माणगाव येथील स्मारकास भेट देऊन माहिती घेताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एस.एस. महाजन. |
कोल्हापूर, दि. २० मार्च: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक’मध्ये प्रकाशित झालेल्या माणगाव परिषदेच्या वार्तांकनाचा अनुवाद विविध भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये करून त्यांचे संकलित पुस्तक शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे दिली.
माणगाव परिषदेचा १०१वा वर्धापन दिन उद्या (दि. २१ मार्च) साजरा होतो आहे.
त्याच्या पूर्वसंध्येला कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील,
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व
विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी माणगावला भेट देऊन तेथील स्मारकाचे
दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केले. त्या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाची
घोषणा साक्षात राजर्षी शाहू महाराजांनी माणगाव परिषदेत केली. पुढे डॉ. आंबेडकरांनीही
महाराजांचे भाकित प्रत्यक्षात उतरविले. त्या दृष्टीने माणगाव परिषद ऐतिहासिक
महत्त्वाची ठरते. या परिषदेची सविस्तर माहिती बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळेच आपल्याला मिळू
शकली. या परिषदेची ही माहिती विविध भाषिक वाचकांना मिळायला हवी, यासाठी विद्यापीठाच्या
डॉ. आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने या वार्तांकनाचे विविध भारतीय व परदेशी
भाषांत अनुवाद करण्याचा प्रकल्प तातडीने हाती घेण्यात येईल.
यावेळी डॉ. महाजन यांनी माणगाव परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व तसेच परिषदेसाठी
माणगावची निवड करण्यामागील राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका या विषयी सविस्तर
माहिती दिली. अनिल माणगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माणगाव बौद्ध समाज
अध्यक्ष अरुण शिंगे यांनी आभार मानले.
या भेटी दरम्यान कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी माणगाव
येथे उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या लंडन येथील निवासस्थानाच्या प्रतिरुप
निवासस्थानासह माणगाव स्मारकाची पाहणी केली. बाबासाहेबांनी परिषदेच्या वेळी ज्या
शाळेत मुक्काम केला होता, त्या शाळेच्या इमारतीसही त्यांनी भेट दिली. अनिल
माणगावकर यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी माणगाव येथील अनिल कांबळे, शिरीष मधाळे, योगेश सनदी, नंदकुमार शिंगे,
पांडुरंग कांबळे, राहुल शिंगे, श्रीकांत चव्हाण, अनिकेत कांबळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment