Thursday 18 March 2021

संशोधन योजनेतून साकारले ‘शिवाजी विद्यापीठातील पक्षीजगत’


कोल्हापूर, दि. १८ मार्च: शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत शिक्षक, संशोधक, विद्यार्थी यांना संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी विविध संशोधन योजना जाहीर केल्या. त्यापैकीच असलेल्या रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीमअंतर्गत प्राणीशास्त्र अधिविभागातील डॉ. एस.एम. गायकवाड यांनी सुमारे दोन वर्षे शिवाजी विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेबाबत संशोधन केले. त्यातून बर्ड्स ऑन शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस हे सुमारे ११८ पानी कॉफीटेबल बुक साकार झाले आहे.  

 डॉ. एस.एम. गायकवाड यांनी दोन वर्षांमध्ये विद्यापीठाच्या ८५३ एकर परिसरामध्ये सातत्याने पक्षीनिरीक्षण केले. विशेषतः कोविड-१९ साथीच्या कालखंडात विद्यापीठ परिसरात मनुष्य हस्तक्षेप अत्यल्प असल्याचा लाभ घेऊन निर्भयपणे मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करणे, त्यांची छायाचित्रे टिपणे या गोष्टी डॉ. गायकवाड यांना अधिक चांगल्या प्रकारे करता आल्या. त्यांनी सर्वसाधारण व दुर्मिळ अशा सर्व प्रकारचे मिळून सुमारे ११५ पक्षी असल्याचे नोंदविले आहे.

या ११५ पक्ष्यांची डॉ. गायकवाड यांनी अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रेही टिपली आहेत. या छायाचित्रांचे कॉफी टेबल बुक त्यांनी साकारले आहे. यामध्ये पक्ष्याचे छायाचित्र, त्याची थोडक्यात माहिती आणि जिज्ञासूंना अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक पक्ष्याच्या पृष्ठावर एक क्यूआर कोड छापला आहे. ज्याला अधिक माहिती घ्यावयाची असेल, त्याने क्यूआर कोड स्कॅन केला की, लगेच त्या पक्ष्याची सविस्तर माहिती त्यांच्या मोबाईलवर दिसेल.

डॉ. गायकवाड यांना विद्यापीठाच्या ज्या परिसरात जे पक्षी आढळले, त्या ठिकाणी संबंधित पक्ष्याचा सचित्र माहितीफलकही उभारण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात फिरावयास येणाऱ्या नागरिकांनाही त्या परिसरात कोणत्या पक्ष्याचा आढळ होऊ शकतो, याचा अंदाज येण्यास मदत होते.

यासंदर्भात बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले, विद्यापीठाने रिसर्च स्ट्रेन्दनिंग योजनेअंतर्गत प्रोत्साहन निधी दिल्यामुळेच विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेबाबत संशोधन करता येऊ शकले. त्यातूनच या परिसरात पक्ष्यांच्या सुमारे ११५ प्रजाती असल्याचे निरीक्षण नोंदविता येऊ शकले. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचे प्रोत्साहन आणि विभागप्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने यांचे सहकार्य यामुळे या पक्ष्यांच्या छायाचित्रांचा समावेश असणारे कॉफीटेबल बुक प्रकाशित करता येऊ शकले.


विद्यापीठ परिसर सुरक्षित अधिवास



शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा निसर्गरम्य आणि देखणा तर आहेच, पण त्याचबरोबर विविध पशुपक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास असल्याचे डॉ. गायकवाड यांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले. बर्ड्स ऑन शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस या कॉफीटेबल बुकचे नुकतेच त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर, डॉ. आर.के. कामत, डॉ. व्ही.एस. मन्ने, डॉ. एम.व्ही. वाळवेकर यांच्यासह प्राणीशास्त्र अधिविभागातील शिक्षक उपस्थित होते.

  

1 comment:

  1. अत्यंत प्रशंसनीय कार्य अथक परिक्षणातुन सर्व माध्यमासमोर प्रस्तुतीसाठी विभाग प्रमुख व त्यांच्या चमुचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच धन्यवाद. सध्याच्या वातावरण बदलातील विषमतेमुळे वन्यजीव (पक्षी) त्यांचा अधिवास सातत्याने बदलत असलेचे संकेत मीळत आहेत. परिक्षणातुन आढळून आलेल्या विविध पक्ष्यांचे संवर्धन होऊन त्यांचा अधिवास लांबवणेसाठी शास्त्रिय पण सामाजिक जाणीवेतून प्रयत्न व्हावा म्हणून परिसरातील नागरिकांपर्यंत जागृती होणे व काय करावे म्हणजे ही संपदा टीकून राहिल याचे प्रबोधन होणे जरुरीचे वाटते. थोडक्यात सांगायचे झालेस ज्या वृक्ष संपदेमुळे पक्षांचा आधिवास लांबू शकतो अशा वृक्ष संपदेचे संवर्धन आणि त्यांचा विकास-वाढ होणे व जल स्त्रोत उपलब्ध करुन देणेसाठी प्रयास सुचवून त्याचे इपले स्प्रतरावरुन बोधनाच्या माध्यमातून जागृती करणे उचित ठरेल. अलिकडेच उल्लेखित क्षेत्रात (विद्यापिठ परिसरातील शेंडापार्क) अप्रिय-अमानवी कृत्यातुन घडलेल्या जळीतकांडामुळे अनेक पूर्ण वाढ झालेल्या व नविन नुकतेच जीव धरलेल्या अनेक वृक्ष-वनस्पति बेचीराख झाल्या ज्यामुळे प्रस्तुत पक्षी गणांच्या अधिवासावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा व अन्य अप्रिय घटणांपासुन संरक्षणार्थ उचित उपक्रम राबवणेसाठी संबंधित प्रशासन किंवा नागरीकांपर्यंत सुचना-मार्गदर्शनांचे वितरण व्हावेसे वाटते. आपल्या निरिक्षणातून प्रस्तूत इतकी मोठी बहुमुल्य पक्षी संपदा टिकवणेसाठी इतका प्रयास आपल्या माध्यमातुन/स्तरावरुन होणे अनिवार्य ठरावे. यासाठी अंततः एक हिंदिमधिल वाक्प्रचार अधोरेखित करावासा वाटतो. तो म्हणजे " जियो और जीने दो " अर्थात 'जगा व जगू द्या'....

    ReplyDelete