
शिवाजी विद्यापीठाचा सुवर्णपदक विजेता कबड्डी संघ.
कोल्हापूर, दि. १९ नोव्हेंबर: मध्य प्रदेशातील सागर येथे
सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत शिवाजी
विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. तीन
सामन्यांमध्ये दोन विजय आणि एका सामन्यातील बरोबरीसह एकूण पाच गुणांची कमाई करीत
संघाने प्रथम स्थान प्राप्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संघाने पहिल्या
सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाचा ३४-३१ असा तीन
गुणांनी पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात कोटा विद्यापीठ, कोटा
(राजस्थान) संघावर ३८-१६ अशा २२ गुणांच्या मोठ्या फरकाने मात केली. अंतिम सामना
आर. के. डी. एफ. विद्यापीठ, भोपाळ या संघाविरुद्ध झाला. हा सामना
२५-२५ असा बरोबरीत सुटला. या कामगिरीच्या जोरावर शिवाजी विद्यापीठाच्या संघाने
स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
संघाच्या विजयात किशोर जाट, सौरभ
फगरे आणि समर्थ देशमुख यांनी उत्कृष्ट चढाया करीत मोलाचे योगदान दिले. कर्णधार
वैभव राबाडे, अथर्व धुमाळ, दादासो
पुजारी आणि सुहास मोहिते यांनी प्रभावी क्षेत्ररक्षण करीत प्रतिस्पर्धी संघांच्या
खेळाडूंना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
विजयी संघाला प्रशिक्षक डॉ. देवेंद्र
बिरनाळे आणि प्रा. अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि
क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी विजेत्या संघाचे
अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment