कोल्हापूर, दि. ६ ऑक्टोबर: महिलांमध्ये उपजतच असणारे सामाजिक व आर्थिक
व्यवस्थापन कौशल्य विकसित होण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज आहे, असे
प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य आणि
उद्योजकता विकास केंद्र व इंडोकाऊंट फाऊंडेशन अंतर्गत महालक्ष्मी कौशल्य विकास
केंद्र, गोकुळ शिरगाव यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित “ महिलांसाठी मार्केटिंग आणि विक्री कौशल्य”
या दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल (दि. ५) बोलत होते. अध्यक्षस्थानी
केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार होते, तर इंडोकाऊंटचे सल्लागार प्रफुल्ल
रंगारी प्रमुख पाहुणे होते.
डॉ. जत्राटकर म्हणाले, महिलांमध्ये
कुटुंबाचे अर्थकारण सांभाळण्याची, उपलब्ध संसाधनांचे योग्य नियोजन
करण्याची आणि मर्यादित साधनांतून घर चालविण्याची नैसर्गिक क्षमता असते. हीच क्षमता
योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून उद्योजकीय क्षेत्रात प्रभावीपणे
वापरता येऊ शकते. विक्री आणि मार्केटिंगचे मूळ संवादात आहे. ग्राहकांशी योग्य
संवाद साधता आला, तर उत्पादनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते
आणि विश्वासाचे नाते तयार होते. महिलांनी केवळ उत्पादननिर्मितीपुरते मर्यादित न
राहता बाजारपेठ, ग्राहकसंपर्क, ब्रँडिंग
आणि उत्पादन विविधीकरण यांचा विचार करावा, असे
आवाहन त्यांनी केले.
डॉ. जत्राटकर यांनी स्थानिक
बाजारपेठेतील संधी अधोरेखित करताना सांगितले की, बचत
गटांनी आपल्या परिसरातील ग्राहकांशी थेट संपर्क वाढवावा. सण-उत्सव, स्थानिक
विक्रीकेंद्रे, लहान दुकाने आणि घरगुती पुरवठा
व्यवस्था यांचा योग्य उपयोग करून महिलांना आपले उत्पादन अधिक प्रभावीपणे पोहोचविता
येते. छोट्या गटांनाही योग्य नियोजन, दर्जेदार
उत्पादन आणि ग्राहकांशी सुसंवाद यामुळे मोठे स्थान निश्चितपणे निर्माण करता येऊ
शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी
विद्यापीठ समाजातील सर्व घटकांसाठी कौशल्यविकास उपक्रम राबवत असून समाजाच्या मुख्य
प्रवाहात सर्वांना सन्मानाने स्थान मिळावे, ही
विद्यापीठाची बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रफुल्ल रंगारी म्हणाले, महिलांचे आर्थिक
सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने इंडोकाऊंट समूह सातत्याने प्रयत्नशील आहे. शिवाजी
विद्यापीठाच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला मोठे पाठबळ लाभले आहे. हे सहकार्य अधिक
वृद्धिंगत करून अधिकाधिक महिलांचे यामध्ये समावेशन व्हावे, या दृष्टीने पुढील
काळात प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. रामचंद्र पवार म्हणाले, महिलांनी
बचत गटांच्या माध्यमातून विविध उत्पादने तयार करण्याबरोबरच त्यांचे प्रभावी
ब्रँडिंग, मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापन कौशल्य
आत्मसात करणे आवश्यक आहे. उत्पादनाची गुणवत्ता जितकी महत्त्वाची आहे, तितकेच
योग्य बाजारपेठ शोधणे, ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचविणे आणि
विक्री विपणन या बाबीही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंचावर ग्रामोद्योग अधिकारी संदीप
माने, व्यवसाय मार्गदर्शक रविंद्र खैरे उपस्थित होते. स्मिता जाधव व दिशा अग्रवाल
यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेमध्ये श्री. खैरे यांनी मार्केटिंग, विक्री
कौशल्य, ग्राहकांशी संवाद, उत्पादनाचे
सादरीकरण आणि व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक विविध बाबींवर मार्गदर्शन केले. महिला बचत
गटांच्या सदस्यांचा कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे स्वागत व
प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक प्रमोद कांबळे यांनी केले. कौशल्य विकास अधिकारी ईश्वर
पुजारी यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment