Wednesday, 4 November 2026

सदाचार हाच न्यायमूर्ती रानडे यांच्या धर्मविचारांचा मूलाधार: डॉ. अशोक चौसाळकर

धर्माचरणाइतकीच नागरिकत्वाची कर्तव्ये महत्त्वाची; मानवी उन्नयनासाठी सदसद्विवेकबुद्धीचा आग्रह

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर. मंचावर किशोर बेडकीहाळ आणि डॉ. अवनीश पाटील.

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ४ नोव्हेंबर: सदाचार हाच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या धर्मविचारांचा मूलाधार असून, आधुनिक काळात धर्माचरणाइतकीच नागरिकत्वाची कर्तव्ये महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्ये निष्ठेने पार पाडली पाहिजेत, असे न्या. रानडे यांचे मत होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात ‘महादेव गोविंद रानडे: काळ आणि कर्तृत्व’ या विषयावरील दोनदिवसीय कार्यशाळेच्या समारोप सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ‘न्या. रानडे यांचे धर्मविचार’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, रानडे यांचा धर्मविचार हा केवळ ईश्वरभक्ती किंवा पारलौकिक मुक्तीच्या संकल्पनेपुरता मर्यादित नव्हता, तर तो मानवी जीवनाच्या सर्वांगीण उन्नयनाशी आणि समाजकल्याणाशी जोडलेला होता. मनुष्याने ईश्वराचे गुण आत्मसात करीत स्वतःचा नैतिक विकास साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. सुख-दुःख हे जीवनाचे अविभाज्य भाग असून, मनाची स्थिरता आणि चित्तशुद्धी राखत दुःखाचा सामना करणे तसेच प्राप्त झालेले सुख आणि समृद्धी इतरांसोबत वाटून घेणे, हे जीवनाचे खरे मर्म असल्याचे रानडे मानत. संत तुकारामांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी दीन-दलितांची सेवा आणि लोककल्याण यातच खऱ्या धर्माचे सार असल्याचे स्पष्ट केले.

रानडे यांच्या धर्मविचारांमध्ये मूलभूत मानवतावाद आणि सदसद्विवेकबुद्धीला महत्त्वाचे स्थान होते, असे सांगून डॉ. चौसाळकर म्हणाले, माणसाने स्वतःच्या उन्नयनाबरोबरच समाजाच्या हिताचाही विचार केला पाहिजे. केवळ आध्यात्मिक साधना किंवा वैयक्तिक सिद्धी प्राप्त करणे पुरेसे नसून, त्याचा समाजाला काय उपयोग होतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. धर्मग्रंथ अथवा परंपरांपेक्षा विवेकाच्या आधारे योग्य-अयोग्य ठरविण्याची क्षमता महत्त्वाची आहे. स्वर्ग, नरक किंवा मोक्ष यांसारख्या पारलौकिक कल्पनांपेक्षा पृथ्वीवरील जीवनात सदाचाराने वागणे, माणसाचे अधिकाधिक उन्नयन घडविणे आणि आधुनिक राष्ट्रातील नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडणे, हाच रानडे यांच्या धर्मविचारांचा व्यापक आणि आजच्या काळातही मार्गदर्शक ठरणारा आशय आहे.

यावेळी इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला डॉ. अरुण भोसले, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नागोराव कुंभार, डॉ. नीरज हातेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. नीलांबरी जगताप आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत डॉ. देवकुमार अहिरे, डॉ. प्रकाश पवार, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. कृष्णा पाटील, डॉ. सूर्यकांत गायकवाड यांनी न्या. रानडे यांच्या विविध पैलूंच्या अनुषंगाने विवेचन केले. राजवर्धन गुरव यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment