शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना प्राचार्य डॉ. हरिष भालेराव. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. श्रीकृष्ण महाजन. |
शिवाजी विद्यापीठात संविधान
दिन उत्साहात
कोल्हापूर, दि. २६
नोव्हेंबर: देशात उच्च प्रतीची सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची
जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनी
आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने संविधान
दिनानिमित्त ‘भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे’ या विषयावर डॉ. भालेराव
यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मानव्यशास्त्र अधिविभागात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू
डॉ. डी.टी. शिर्के होते. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.
Dr. Harish Bhalerao |
डॉ. भालेराव यांनी
आपल्या व्याख्यानात लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी झालेल्या जागतिक
प्रयत्नांचा वेध घेतला. लोकशाही पद्धती हीच भारतीयांची जीवनशैली असली पाहिजे, असे
सांगून ते म्हणाले, नागरिकांना मुक्त वातावरणात जीवन जगता आले पाहिजे. यासाठी
मूलभूत हक्कांची गरज असते. भेदाभेदाने व्याप्त, विषमतायुक्त समाजात स्वातंत्र्य, समता,
बंधुता, सहिष्णुता या मूल्यांची प्रस्थापना करण्याचे ध्येय संविधान बाळगून आहे.
प्रत्येक भारतीयाचे राहणीमान उंचावून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि
त्यांच्या मनात उच्चनीचतेची, परस्परांबद्दल श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना निर्माण न
होऊ देणे या गोष्टी संविधानाला अभिप्रेत आहेत.
सांविधानिक
नैतिकतेला आव्हान देता येणार नसल्याचे सांगून डॉ. भालेराव म्हणाले, भारतीय
संविधानात समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा
हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि सांविधानिक उपाय योजण्याचा हक्क या मूलभूत
हक्कांचा समावेश आहे. राज्याने कसे वागावे, हे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात आणि ती
राज्याची धोरणाबाबतची नैतिकता आहे. विकास, चौकसबुद्धी, मानवतावाद आणि वैज्ञानिक
दृष्टीकोनाला चालना देणारी आपली मार्गदर्शक तत्त्वे असून त्यामध्ये पर्यावरण आणि
पशू यांच्या संदर्भातही सजगतेचा आग्रह दिसून येतो. धोरणे आखताना मार्गदर्शक
तत्त्वांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धोरणांच्या सकारात्मक अंमलबजावणीसाठी राजकीय
नैतिकता कळीची भूमिका बजावत असते, असेही डॉ. भालेराव यांनी सांगितले.
Dr. D.T. Shirke |
अध्यक्षीय भाषणात
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, संविधान हे केवळ पुस्तक नसून
बाबासाहेबांनी या देशाला दिलेला मानवी मूल्यांचा दस्तावेज आहे. या संदर्भात जागरुकता
अत्यंत महत्त्वाची आहे. यातल्या शब्दाशब्दाचा अभ्यास व प्रसार करणे ही आपल्यातल्या
प्रत्येकाची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रातिनिधिक
स्वरुपात अधिविभाग तसेच महाविद्यालयीन स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संविधान
दूतांचा गौरव करण्यात आला. सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ.
शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच संविधानाच्या
प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
डॉ. आंबेडकर
केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर
अर्थसास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे यांनी आभार मानले. वैभव कांबळे
यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, डॉ. प्रमोद वासंबेकर,
डॉ. के.डी. सोनवणे, डॉ. आर.जी. सोनकवडे, प्रा. शोभा शेटे, डॉ. पी.एस. पांडव, आनंद
खामकर, सचिन देठे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment