‘आय-स्टेम’च्या पोर्टलवर संशोधकांकडून सर्वाधिक नोंदणी
शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी सैफ-डीएसटी केंद्रामधील एक्स.आर.डी. उपकरण टीजीए-डीटीए-डीएससी एफ.टी.आय.आर.
कोल्हापूर, दि. ३० जुलै: अल्प कालावधीत गतिमान व दर्जेदार संशोधकीय नमुना विश्लेषण करून
देण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रातील तीन अत्याधुनिक
उपकरणांना देशभरातील संशोधकांची पसंती लाभत असून या उपकरणांसाठी भारत सरकारतर्फे
विकसित पंतप्रधानांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांच्या ‘इंडियन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग फॅसिलिटीज मॅप’ (आय-स्टेम) या पोर्टलवर सर्वाधिक
नोंदणी प्राप्त झाली आहे. ‘आय-स्टेम’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्राच्या सैफ-डीएसटीचे
प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी दिली.
डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या
माहितीनुसार, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यासह विविध
वैज्ञानिक विभागांमार्फत देशातील विविध संस्थांना अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे
देण्यात येतात. या उपकरणांवरील पृथक्करणासाठी ‘आय-स्टेम’चे (बंगळुरू) पोर्टल निरीक्षण व नोंदणी सुविधा प्रदान करते. या पोर्टलवर
देशभरातील २२७७ संस्थांची २५,८८१ शास्त्रीय उपकरणे नोंद आहेत.
या नोंदणीमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून १७२ संस्थांनी
या पोर्टलवर नोंदणी केली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचाही समावेश आहे.
पोर्टलवरील माहितीनुसार, भारतात संशोधकीय नमुना विश्लेषणासाठी आठ उपकरणे सर्वाधिक
वापरली जातात. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्रातील
(सीएफसी) सोफिस्टिकेटेड अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी (सैफ-डीएसटी) केंद्रातील
एक्स रे
पॉवर डिफ्रॅक्शन (एक्सआरडी), फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड
स्पेक्ट्रोमीटर (एफटीआयआर), थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अॅनालायझर-
डिफ्रन्शियल थर्मल अॅनालिसिस
-डिफ्रन्शियल स्कॅनिंग कॅलोरीमीटर (टीजीए-डीटीए-डीएससी)
या तीन उपकरणांची सर्वाधिक मागणी असणारी व सेवा प्रदान करणारी उपकरणे म्हणून नोंद
झाली आहेत. विश्लेषणात्मक पृथ:क्करणासाठी देशभरातील संशोधक ‘आय-स्टेम’ पोर्टलच्या
माध्यमातून शिवाजी विद्यापीठातील सैफ-सीएफसी-डीएसटी विभागांमध्ये नमुना पृथक्करणासाठी
मोठ्या संख्येने पाठवू लागले आहेत. येथील नमुना विश्लेषणही अतिशय गतिमान, दर्जेदार व
अचूक असल्याचा अभिप्रायही पोर्टलवर नोंदविण्यात आला आहे. ही शिवाजी विद्यापीठासाठी
अतिशय अभिमानाची बाब आहे.
विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा
केंद्राच्या सातत्यपूर्ण संचालनासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी व अधिकार
मंडळांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्यामुळेच हे यश मिळविणे शक्य झाल्याची
भावना डॉ. सोनकवडे यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रात एकूण
१४ आधुनिक शास्त्रीय विश्लेषक उपकरणे आहेत. ‘आय-स्टेम’कडून प्रत्येक
उपकरणाला कोड देण्यात आलेले आहेत. त्यामुळे संशोधकांना सॅम्पल पृथक्करणासाठी
पोर्टलवर जाऊन बुकिंग करणे सुलभ होते. शिवाजी विद्यापीठाच्या सैफ-डीएसटीकडील
एक्सआरडी, एफटीआयआर आणि टीजीए-डीटीए-डीएससी या
तीन उपकरणांसाठी अतिशय कमी वेळेमध्ये सर्वाधिक बुकिंग नोंद झाले आहेत. येथे
नमुन्यांचे पृथक्करणही अतिशय कमी वेळेमध्ये करून देण्यात येते. त्यामुळे येथील
बुकिंगमध्ये सातत्य दिसून आले आहे. येथील एक्सआरडी (कोड- २७३४६१३) साठी ७२६
सॅम्पलचे, एफटीआयआरसाठी (कोड- २७३४६२५) ३१९ सॅम्पलचे तर टीजीए-डीटीए-डीएससी (कोड- २७३४६२४) साठी
२०६
सॅम्पलचे असे एकूण १२५१ सॅम्पलच्या पृथक्करणासाठी बुकिंग झाले आहे. या बुकिंगची
सविस्तर माहिती आय-स्टेम पोर्टलवर नोंद आहे.
या तीन उपकरणांमधून कोणते
विश्लेषण होते?
शिवाजी विद्यापीठाच्या
सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रामधील जी तीन उपकरणे विश्लेषणासाठी सर्वाधिक मागणी असणारी
आहेत, ती पुढीलप्रमाणे विश्लेषणासाठी वापरली जातात. एक्सआरडी उपकरणाद्वारे
संशोधकांनी बनवलेल्या रासायनिक पदार्थांमधील अणूंची रचना, त्यांचा
आकार, प्रकार हे गुणधर्म अभ्यासले जातात. एफटीआयआर उपकरण पदार्थाच्या रासायनिक
गुणधर्मातील घटक (Functional group) कोणता आहे, हे शोधून काढण्यासाठी अतिशय
उपयुक्त ठरते. हे सदर उपकरण अतिशय उपयोगाचे आहे. टीजीए-डीटीए-डीएससी
हे उपकरण पदार्थावर कमी अधिक प्रमाणात होणारा
उष्णतेचा परिणाम आणि तत्सम गुणधर्मांच्या अनुषंगाने माहिती विश्लेषित करण्याच्या
कामी उपयुक्त ठरते.
विश्लेषणाद्वारे
विद्यापीठास दोन वर्षांत सुमारे ३३ लाखांचे शुल्क
विद्यापीठाच्या सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रातील
विविध १४ उपकरणांद्वारे करण्यात आलेल्या विश्लेषणातून सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३
या दोन आर्थिक वर्षांमध्ये अनुक्रमे रुपये १०,३३,७०० आणि रुपये २३,२८,४६९ असे एकूण
३३ लाख ६२ हजार १६९ रुपयांचे शुल्क प्राप्त झाले आहे.
यातील एक्सआरडी उपकरणासाठी प्रति नमुना १५० रुपये
शुल्क आकारले जाते. या उपकरणाद्वारे सन २०२१-२२मध्ये २ लाख ६६ हजार ६५० आणि
२०२२-२३मध्ये ३ लाख ३१ हजार ९०० रुपये शुल्क मिळाले. एफटीआयआर उपकरणासाठी प्रति
नमुना २०० रुपये शुल्क आहे. त्यातून सन २०२१-२२मध्ये २ लाख २६ हजार ४०० रुपये आणि
सन २०२२-२३मध्ये २ लाख १० हजार ५०० रुपये शुल्क मिळाले. टीजीए-डीटीए-डीएससी
उपकरणासाठी प्रति नमुना ५०० रुपये शुल्क आकारले जाते. यातून सन २०२१-२२ मध्ये १
लाख ३३ हजार ४०० रुपये आणि सन २०२२-२३मध्ये ३ लाख ७६ हजार ५०० रुपये शुल्क प्राप्त
झाले.
तत्परता
व पारदर्शकता यामुळेच विद्यापीठाला पसंती: प्र-कुलगुरू
डॉ. पाटील
शिवाजी विद्यापीठाच्या
सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रामध्ये उपलब्ध असणारी अद्ययावत उपकरणे, त्यांची सुस्थिती
आणि अत्यंत तत्पर व जाणकार विश्लेषकांद्वारे मिळणारी अखंडित सेवा हे शिवाजी
विद्यापीठाच्या केंद्राचे वैशिष्ट्य आहे. येथे आलेल्या सॅम्पलचे गतिमान पद्धतीने पृथक्करण
करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आय-स्टेम पोर्टलवरही
सॅम्पल बुकिंगची तत्परता, पृथक्करणाच्या
बाबतीतली पारदर्शकता व विश्वासार्हता या बाबींमुळेच आय-स्टेम पोर्टलद्वारे देशभरातून
उच्चांकी सॅम्पलचे बुकिंग या केंद्राला लाभत आहे, अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली.
आधुनिक
उपकरणांचा लाभ संशोधनासाठी सर्वदूर होणे महत्त्वाचे: कुलगुरू डॉ. शिर्के
शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा
केंद्रामधील सैफ-डीएसटी येथे अत्याधुनिक स्वरुपाची १४ उपकरणे आहेत. अतिशय
महत्त्वाच्या संशोधकीय पृथक्करणासाठी ती वापरली जातात. विद्यापीठातील संशोधकांना
तर ती उपलब्ध आहेतच, शिवाय, आय-स्टेमच्या माध्यमातून देशभरातील संशोधकांनाही
त्यांच्या संशोधनाच्या विश्लेषणासाठी या उपकरणांचा लाभ होतो आहे आणि त्यासाठी
सर्वाधिक मागणी नोंदविली जात आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. केंद्रप्रमुख डॉ.
राजेंद्र सोनकवडे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यासाठी अभिनंदनास पात्र आहेत, अशी
प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment