विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करता येणार
कोल्हापूर, दि. १ जुलै: शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या तीन स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा
देण्यात आला आहे. या महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी
प्रदान करता येऊ शकणार आहे.
विद्यापरिषदेच्या शिफारशींवरून व्यवस्थापन परिषदेने नुकताच तीन स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा
प्रदान केला. यामध्ये दत्ताजीराव कदम टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीचे
टेक्स्टाईल ॲण्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी), विवेकानंद महाविद्यालय (कोल्हापूर) आणि राजारामबापू इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी (साखराळे, जि. सांगली) यांचा समावेश आहे.
या अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करण्याबरोबरच नवीन प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या मंजुरीने पीएचडीचे अभ्यासक्रम सुरु करणे, अभ्यासक्रमांची शुल्क रचना निर्धारित करणे अशा अनुषंगिक बाबींसाठीचे स्वातंत्र्य मिळणार आहे. स्वायत्त महाविद्यालयांत सुरु असलेल्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नामाभिधानाप्रमाणे अभ्यासक्रमांची नावे बदलणे, मूल्यांकनाची पद्धत निश्चित करणे, निकाल जाहीर करणे, गुणपत्रके बहाल करणे यांचीही मुभा मिळणार आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२३ मध्ये नमूद अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या तरतूदीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनातर्फे एकरूप परिनियम २२ मे, २०२३ च्या अधिसूचनेनुसार निर्गमित करण्यात आले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने २३ मे २०२३ रोजी परिपत्रक काढून स्वायत्त महाविद्यालयांकडून अधिकारप्रदत्त दर्जासाठी अर्ज मागविले होते. विद्यापीठास प्राप्त झालेल्या एकूण पाच अर्जांची रितसर दुबार छाननी करून एकूण तीन स्वायत्त महाविद्यालयांचे अर्ज पात्र करण्यात आले. सर्व पात्र अर्ज विद्यापरिषदेच्या शिफारशीने व्यवस्थापन परिषदेने मान्य केले.
शैक्षणिक स्वायत्ततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल: कुलगुरू डॉ. शिर्के
विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार उत्कृष्टताक्षम आणि
उच्चस्तरीय दर्जा प्राप्त केलेल्या, विद्यापीठाशी संलग्नित तीन स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून त्यांच्या
स्वायत्ततेच्या कालवधीइतका अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यात
येत आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक स्वायत्ततेकडे शिवाजी विद्यापीठाने
टाकलेले हे महत्वाचे पाऊल ठरेल, असा
विश्वास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment