Saturday, 9 April 2022

प्राचीन भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक एकीकरणाचे श्रेय सम्राट अशोक यांचेच: डॉ. हेमंत तिरपुडे

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन सत्रात हैदराबादहून ऑनलाईन बोलताना डॉ. हेमंत तिरपुडे.
 

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन सत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व डॉ. श्रीकृष्ण महाजन.


शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहास प्रारंभ

कोल्हापूर, दि. ९ एप्रिल: सम्राट अशोक यांनी प्राचीन भारताला त्याचा एकीकृत राजकीय नकाशा तर प्रदान केलाच, पण त्यापुढे जाऊन या देशाचे सामाजिक-सांस्कृतिक एकीकरण करण्याचे श्रेयही त्यांचेच आहे, असे प्रतिपादन हैदराबादचे विचारवंत डॉ. हेमंत तिरपुडे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव, आजादी का अमृत महोत्सव आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष अशा संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन सत्रात प्रियदर्शी सम्राट अशोक यांचे कल्याणकारी राज्य या विषयावर ते ऑनलाईन स्वरुपात बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

आज सम्राट अशोक जयंतीच्या निमित्ताने बोलताना डॉ. तिरपुडे म्हणाले, सम्राट अशोकाने त्या काळात इतका व्यापक प्रभाव निर्माण केलेला होता की आसिया खंडात एकही मोठे युद्ध झाले नाही. अशोकाच्या शांती व करुणेच्या संदेशाचा हा प्रभाव होता. अशोकाच्या राजकीय व आर्थिक धोरणांचा प्रभाव तर सर्वदूर होताच, पण त्याची कारकीर्द नैतिक मूल्यांच्या आग्रहाने दीप्तीमान झालेली होती. यामुळेच अशोकस्तंभावरील सिंहमुद्रा आणि भारतीय राष्ट्रध्वजावरील अशोकचक्र आपली राष्ट्रीय मानचिन्हे बनली आहेत.

आर्थिक विकास, सामाजिक कल्याण आणि सर्व धर्मांचा समान आदर या त्रिसूत्रीवर सम्राट अशोकाचे कल्याणकारी राज्य आधारलेले होते, असे सांगून डॉ. तिरपुडे म्हणाले, प्राचीन भारताचे मौर्य संविधान अशोकाने सुमारे २३०० वर्षांपूर्वी निर्माण केले. या संविधानाचे प्रतिबिंब आधुनिक भारतीय राज्यटनेवर पडल्याचेही आपल्याला दिसून येते. सम्राट अशोक हा जगातील असा पहिला राजा होता, ज्याने जनतेवर राज्य गाजविणारी नव्हे, तर जनतेचे कल्याण करणारी राज्यव्यवस्था निर्माण केली. आधुनिक राज्यघटनेत अनुस्यूत वेल्फेअर स्टेट या संकल्पनेचेच हे प्राचीन रुप म्हणता येईल. महामात्रांपासून ते प्रादेशिकांपर्यंतची बहुस्तरित प्रशासकीय व्यवस्था त्यांनी निर्माण केली. या शृंखलेतील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याच्या कामाची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली होती. त्याची जनसंपर्क यंत्रणाही अत्यंत सक्षम पद्धतीने कार्यरत होती. अशोकाने त्याच्या राज्यघटनेत अधिकाऱ्यांना निर्देश, नागरिकांना आचारनिर्देश आणि नागरिकांसाठी सर्वसाधारण सूचना यांचा समावेश होता. दर पाच वर्षांनी अधिकाऱ्यांनी नागरिकांत जाऊन कामकाजाच्या प्रभावाचा आढावा घ्यावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्याचे अहवाल राजास सादर करावेत, अशा सूचना होत्या. त्याचप्रमाणे नागरिकांनी इतर धर्मांचाही आदर करावा, अन्य धर्मांतील मौलिक तत्त्वांचा अंगिकार करावा, सणावारांवर अनाठायी खर्च न करता तो पैसा सत्कारणी वापरावा, अशाही सूचना त्याने दिलेल्या होत्या.

आर्थिक विकास व रोजगार निर्मितीसाठी अशोक अत्यंत सजग होते. राष्ट्रीय व्यापारी मार्गांची निर्मिती करीत असताना त्यांच्या बाजूने औषधी वनस्पतींची लागवड करणे, खानावळींसह पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची निर्मिती करणे यांची दक्षता त्यांनी घेतली. नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाची त्याने कटाक्षाने काळजी वाहिली. म्हणूनच त्या काळात भारताचा आर्थिक विकासाचा निर्देशांक जगात सर्वाधिक होता, अशी माहितीही डॉ. तिरपुडे यांनी यावेळी दिली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकर ही मानवतावादी विचारांची एक अखंड व अभेद्य शृंखला असून त्या माध्यमातून ज्ञान, विचार व चळवळींचे पुनरुज्जीवन झाले. या विश्वव्यापक विचारांचा डॉ. आंबेडकर केंद्र अभ्यासक्रम चालविते आहे आणि त्यांना प्रतिसाद लाभतो आहे, ही बाब महत्त्वाची आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास होणे आवश्यक आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सम्राट अशोक यांच्या जयंतीपासून ते बाबासाहेबांच्या जयंतीपर्यंत फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रबोधनपर विचारांचा जागर करण्याची विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर केंद्राची संकल्पना महत्त्वाची आहे. या केंद्राच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा प्रसार तळागाळापर्यंत करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची मोठी गरज आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापुरात उभारलेली वसतीगृह चळवळ ही बहुजन विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिकच नव्हे तर सर्वांगीण उद्धार करणारी आहे, याची जाणीव घेऊन सर्वांनीच ही चळवळ पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी उचलण्याची आवश्यकता आहे.

यावेळी सन २०२१-२२मध्ये डॉ. आंबेडकर केंद्राच्या पीजी डिप्लोमा व सर्टिफिकेट अभ्यासक्रमांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी केंद्राच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ. दीपा श्रावस्ती यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर अमोल मिणचेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास अनेक मान्यवर नागरिक, विभागप्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, उद्या रविवार, दि. १० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख यांचे समाज परिवर्तनाचे कार्य या विषयावर अमरावती येथील प्रा. अंबादास मोहिते यांचे ऑनलाईन व्याख्यान होणार आहे.

No comments:

Post a Comment