Showing posts with label SAIF. Show all posts
Showing posts with label SAIF. Show all posts

Sunday, 19 April 2026

शिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरव

समाजमाध्यमांवरून लघुचित्रफीत केली प्रसारित

शिवाजी विद्यापीठाचे सीएफसी-सैफ केंद्र

शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्रात उपलब्ध अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे


केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची लिंक्ड-इनवरील पोस्ट

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एक्स हॅंडलवरील पोस्ट

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या फेसबुक पेजवरील पोस्ट

(केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने शेअर केलेला शिवाजी विद्यापीठाच्या सैफ केंद्राचा व्हिडिओ)

(शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्राचे संचालक डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांची प्रतिक्रिया)


कोल्हापूर, दि. १९ एप्रिल: भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) शिवाजी विद्यापीठाच्या कॉमन फॅसिलिटी सेंटर- सोफिस्टिकेटेड अॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज (सीएफसी– सैफ) या विभागाच्या दर्जेदार कामगिरीची दखल घेतली आहे. विद्यापीठाच्या या केंद्रात उपलब्ध असलेली अत्याधुनिक उपकरणे आणि सुविधा यांची माहिती देणारी लघुचित्रफीत केंद्रीय विभागाने त्यांच्या समाजमाध्यमांच्या सर्व मंचावरून प्रदर्शित केली आहे. अशा प्रकारे केंद्रीय मंत्रालयाकडून गौरव होण्याचा बहुमान मिळविणारे शिवाजी विद्यापीठाचे ह देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या एक्स, लिंक्डइन आणि फेसबुक या समाजमाध्यमांच्या मंचांवरून शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्राची माहिती देणारी तीन मिनिटांची लघुचित्रफीत प्रदर्शित केली आहे. लघुचित्रफीतीसमवेत लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे पाठबळ लाभलेल्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील सोफिस्टिकेटेड अॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज' (#SAIF) हे केंद्र संपूर्ण भारतातील संशोधक, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना अत्याधुनिक विश्लेषणात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवा पुरवत आहे. मंत्रालयाच्या सैफ कार्यक्रमांतर्गत २०१४ मध्ये स्थापन झालेले हे केंद्र, अतिप्रगत उपकरणांच्या साहाय्याने अचूक विश्लेषण आणि नाविन्यपूर्णतेला चालना देऊन वैज्ञानिक संशोधनाला यशस्वीपणे बळकटी देत आहे.

या पोस्टमध्ये मंत्रालयाने खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह, सचिव अभय करंदीकर यांच्यासह केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय, सीएसआयआर-इंडिया यांना टॅग केले आहे.

या केंद्राचे संचालक डॉ. ज्योतीप्रकाश यादव यांनी मंत्रालयाकडून झालेल्या गौरवाबद्दल समाधान व्यक्त केले. केंद्राच्या वाटचालीविषयी सांगताना ते म्हणाले, विद्यापीठाच्या सीएफसी-सैफ केंद्रामध्ये एकूण सोळा विविध अतिउच्च दर्जाची अत्याधुनिक वैज्ञानिक संश्लेषक उपकरणे आहेत. त्यावर भारतातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांमधील संशोधकही आपल्या संशोधनाचे नमुने तपासणीसाठी पाठवित असतात. मागील पाच वर्षांचा आढावा घेत असता, सन २०२०-२१मध्ये देशभरातून २४०० नमुने तपासणीसाठी आले होते. त्या माध्यमातून दोन लाख ४४ हजार रुपये इतके उत्पन्न विद्यापीठास मिळाले होते. आता २०२५-२६मध्ये देशभरातील संशोधन संस्थांकडून तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या आठ हजारांच्या घरात गेली असून उत्पन्नही ५२ लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. त्याखेरीज केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यशाळा, विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम या माध्यमातून दरवर्षी साधारणतः १२०० विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरण हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येते. केंद्राच्या या सर्व विज्ञानाभिमुख कामगिरीची केंद्रीय मंत्रालयाने दखल घेतली, याचा मोठा आनंद वाटत आहे. यापुढील काळातही येथील उपकरणांची संख्या वाढविण्यात येऊन आणखी दर्जेदार व आधुनिक विश्लेषण सुविधा संशोधकांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळेच हा सन्मान केंद्राला लाभला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

--

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यमांवरून प्रसारित केलेल्या लघुचित्रफीतींच्या लिंक पुढीलप्रमाणे-

https://x.com/IndiaDST/status/2044997863554646129

https://www.linkedin.com/posts/indiadst_saif-ugcPost-7450765283746820096-xdk4?utm_source=share&utm_medium=member_desktop&rcm=ACoAAENLVvkBSDJcfw-kYkvD27JZxQSEgqi9udw

https://fb.watch/Gxs-uCul9M/ 

Wednesday, 2 February 2022

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून

‘स्तुती’ उपक्रमांतर्गत विद्यापीठास २.५ कोटींचा प्रकल्प

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा लोगो


कोल्हापूर, दि. २ फेब्रुवारी: केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्तुती या विशेष प्रशिक्षण उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठास सुमारे अडीच कोटी रुपयांचा प्रकल्प तत्त्वतः मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती विद्यापीठाच्या सैफ (SAIF), सीएफसी विभागांचे प्रमुख डॉ. आर.जी. सोनकवडे यांनी दिली.

डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पकालीन अभ्यासक्रम आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून विविध उपकरणे आणि विश्लेषणात्मक तंत्रांबद्दल लोकप्रियता आणि जागरूकता वाढविण्यासाठी  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून स्तुती (STUTI - Synergistic Training program Utilizing the Scientific and Technological Infrastructure) या प्रशिक्षण उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठाकडून प्रकल्प प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मंजुरी प्राप्त झाल्याचे पत्र विद्यापीठास प्राप्त झाले आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी असणाऱ्या या प्रकल्पातील उपक्रम आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत साजरे करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत किमान ३० जणांचा सहभाग असणाऱ्या एकूण २५ प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच, दि. २२ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या विज्ञान सप्ताहांतर्गत किमान ५० सहभागींसाठी १४ जागरूकता शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांसाठी मंत्रालयाकडून २५१.८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीमध्ये डॉ. सोनकवडे यांच्यासह नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागातील डॉ. के.डी. पवार  आणि डा. टी.डी. डोंगळे हे सह-अन्वेषक म्हणून काम करणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी डॉ. सोनकवडे यांचे अभिनंदन केले असून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयास धन्यवाद दिले आहेत.

 

संशोधक, विद्यार्थ्यांसह उद्योजक-व्यावसायिकांनाही लाभ: कुलगुरू डॉ. शिर्के

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रात डीएसटी-सैफ उपक्रमांतर्गत विविध अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे विश्लेषणासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यांचा जास्तीत जास्त उपयुक्त वापर शैक्षणिक संशोधनासह उद्योग-व्यवसाय क्षेत्रासाठीही व्हावा, त्या संदर्भात यथायोग्य जनजागृती व्हावी, या हेतूने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने स्तुती उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. डॉ. सोनकवडे यांनी या विभागांचा पदभार स्वीकारल्यापासून हा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी सातत्याने विविध कार्यशाळा, शिबिरे घेऊन ते संशोधक, विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांना मार्गदर्शनही करीत असतात. संशोधकीय अनुभवाचा लाभ देत असतात. स्तुती उपक्रमामुळे विद्यापीठाच्या या प्रयत्नांना अधिक पाठबळ लाभले आहे. या उपक्रमांत सहभागी होण्याची संधी संशोधक, विद्यार्थी यांच्यासह उद्योग-व्यवसाय क्षेत्रांनीही घ्यावी, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या निमित्ताने केले आहे.