![]() |
| शिवाजी विद्यापीठात प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अभय टिळक. मंचावर पल्लवी कोरगांवकर आणि तन्मय कोरगांवकर. |
कोल्हापूर, दि. ९ ऑक्टोबर: महाराष्ट्राचे अर्थकारण आज ते कुंठित शेती
आणि असंतुलित नागरीकरण अशा दुहेरी कोंडीत सापडले आहे. यावर मात करण्यासाठी
विकेंद्रित औद्योगीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. अभय
टिळक यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील कॉ. दत्ता देशमुख अध्यासनाच्या वतीने आयोजित 'प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत ते 'महाराष्ट्राचे अर्थकारण : प्रवाह आणि आव्हाने' या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरगावकर ट्रस्टच्या
विश्वस्त पल्लवी कोरगावकर होत्या.
डॉ. टिळक म्हणाले, महाराष्ट्राचा
भूगोल वैशिष्ट्यपूर्ण असून येथील शेतीचे अर्थकारण प्रामुख्याने पावसावर अवलंबून
आहे. अर्थकारणात बदल होत असताना त्याची सुरुवात आणि शेवट शेतीतूनच होतो. कृषी आणि
औद्योगिक क्षेत्राचा संतुलित विकास साधण्याची दृष्टी महाराष्ट्रात १९६० पासून
दिसून येते. तथापि, महाराष्ट्राच्या अर्थकारणातील चढउतारांमुळे जटिल समस्या
निर्माण झाल्या असून सहकार क्षेत्राची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. अशा
स्थितीत विकेंद्रित औद्योगीकरणाचा पर्याय स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे
विकासाची केंद्रे केवळ काही ठिकाणांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण, निमशहरी
प्रदेशांपर्यंत त्याची व्याप्ती वाढेल आणि अधिक समावेश विकास साधण्याची शक्यता
निर्माण होईल.
अध्यक्षीय मनोगतात पल्लवी कोरगावकर
म्हणाल्या, दातृत्वाची
भाषा वेगळी असून ती समजून घेतली पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो, त्याचे आपण देणे लागतो; त्यामुळे
समाजाप्रती आपले उत्तरदायित्व काय आहे, याचा
विचार करून प्रत्यक्षात कृती करायला हवी. त्यांनी यावेळी प्रभाकर ट्रस्टच्या
कार्याची सविस्तर ओळख करून दिली आणि विशेषतः प्रयोगशील शेती क्षेत्रातील
वाटचालीमुळे निर्माण झालेल्या रोजगारनिर्मितीमधील ट्रस्टच्या योगदानावर प्रकाश
टाकला.
डॉ. नेहा वाडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. दत्तात्रय
सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर अध्यासनाचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी आभार
मानले.
यावेळी भरत शास्त्री, तन्मय
कोरगावकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभ्यासक, नागरिक
आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment