Thursday 29 November 2018

शिवाजी व मुंबई विद्यापीठाचे साखळी फेरीत वर्चस्व


पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा:
औरंगाबाद विद्यापीठाच्या खेळाडूची पकड करण्याच्या प्रयत्नातील शिवाजी विद्यापीठाचे कबड्डीपटू.

औरंगाबाद विद्यापीठाच्या खेळाडूची पकड करण्याच्या प्रयत्नातील शिवाजी विद्यापीठाचे कबड्डीपटू.

कोटा विद्यापीठाच्या खेळाडूची पकड करण्याच्या प्रयत्नातील मुंबई विद्यापीठाचे खेळाडू.

कोटाच्या कबड्डीपटूंची पकड चुकविण्याच्या प्रयत्नातील मुंबई संघाचा खेळाडू.


स्पर्धेचा समारोप उद्या; रंगणार अखेरचे दोन सामने
कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: येथील शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेतील साखळी सामने आज प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगले. साखळी सामन्यांत यजमान शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत साखळी फेरीतील आजचे प्रत्येकी दोन सामने जिंकत प्रत्येकी ४ गुणांसह गुणतक्त्यात आघाडी मिळविली.
आज सायंकाळच्या सत्रात यजमान शिवाजी विद्यापीठाचा कोटा विद्यापीठासमवेतचा सामना अत्यंत चुरशीने रंगला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात कोटा विद्यापीठाच्या संघाने एकेका गुणासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघाला झुंजविले. मात्र, शिवाजी विद्यापीठाने अखेरपर्यंत गुणांची आघाडी कायम राखली आणि सामना ३५-२५ असा जिंकला.
या सत्रात दुसरा सामना मुंबई विद्यापीठ आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यात झाला. अतिशय चुरशीच्या अशा या सामन्यात दोन्ही संघांचा गुणफलक साथीने हलत राहिला. अगदी एक-दोन गुणांचा फरक होत राहिला. अखेरपर्यंत दोन्ही संघांनी आपापल्या विजयाची शक्यता जिवंत राखली. मात्र, अखेरच्या क्षणी मुंबई विद्यापीठाने सामना ४२-४१ असा अवघ्या एका गुणाने जिंकला.
तत्पूर्वी, आज सकाळी यजमान शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली. यजमान शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यातील सामना अत्यंत चुरशीने रंगला. अत्यंत तुल्यबळ अशा या दोन्ही संघांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळाला सावध सुरवात केली. त्यामुळे पहिल्या गुणापासून दहाव्या गुणांपर्यंत सामना बरोबरीत रंगत गेला. तिथून पुढे मात्र शिवाजी विद्यापीठाच्या संघाने आक्रमक पवित्रा घेत आपला खेळ उंचावला आणि गुण वाढवित नेले. उत्तम सांघिक खेळाच्या जोरावर हा सामना शिवाजी विद्यापीठाने ३७-२५ असा जिंकला.
मुंबई विद्यापीठाचा सामना कोटा विद्यापीठाशी झाला. हा सामनाही अत्यंत रंगतदार झाला. काल अतिशय फॉर्ममध्ये असलेला कोटा विद्यापीठाचा संघ मुंबई विद्यापीठाच्या संघासमोर मात्र निष्प्रभ ठरला. मुंबईच्या खेळाडूंनी त्यांच्यावर दबाव कायम राखण्यात यश मिळविले आणि सामना ४१-२५ असा जिंकला.
उद्या सकाळच्या सत्रातील सामने:
१)      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विरुद्ध कोटा विद्यापीठ, कोटा
२)      शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुद्ध मुंबई विद्यापीठ, मुंबई
या सामन्यांनंतर लगेचच कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान समारंभ होईल.
साखळी फेरीतील गुणतक्ता:
संघ
विजय
पराजय
गुण
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
०२
००
०४
मुंबई विद्यापीठ, मुंबई
०२
००
०४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
००
०२
००
कोटा विद्यापीठ, कोटा
००
०२
००


No comments:

Post a Comment