Wednesday, 28 October 2026

झेक प्रजासत्ताकच्या संशोधन केंद्र शिष्टमंडळाची शिवाजी विद्यापीठास भेट

झेक प्रजासत्ताकच्या रिसर्च सेंटरचे संचालक विट डोकल यांचे शिवाजी विद्यापीठात स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. सोबत (डावीकडून) डॉ. आसावरी जाधव, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि ललित पाटील.


कोल्हापूर, दि. २८ ऑक्टोबर: झेक प्रजासत्ताकच्या इंटरनॅशनल न्यूरोडिजेनेरेटिव्ह डिसऑर्डर रिसर्च सेंटरच्या (INDRC) प्रतिनिधींनी शिवाजी विद्यापीठाला भेट देऊन संशोधनातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संभाव्य संधींबाबत चर्चा केली.

संशोधनातील आंतरराष्ट्रीय सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि आंतरविद्याशाखीय समन्वयाच्या माध्यमातून संशोधनाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठास काल झेक प्रजासत्ताक येथील इंटरनॅशनल न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसऑर्डर रिसर्च सेंटरचे संचालक विट डोकल आणि संस्थेचे एथिक्स अँड सिक्युरिटी मॅनेजर ललित पाटील यांनी भेट दिली. कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासमवेत त्यांनी संशोधन क्षेत्रातील परस्पर सहकार्य, संस्थात्मक समन्वय आणि भविष्यातील सहकार्याच्या संभाव्य दिशांवर विचारविनिमय केला.

यावेळी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांसमवेत संवाद वाढविणे आणि विविध शैक्षणिक क्षेत्रांतील कौशल्यांचा परस्परपूरक उपयोग करण्याचे शिवाजी विद्यापीठाचे धोरण आहे. त्या दृष्टीने या संवादाला मोठे महत्त्व आहे.

विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संगणकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे उपस्थित होते. विविध शैक्षणिक विभागांतील प्रतिनिधींच्या सहभागामुळे या चर्चेला आंतरविद्याशाखीय सहकार्याचीही व्यापक पार्श्वभूमी लाभली. डॉ. सोनल चोंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment