Saturday 29 July 2023

विद्यापीठात राष्ट्रीय धोरण सप्ताह पोस्टर स्पर्धेत फर्नांडिस, रंजन विजेते

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत आयोजित पोस्टर प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. धनंजय सुतार, डॉ. अविनाश भाले आदी.
 
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत आयोजित पोस्टर प्रदर्शनाची पाहणी करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत आयोजित पोस्टर प्रदर्शनाची पाहणी करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे.



कोल्हापूर, दि. २९ जुलै: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जनजागृती सप्ताहांतर्गत येथील शिवाजी विद्यापीठात काल (दि. २८) आयोजित पोस्टर प्रदर्शन व स्पर्धेमध्ये मर्सी फर्नांडिस व पुण्यश्री रंजन यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रामध्ये शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या वतीने अधिविभागांतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत (एनईपी २०२० विक @ एसयूके) पोस्टर प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा पाटणकर, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, सामाजिक समावेशन केंद्राचे डॉ. अविनाश भाले आणि समन्वयक डॉ. विद्यानंद खंडागळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अतिशय अभ्यासपूर्ण पोस्टर्सचे सादरीकरण केले. चार वर्षांचा पदवी कार्यक्रम, बहुप्रवेश-बहुनिर्गमन पद्धती, राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क, अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, भारतीय ज्ञान प्रणाली, कार्यस्थळावर प्रशिक्षण (इंटर्नशिप/ अप्रेंटिसशिप), सामुदायिक सहभाग, कौशल्य विकास, नवसुधारणा तसेच मुक्त व ऑनलाईन शिक्षण आदी महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी सर्व पोस्टरची पाहणी करून विद्यार्थ्यांशी त्याविषयी चर्चा केली आणि त्यांचे कौतुक केले. दिवसभरात कॅम्पसवरील विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनास भेट देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी जाणून घेण्यात रस दाखविला.

सायंकाळी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये मर्सी फर्नांडिस व पुण्यश्री रंजन यांनी प्रथम, बन्सी होवाळ व ऐश्वर्या कदम यांनी द्वितिय आणि अभिजीत गाताडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. डॉ. पाटणकर, डॉ. खंडागळे आदींच्या उपस्थितीत विजेत्यांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

 

No comments:

Post a Comment