विद्यापीठाचा ‘आयसीटी’समवेत सामंजस्य करार

 

ICT, Mumbai


 

कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी, मुंबई) यांचा येथील शिवाजी विद्यापीठासमवेत झालेल्या सामंजस्य कराराचा लाभ या दोन्ही शैक्षणिक व संशोधकीय संस्थांमधील प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर घटकांनाही होईल, अशी अपेक्षा आयसीटीचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या विविध विज्ञान विभागांत, सैफ-सीएफसी (SAIF-CFC) येथे आणि आयसीटीच्या विविध कॅम्पसमध्ये उपलब्ध असणारी अत्याधुनिक उपकरणे वापरण्यासाठीचे कौशल्यही त्यांना परस्परपूरक स्वरुपाचे ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठ आणि आयसीटी, मुंबई यांच्या दरम्यान १२ एप्रिल २०२२ रोजी पाच वर्षांच्या कालावधीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि आयसीटीच्या संशोधन व नवोन्मेष विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. पद्मा व्ही. देवराजन यांनी स्वाक्षरी केल्या.

संयुक्त संशोधनपर व शैक्षणिक उपक्रम या संदर्भातील देवाणघेवाण हा या सामंजस्य कराराचा प्रमुख हेतू आहे. यातून नवीन तंत्रज्ञानवर्धित संशोधन अपेक्षित आहे. या करारामध्ये गरजेनुसार अन्य विज्ञान अधिविभागांना सामावून घेण्याचीही अगर स्वतंत्र करार करण्याचीही तरतूद आहे.

आता या सामंजस्य करारामुळे, दोन्ही विद्यापीठांनी विविध संशोधन उपक्रम सुरू केले आहेत त्याचे प्रस्ताव निधी संस्थांकडे सादर केले जातील. दोन्ही संस्थांमधील या समान स्वारस्य असणाऱ्यांना या सामंजस्य करारामुळे संयुक्त संशोधन आणि प्रकाशनाला आणखी गती मिळेल.

कराराच्या अनुषंगाने माहिती देताना पदार्थविज्ञान अधिविभागाचे डॉ. आर.जी. सोनकवडे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आयसीटीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहकार्याने कौशल्य विकास करवून ज्ञान वाढवण्यासाठी हा करार नक्कीच उपयुक्त ठरेल. संयुक्त संशोधन आणि प्रकाशनांच्या शक्यता विकसित करण्यासाठी संयुक्त चर्चासत्रे, परिषदा आणि कार्यशाळा आयोजित करून प्रशासन आणि व्यवस्थापनाशी संबंधित अनुभव आणि कौशल्याची देवाणघेवाण केली जाणेही याअंतर्गत अभिप्रेत आहे.

या कराराच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आयसीटी ही राज्यातील एक महत्त्वपूर्ण संशोधन संस्था असून त्यांच्यासमवेतच्या करारामुळे संयुक्त संशोधन उपक्रमांना चालना मिळेल. विशेषतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा विविध प्रमुख विज्ञान विभागांमधील संशोधनाला गती मिळेल. तसेच, शिवाजी विद्यापीठात उपलब्ध संशोधन सामग्रीचा आयसीटीच्या संशोधक, विद्यार्थ्यांनाही लाभ मिळेल.

No comments:

Post a Comment