राजवर्धन पंडित
यांचा १०० पेटंट्सचा टप्पा; ‘मर्सिडिज’कडून ‘टॉप इन्व्हेंटर’ पुरस्कार

राजवर्धन पंडित 
राजवर्धन पंडित यांना कंपनीकडून प्राप्त पुरस्कार
कोल्हापूर, दि. १३ नोव्हेंबर: शिवाजी
विद्यापीठाचे माजी विद्यार्थी राजवर्धन पंडित यांनी जर्मनीतील जागतिक नामांकित
वाहननिर्मिती कंपनी मर्सिडीज-बेंझ एजीमध्ये संशोधन आणि नावीन्यपूर्ण तांत्रिक
योगदानाच्या माध्यमातून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कंपनीमध्ये १०० पेटंट्सचा
महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल राजवर्धन यांना प्रतिष्ठेचा ‘टॉप इन्व्हेंटर’
पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठासह
कोल्हापूरच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला
आहे.
जर्मनीतील स्टुटगार्ट येथे आयोजित
विशेष समारंभात मर्सिडीज-बेंझचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जॉर्ग बुर्झर आणि
कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व उत्पादन विभागाचे प्रमुख मायकेल शिबे
यांच्या हस्ते राजवर्धन पंडित यांना पुरस्काराची ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
राजवर्धन पंडित यांच्या शैक्षणिक
प्रवासाची सुरुवात कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलपासून झाली. त्यांनी विवेकानंद
महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे शिवाजी विद्यापीठाशी संलग्न
केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी संपादन केली.
त्यानंतर भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), शिलाँग
येथून व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची
सुरुवात २०१५ मध्ये भारतातील मर्सिडीज-बेंझच्या संशोधन व विकास केंद्रातून झाली.
भारतातील संशोधन व विकास क्षेत्रातील अनुभव आणि नावीन्यपूर्ण तांत्रिक योगदानाच्या
बळावर त्यांनी जर्मनीतील मर्सिडीज-बेंझ एजीमध्ये काम करण्याची संधी मिळवली. सध्या
ते कंपनीमध्ये ‘पार्ट मॅनेजर’ म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या दशकभरात त्यांनी केलेले संशोधन, तांत्रिक
कौशल्य आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या आधारे १०० पेटंट्सचा टप्पा गाठला आहे.
जागतिक ऑटोमोबाईल उद्योगातील संशोधन व विकास क्षेत्रात भारतीय अभियंत्यांची क्षमता
आणि योगदान अधोरेखित करणारी त्यांची ही कामगिरी आहे.
राजवर्धन पंडित यांचे वडील डॉ.
चंद्रकांत पंडित आणि आई डॉ. सुजाता पंडित हे दोघेही निवृत्त प्राध्यापक आहेत.
त्यांच्या आजी कै. डॉ. शांता पंडित या शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका
होत्या. त्यांचे बंधू डॉ. हर्षवर्धन पंडित हे बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर)
क्षेत्रातील तज्ज्ञ असून, शिवाजी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान अधिविभागात कार्यरत आहेत.
‘कोल्हापूरच्या
समृद्ध वारशाचा अभिमान’
या यशाविषयी भावना व्यक्त करताना
राजवर्धन पंडित म्हणाले, कोल्हापूर ही केवळ माझी जन्मभूमी नाही, तर
माझ्या व्यक्तिमत्त्वाची आणि विचारांची जडणघडण करणारी भूमी आहे. विद्यापीठ
हायस्कूल, विवेकानंद कॉलेज आणि केआयटी
अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षणाने माझ्या प्रवासाचा पाया घातला. शिवाजी
विद्यापीठाशी असलेले माझे नाते नेहमीच अभिमानाचे राहील. आज जागतिक स्तरावर काम
करताना कोल्हापूरच्या मातीचा आणि येथील समृद्ध वारशाचा मला सार्थ अभिमान वाटतो.
माजी
विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कामगिरी प्रेरणादायी: कुलगुरू डॉ. कामत
शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी
केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठे योगदान देत आहेत, याची
प्रचिती राजवर्धन पंडित यांच्या कामगिरीमधून येते. त्यांची ही कामगिरी विद्यापीठात
कार्यरत संशोधक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ.
राजनीश कामत यांनी काढले आहेत. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास
शिंदे यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment