Monday, 26 November 2018

मेहनत करा; स्टॅमिना, ताकद, लवचिकता मिळवा:

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांताराम जाधव यांचा कानमंत्र

शिवाजी विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ध्वजवंदन करताना आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांताराम जाधव आणि कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत मान्यवर. 


शिवाजी विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे आकाशात फुगे सोडून उद्घाटन करताना आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांताराम जाधव, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय जाधव.

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित क्रीडापटूंना संबोधित करताना शांताराम जाधव.

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी झालेल्या शिवाजी विद्यापीठ विरुद्ध कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या सामन्यावेळी प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूची पकड करताना शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू.


पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन


कोल्हापूर, दि. २६ नोव्हेंबर: जोरदार मेहनत करा; स्टॅमिना, ताकद आणि लवचिकता मिळवा. देशाचे नाव कबड्डीत उज्ज्वल करा, असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी आज येथे विविध राज्यांच्या विद्यापीठांतून आलेल्या कबड्डीपटूंना दिला.
शिवाजी विद्यापीठात आजपासून भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धांना प्रारंभ झाला. त्याचा उद्घाटन समारंभ आज सायंकाळी श्री. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते; तर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या खुल्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय जाधव उपस्थित होते.
Shantaram Jadhav
श्री. जाधव म्हणाले, खेळाडूंच्या आयुष्यात आंतरविद्यापीठीय स्पर्धा या सेकंड इनिंग असतात. कोणत्याही उपकरणाशिवाय खेळता येणारा खेळ म्हणजे कबड्डी. यातील आपली कामगिरी उंचावण्यासाठी खेळाडूंनी दररोज किमान सहा तास व्यायाम करायला हवा. प्रामाणिकपणे खेळले पाहिजे. पैशांच्या अपेक्षेपेक्षा करिअर म्हणून खेळलात, तर पाठोपाठ पैसाही आपोआपच येईल. यावेळी स्पर्धेचे नेटके आयोजन केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.
Dr. Devanand Shinde
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, खेळाडूने शारिरीक श्रम तर करायलाच हवेत, पण त्याचा मानसिक फिटनेसही अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळ प्रथमतः डोक्यात खेळला जातो आणि नंतर मैदानात त्याची कृती होते. त्यामुळे आपला खेळ निकोप करून खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक खेळाडूने प्रयत्न करायला हवेत.
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि शांताराम जाधव यांच्या हस्ते एआययु आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या ध्वजांना वंदन करण्यात आले. तसेच, आकाशात फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. उपस्थित खेळाडूंना शिस्त व खिलाडूपणाची शपथ देण्यात आली.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले, तर पी.टी. गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय पंच रमेश भेंडेगिरी यांच्यासह जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांसमोर यजमान शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या दोन संघांमध्ये सामना खेळविण्यात आला. हा सामना शिवाजी विद्यापीठाने ५६-२५ असा जिंकला.


पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी झालेल्या शिवाजी विद्यापीठ विरुद्ध कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या सामन्यावेळी प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूची पकड करताना शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू.

शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या तेरा सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे:-
१)      गोवा विद्यापीठ, पणजी वि.वि. नवसारी विद्यापीठ, गुजरात (४३-१८)
२)      वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सूरत वि.वि. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (६२-१४)
३)      उदयपूर विद्यापीठ, उदयपूर वि.वि. गुजरात विद्यापीठ, गुजरात (विजयी घोषित)
४)      महाराजा गंगासिंग विद्यापीठ, बिकानेर वि.वि. जोधपूर विद्यापीठ, राजस्थान (५७-१७)
५)      सरदार पटेल विद्यापीठ, भावनगर वि.वि. जे.टी.एम. विद्यापीठ, ग्वाल्हेर (६३-३१)
६)      हेमचंद्र विद्यापीठ, गुजरात वि.वि. डी.वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई (५४-३७)
७)      स्वर्णीम-गुजरात क्रीडा विद्यापीठ, गांधीनगर वि.वि. भक्त कवी नरसी मेहता विद्यापीठ, गुजरात (३८-२६)
८)      राजस्थान विद्यापीठ, जयपूर वि.वि. एम.डी.एस. विद्यापीठ, अजमेर (४१-३२)
९)      कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव वि.वि. एम.के.बी. विद्यापीठ, भावनगर (विजयी घोषित)
१०)  संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती वि.वि. रक्षा शक्ती विद्यापीठ, गुजरात (५८-२५)
११)  के.एस. विद्यापीठ, गांधीनगर वि.वि. दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा (७०-१८)
१२)  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर वि.वि. जे.आर.एन. राजस्थान विद्यापीठ, राजस्थान (५७-१८)

१३)  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वि.वि. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (५६-२५)

No comments:

Post a Comment