Showing posts with label CFC. Show all posts
Showing posts with label CFC. Show all posts

Sunday, 19 April 2026

शिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरव

समाजमाध्यमांवरून लघुचित्रफीत केली प्रसारित

शिवाजी विद्यापीठाचे सीएफसी-सैफ केंद्र

शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्रात उपलब्ध अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे


केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची लिंक्ड-इनवरील पोस्ट

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एक्स हॅंडलवरील पोस्ट

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या फेसबुक पेजवरील पोस्ट

(केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने शेअर केलेला शिवाजी विद्यापीठाच्या सैफ केंद्राचा व्हिडिओ)

(शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्राचे संचालक डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांची प्रतिक्रिया)


कोल्हापूर, दि. १९ एप्रिल: भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) शिवाजी विद्यापीठाच्या कॉमन फॅसिलिटी सेंटर- सोफिस्टिकेटेड अॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज (सीएफसी– सैफ) या विभागाच्या दर्जेदार कामगिरीची दखल घेतली आहे. विद्यापीठाच्या या केंद्रात उपलब्ध असलेली अत्याधुनिक उपकरणे आणि सुविधा यांची माहिती देणारी लघुचित्रफीत केंद्रीय विभागाने त्यांच्या समाजमाध्यमांच्या सर्व मंचावरून प्रदर्शित केली आहे. अशा प्रकारे केंद्रीय मंत्रालयाकडून गौरव होण्याचा बहुमान मिळविणारे शिवाजी विद्यापीठाचे ह देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या एक्स, लिंक्डइन आणि फेसबुक या समाजमाध्यमांच्या मंचांवरून शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्राची माहिती देणारी तीन मिनिटांची लघुचित्रफीत प्रदर्शित केली आहे. लघुचित्रफीतीसमवेत लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे पाठबळ लाभलेल्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील सोफिस्टिकेटेड अॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज' (#SAIF) हे केंद्र संपूर्ण भारतातील संशोधक, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना अत्याधुनिक विश्लेषणात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवा पुरवत आहे. मंत्रालयाच्या सैफ कार्यक्रमांतर्गत २०१४ मध्ये स्थापन झालेले हे केंद्र, अतिप्रगत उपकरणांच्या साहाय्याने अचूक विश्लेषण आणि नाविन्यपूर्णतेला चालना देऊन वैज्ञानिक संशोधनाला यशस्वीपणे बळकटी देत आहे.

या पोस्टमध्ये मंत्रालयाने खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह, सचिव अभय करंदीकर यांच्यासह केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय, सीएसआयआर-इंडिया यांना टॅग केले आहे.

या केंद्राचे संचालक डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांनी मंत्रालयाकडून झालेल्या गौरवाबद्दल समाधान व्यक्त केले. केंद्राच्या वाटचालीविषयी सांगताना ते म्हणाले, विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्रामध्ये एकूण सोळा विविध अतिउच्च दर्जाची अत्याधुनिक वैज्ञानिक संश्लेषक उपकरणे आहेत. त्यावर भारतातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांमधील संशोधकही आपल्या संशोधनाचे नमुने तपासणीसाठी पाठवित असतात. मागील पाच वर्षांचा आढावा घेत असता, सन २०२०-२१मध्ये देशभरातून २४०० नमुने तपासणीसाठी आले होते. त्या माध्यमातून दोन लाख ४४ हजार रुपये इतके उत्पन्न विद्यापीठास मिळाले होते. आता २०२५-२६मध्ये देशभरातील संशोधन संस्थांकडून तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या आठ हजारांच्या घरात गेली असून उत्पन्नही ५२ लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. त्याखेरीज केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यशाळा, विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम या माध्यमातून दरवर्षी साधारणतः १२०० विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरण हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येते. केंद्राच्या या सर्व विज्ञानाभिमुख कामगिरीची केंद्रीय मंत्रालयाने दखल घेतली, याचा मोठा आनंद वाटत आहे. यापुढील काळातही येथील उपकरणांची संख्या वाढविण्यात येऊन आणखी दर्जेदार व आधुनिक विश्लेषण सुविधा संशोधकांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळेच हा सन्मान केंद्राला लाभला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

--

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यमांवरून प्रसारित केलेल्या लघुचित्रफीतींच्या लिंक पुढीलप्रमाणे-

https://x.com/IndiaDST/status/2044997863554646129

https://www.linkedin.com/posts/indiadst_saif-ugcPost-7450765283746820096-xdk4?utm_source=share&utm_medium=member_desktop&rcm=ACoAAENLVvkBSDJcfw-kYkvD27JZxQSEgqi9udw

https://fb.watch/Gxs-uCul9M/ 

Sunday, 30 July 2023

गतिमान व दर्जेदार नमुना विश्लेषणात शिवाजी विद्यापीठ अग्रेसर

 आय-स्टेमच्या पोर्टलवर संशोधकांकडून सर्वाधिक नोंदणी

 

शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी सैफ-डीएसटी केंद्रामधील एक्स.आर.डी. उपकरण

टीजीए-डीटीए-डीएससी

एफ.टी.आय.आर.

कोल्हापूर, दि. ३० जुलै: अल्प कालावधीत गतिमान व दर्जेदार संशोधकीय नमुना विश्लेषण करून देण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रातील तीन अत्याधुनिक उपकरणांना देशभरातील संशोधकांची पसंती लाभत असून या उपकरणांसाठी भारत सरकारतर्फे विकसित पंतप्रधानांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांच्या इंडियन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग फॅसिलिटीज मॅप (आय-स्टेम) या पोर्टलवर सर्वाधिक नोंदणी प्राप्त झाली आहे. आय-स्टेमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्राच्या सैफ-डीएसटीचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी दिली.

डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यासह विविध वैज्ञानिक विभागांमार्फत देशातील विविध संस्थांना अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे देण्यात येतात. या उपकरणांवरील पृथक्करणासाठीआय-स्टेमचे (बंगळुरू) पोर्टल निरीक्षण व नोंदणी सुविधा प्रदान करते. या पोर्टलवर देशभरातील २२७७ संस्थांची २५,८८१ शास्त्रीय उपकरणे नोंद आहेत. या नोंदणीमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून १७२ संस्थांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचाही समावेश आहे. पोर्टलवरील माहितीनुसार, भारतात संशोधकीय नमुना विश्लेषणासाठी आठ उपकरणे सर्वाधिक वापरली जातात. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्रातील (सीएफसी) सोफिस्टिकेटेड अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी (सैफ-डीएसटी) केंद्रातील एक्स रे पॉवर डिफ्रॅक्शन (एक्सआरडी), फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर (एफटीआयआर), थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अॅनालायझर- डिफ्रन्शियल थर्मल अॅनालिसिस -डिफ्रन्शियल स्कॅनिंग कॅलोरीमीटर (टीजीए-डीटीए-डीएससी) या तीन उपकरणांची सर्वाधिक मागणी असणारी व सेवा प्रदान करणारी उपकरणे म्हणून नोंद झाली आहेत. विश्लेषणात्मक पृथ:क्करणासाठी देशभरातील संशोधक आय-स्टेम पोर्टलच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठातील सैफ-सीएफसी-डीएसटी विभागांमध्ये नमुना पृथक्करणासाठी मोठ्या संख्येने पाठवू लागले आहेत. येथील नमुना विश्लेषणही अतिशय गतिमान, दर्जेदार व अचूक असल्याचा अभिप्रायही पोर्टलवर नोंदविण्यात आला आहे. ही शिवाजी विद्यापीठासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्राच्या सातत्यपूर्ण संचालनासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी व अधिकार मंडळांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्यामुळेच हे यश मिळविणे शक्य झाल्याची भावना डॉ. सोनकवडे यांनी व्यक्त केली.

 १२५१ नमुन्यांची विश्लेषणासाठी नोंदणी

विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रात एकूण १४ आधुनिक शास्त्रीय विश्लेषक उपकरणे आहेत. आय-स्टेमकडून प्रत्येक उपकरणाला कोड देण्यात आलेले आहेत. त्यामुळे संशोधकांना सॅम्पल पृथक्करणासाठी पोर्टलवर जाऊन बुकिंग करणे सुलभ होते. शिवाजी विद्यापीठाच्या सैफ-डीएसटीकडील एक्सआरडी, एफटीआयआर आणि टीजीए-डीटीए-डीएससी या तीन उपकरणांसाठी अतिशय कमी वेळेमध्ये सर्वाधिक बुकिंग नोंद झाले आहेत. येथे नमुन्यांचे पृथक्करणही अतिशय कमी वेळेमध्ये करून देण्यात येते. त्यामुळे येथील बुकिंगमध्ये सातत्य दिसून आले आहे. येथील एक्सआरडी (कोड- २७३४६१३) साठी ७२६ सॅम्पलचे, एफटीआयआरसाठी (कोड- २७३४६२५) ३१९ सॅम्पलचे तर टीजीए-डीटीए-डीएससी  (कोड- २७३४६२४) साठी २०६ सॅम्पलचे असे एकूण १२५१ सॅम्पलच्या पृथक्करणासाठी बुकिंग झाले आहे. या बुकिंगची सविस्तर माहिती आय-स्टेम पोर्टलवर नोंद आहे.

या तीन उपकरणांमधून कोणते विश्लेषण होते?

शिवाजी विद्यापीठाच्या सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रामधील जी तीन उपकरणे विश्लेषणासाठी सर्वाधिक मागणी असणारी आहेत, ती पुढीलप्रमाणे विश्लेषणासाठी वापरली जातात. एक्सआरडी उपकरणाद्वारे संशोधकांनी बनवलेल्या रासायनिक पदार्थांमधील अणूंची रचना, त्यांचा आकार, प्रकार हे गुणधर्म अभ्यासले जातात. एफटीआयआर उपकरण पदार्थाच्या रासायनिक गुणधर्मातील घटक (Functional group) कोणता आहे, हे शोधून काढण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. हे सदर उपकरण अतिशय उपयोगाचे आहे. टीजीए-डीटीए-डीएससी हे उपकरण पदार्थावर कमी अधिक प्रमाणात होणारा उष्णतेचा परिणाम आणि तत्सम गुणधर्मांच्या अनुषंगाने माहिती विश्लेषित करण्याच्या कामी उपयुक्त ठरते.

विश्लेषणाद्वारे विद्यापीठास दोन वर्षांत सुमारे ३३ लाखांचे शुल्क

विद्यापीठाच्या सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रातील विविध १४ उपकरणांद्वारे करण्यात आलेल्या विश्लेषणातून सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३ या दोन आर्थिक वर्षांमध्ये अनुक्रमे रुपये १०,३३,७०० आणि रुपये २३,२८,४६९ असे एकूण ३३ लाख ६२ हजार १६९ रुपयांचे शुल्क प्राप्त झाले आहे.

यातील एक्सआरडी उपकरणासाठी प्रति नमुना १५० रुपये शुल्क आकारले जाते. या उपकरणाद्वारे सन २०२१-२२मध्ये २ लाख ६६ हजार ६५० आणि २०२२-२३मध्ये ३ लाख ३१ हजार ९०० रुपये शुल्क मिळाले. एफटीआयआर उपकरणासाठी प्रति नमुना २०० रुपये शुल्क आहे. त्यातून सन २०२१-२२मध्ये २ लाख २६ हजार ४०० रुपये आणि सन २०२२-२३मध्ये २ लाख १० हजार ५०० रुपये शुल्क मिळाले. टीजीए-डीटीए-डीएससी उपकरणासाठी प्रति नमुना ५०० रुपये शुल्क आकारले जाते. यातून सन २०२१-२२ मध्ये १ लाख ३३ हजार ४०० रुपये आणि सन २०२२-२३मध्ये ३ लाख ७६ हजार ५०० रुपये शुल्क प्राप्त झाले.

 

तत्परता व पारदर्शकता यामुळेच विद्यापीठाला पसंती: प्र-कुलगुरू डॉ. पाटील

शिवाजी विद्यापीठाच्या सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रामध्ये उपलब्ध असणारी अद्ययावत उपकरणे, त्यांची सुस्थिती आणि अत्यंत तत्पर व जाणकार विश्लेषकांद्वारे मिळणारी अखंडित सेवा हे शिवाजी विद्यापीठाच्या केंद्राचे वैशिष्ट्य आहे. येथे आलेल्या सॅम्पलचे गतिमान पद्धतीने पृथक्करण करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आय-स्टेम पोर्टलवरही सॅम्पल बुकिंगची तत्परता, पृथक्करणाच्या बाबतीतली पारदर्शकता व विश्वासार्हता या बाबींमुळेच आय-स्टेम पोर्टलद्वारे देशभरातून उच्चांकी सॅम्पलचे बुकिंग या केंद्राला लाभत आहे, अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली.

आधुनिक उपकरणांचा लाभ संशोधनासाठी सर्वदूर होणे महत्त्वाचे: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रामधील सैफ-डीएसटी येथे अत्याधुनिक स्वरुपाची १४ उपकरणे आहेत. अतिशय महत्त्वाच्या संशोधकीय पृथक्करणासाठी ती वापरली जातात. विद्यापीठातील संशोधकांना तर ती उपलब्ध आहेतच, शिवाय, आय-स्टेमच्या माध्यमातून देशभरातील संशोधकांनाही त्यांच्या संशोधनाच्या विश्लेषणासाठी या उपकरणांचा लाभ होतो आहे आणि त्यासाठी सर्वाधिक मागणी नोंदविली जात आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. केंद्रप्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यासाठी अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

Wednesday, 2 February 2022

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून

‘स्तुती’ उपक्रमांतर्गत विद्यापीठास २.५ कोटींचा प्रकल्प

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा लोगो


कोल्हापूर, दि. २ फेब्रुवारी: केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्तुती या विशेष प्रशिक्षण उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठास सुमारे अडीच कोटी रुपयांचा प्रकल्प तत्त्वतः मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती विद्यापीठाच्या सैफ (SAIF), सीएफसी विभागांचे प्रमुख डॉ. आर.जी. सोनकवडे यांनी दिली.

डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पकालीन अभ्यासक्रम आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून विविध उपकरणे आणि विश्लेषणात्मक तंत्रांबद्दल लोकप्रियता आणि जागरूकता वाढविण्यासाठी  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून स्तुती (STUTI - Synergistic Training program Utilizing the Scientific and Technological Infrastructure) या प्रशिक्षण उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठाकडून प्रकल्प प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मंजुरी प्राप्त झाल्याचे पत्र विद्यापीठास प्राप्त झाले आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी असणाऱ्या या प्रकल्पातील उपक्रम आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत साजरे करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत किमान ३० जणांचा सहभाग असणाऱ्या एकूण २५ प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच, दि. २२ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या विज्ञान सप्ताहांतर्गत किमान ५० सहभागींसाठी १४ जागरूकता शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांसाठी मंत्रालयाकडून २५१.८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीमध्ये डॉ. सोनकवडे यांच्यासह नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागातील डॉ. के.डी. पवार  आणि डा. टी.डी. डोंगळे हे सह-अन्वेषक म्हणून काम करणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी डॉ. सोनकवडे यांचे अभिनंदन केले असून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयास धन्यवाद दिले आहेत.

 

संशोधक, विद्यार्थ्यांसह उद्योजक-व्यावसायिकांनाही लाभ: कुलगुरू डॉ. शिर्के

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रात डीएसटी-सैफ उपक्रमांतर्गत विविध अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे विश्लेषणासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यांचा जास्तीत जास्त उपयुक्त वापर शैक्षणिक संशोधनासह उद्योग-व्यवसाय क्षेत्रासाठीही व्हावा, त्या संदर्भात यथायोग्य जनजागृती व्हावी, या हेतूने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने स्तुती उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. डॉ. सोनकवडे यांनी या विभागांचा पदभार स्वीकारल्यापासून हा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी सातत्याने विविध कार्यशाळा, शिबिरे घेऊन ते संशोधक, विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांना मार्गदर्शनही करीत असतात. संशोधकीय अनुभवाचा लाभ देत असतात. स्तुती उपक्रमामुळे विद्यापीठाच्या या प्रयत्नांना अधिक पाठबळ लाभले आहे. या उपक्रमांत सहभागी होण्याची संधी संशोधक, विद्यार्थी यांच्यासह उद्योग-व्यवसाय क्षेत्रांनीही घ्यावी, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या निमित्ताने केले आहे.

Wednesday, 24 March 2021

विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन पृथक्करण सुविधांचा संशोधकांनी लाभ घ्यावा: डॉ. राजेंद्र सोनकवडे

 

शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रातील अत्याधुनिक संशोधन पृथक्करण सामग्री

शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रातील अत्याधुनिक संशोधन पृथक्करण सामग्री

शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रातील अत्याधुनिक संशोधन पृथक्करण सामग्री

शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रातील अत्याधुनिक संशोधन पृथक्करण सामग्री


कोल्हापूर, दि. २४ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रामध्ये अत्याधुनिक संशोधन पृथक्करण उपकरणांची वापराची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संशोधकांसह विविध उद्योग-व्यवसायांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ विज्ञान उपकरण केंद्र व सामान्य सुविधा केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी केले आहे.

Dr. R.G. Sonkavade
डॉ. सोनकवडे यांनी म्हटले आहे की, शिवाजी विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याद्वारे १९७९ साली 'विद्यापीठ विज्ञान उपकरण केंद्राची (USIC) उभारणी करण्यात आली. या केंद्रांतर्गतच १९८४ साली 'सामान्य सुविधा केंद्राची' (सी.एफ.सी.- कॉमन फॅसिलिटी सेंटर) सुरुवात करण्यात आली. संशोधन क्षेत्रातील विविध पदार्थांच्या नमुन्यांच्या पृथक्‍करणाची सुविधा अत्यंत अल्पदरात सर्वांना उपलब्ध करून देणे, विद्यापीठांतर्गत तसेच बहिर्विद्यापीठीय अधिविभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांतील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, तांत्रिक अधिकारीवृंद यांच्यासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम यांची अंमलबजावणी करणे हा उद्देश 'सामान्य सुविधा केंद्र' सुरू करण्यामागे होता. केंद्राची सुरवात अवघ्या चार उपकरणांपासून झाली. आज या केंद्रात अत्याधुनिक, अद्ययावत अशी एकूण १३ उपकरणे आहेत.

या केंद्रात फॉरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्र्टोफोटोमीटर (एफटीआयआर), गॅस क्रोमॅटोग्राफी- मास स्पेक्ट्रोमीटर (जीसीएमएस), थर्मल ग्रॅव्हीमॅट्रीक- डिफरन्शियल थर्मल एनालिसीस- डिफरन्शियल स्कॅनिंग कॉलॉरीमीटर (टीजी-डीटीए-डीएससी), इंडक्टीव्हली कपल्ड प्लाझ्मा ऑप्टीकल एमिशन स्पेक्र्टोस्कोप, मायक्रोवेव्ह डायजेस्टीव्ह सिस्टीम, आणि पार्टीकल साइझ एनालायझर विथ झेटा पोटॅन्शियल ही वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध आहेत. अलिकडेच यांमध्ये अत्यंत अत्याधुनिक अशा एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर (एक्सआरडी एडव्हान्स्ड डी-८), व्हेक्टर नेटवर्क अनालायझर (व्हीएनए), अल्ट्रा सेंट्रिफ्युज, बायो-एटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप (बायो-एएफएम) आणि मायक्रो-रामन स्पेक्र्टोमीटर या उपकरणांची भर पडली आहे. याचबरोबर वैज्ञानिक विश्लेषणासाठी अत्यावश्यक मात्र सर्वांना सहजासहजी उपलब्ध होऊ न शकणारी एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोप (एक्सपीएस) आणि ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (टीईएम) ही उपकरणेही या केंद्रात उपलब्ध आहेत.

विद्यापीठातील गुणवंत संशोधक विद्यार्थ्यांना सुद्धा येथील उपकरणांच्या हाताळणीचे पूर्वप्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्यावरही देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा उपक्रम प्रगतीपथावर आहे. येथे उपलब्ध असणारी वैशिष्ट्यपूर्ण उपकरणे संशोधक विद्यार्थ्यांसह उद्योग, कारखानदारी, तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. कुशल व मेहनती मनुष्यबळामुळे परीक्षणासाठी पाठवलेल्या पदार्थांच्या नमुन्यांचे पृथक्करण जास्तीत जास्त अचूक व विश्वसनीयरित्या प्राप्त होऊ शकते. प्रयोगशाळा उपकरणांची स्वच्छता व गुणवत्ता याबाबतही केंद्र सजग आहे.

 

परीक्षणासाठी ऑनलाईन बुकिंगचीही सुविधा करणार

संशोधनांतर्गत विविध पदार्थांच्या नमुन्यांचे पृथक्करण अत्यंत जलद व अल्प दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सामान्य सुविधा केंद्रात पृथक्करणासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील केंद्राच्या पृष्ठावरच ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल. देय रक्कम  केंद्राला प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन बुकिंगचा संदेश संबंधितास त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होईल, अशी माहितीही डॉ. सोनकवडे यांनी दिली.