विद्यापीठात ‘आनंदी श्रेष्ठत्व-ज्येष्ठत्व’ पुस्तकाचे प्रकाशन
शिवाजी विद्यापीठात आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी. मंचावर (डावीकडून) श्रीकांत आडिवरेकर, डॉ. आण्णासाहेब गुरव व डॉ. केदार मारुलकर. |
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित असणारे ज्येष्ठ नागरिक, शिक्षक व अन्य मान्यवर. |
कोल्हापूर, दि. ४
जुलै: ज्येष्ठ नागरिकांनी
आपल्या अनुभवाच्या आधारे सामाजिक कार्यामध्ये योगदान द्यावे, त्याचप्रमाणे नवी
पिढी घडविण्यासाठीही मार्गदर्शन करावे, असे आवाहन कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर
स्वामी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे डॉ. आण्णासाहेब गुरव
आणि श्रीकांत आडिवरेकर यांनी लिहीलेल्या ‘आनंदी श्रेष्ठत्व-ज्येष्ठत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले. त्या कार्यक्रमात ते
बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र अधिविभागात झालेल्या या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते.
काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, ज्येष्ठत्व हे वयावर नव्हे, तर अनुभवावर अवलंबून
असते. त्यामुळे आपले श्रेष्ठ वर्तन, आचार, राहणीमान याच गोष्टी आपल्याला अनुभवसमृद्ध
बनवितात आणि हे श्रेष्ठत्व माणसाला ज्येष्ठपदी घेऊन जाते. भावी पिढ्यांचे
दिग्दर्शन करणे ही या ज्येष्ठ पिढीने आपली जबाबदारी मानली पाहिजे. त्यासाठी आपले
अचूक जीवनच आपल्या पुढील पिढ्यांसाठी आदर्श असावे. मनुष्याने आपला अन्नपरीघ
ओलांडला आणि तेथूनच इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण होऊन शोषणाची सुरवात झाली.
म्हणूनच १ टक्का लोकांकडे ५७ टक्के जमीन अशी विषमता निर्माण झाली.
अशिक्षितांपेक्षा आज सुशिक्षितांकडूनच अधिक शोषण सुरू आहे. इतरांचा विचार करणेच
सोडून देणारे हे केवळ साक्षर आहेत, सुशिक्षित नव्हेच. त्यांना खऱ्या अर्थाने
परिस्थितीची जाणीव करून देऊन पर्यावरणातील सर्व घटकांचा विचार करण्यास प्रवृत्त करण्याची
जबाबदारी ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायला हवी. या जाणीवा आडिवरेकर व गुरव यांचे पुस्तक
निर्माण करते, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, माणसाने चांगले आयुष्य
जगण्यासाठी चांगल्या सवयी अंगी बाणवल्या पाहिजेत. आयुष्यभर इतरांसाठी कष्टत असताना
स्वतःच्या सुखी व निरोगी जीवनासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. तसे
केल्यास अचानकपणे एके दिवशी ज्येष्ठत्वाच्या उंबरठ्यावर एकाकी वाटणार नाही किंवा
ते असह्यही होणार नाही. थोडे आयुष्य स्वतःसाठीही जगायला शिकलेच पाहिजे. तरच आपण
इतरांनाही तसे सहजसुंदर आयुष्य जगण्याची ऊर्जा देऊ शकतो.
यावेळी काडसिद्धेश्वर स्वामी आणि कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते ‘आनंदी श्रेष्ठत्व-ज्येष्ठत्व’ या पुस्तकासह ‘फेस्कॉम’च्या ‘मनोहारी
मनोयुवा’ नियतकालिकाचेही
प्रकाशन करण्यात आले. श्रीकांत आडिवरेकर आणि डॉ. आण्णासाहेब गुरव यांनी
पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. केदार मारुलकर यांनी सूत्रसंचालन केले व
आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या दूर व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ.
डी.के. मोरे, आजीवन अध्ययन केंद्राचे डॉ. रामचंद्र पवार, डॉ. दीपा इंगवले
यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment