कोल्हापूर, दि. २१ जुलै: महाराष्ट्र लोकसेवा
आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे माजी क्रिकेटपटू प्रशांत श्रृंगारे आणि रजत खोपडे यांनी यश संपादन केल्याबद्दल विद्यापीठातर्फे त्यांचा
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे प्रशांत श्रृंगारे
यांची पी.एस.आय. पदी, तर रजत खोपडे यांची मंत्रालय सहाय्यकपदी निवड झाली आहे. या दोघाही खेळाडूंनी २०१३ ते २०१५ साली शिवाजी
विद्यापीठाचे आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, खेळाडू म्हणून कारकीर्द घडवत असतानाच त्याच्या बरोबरीने स्पर्धा परीक्षेमध्ये या दोघांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्राद्वारे करिअर घडविण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही आदर्शवत स्वरुपाचे आहे. आपल्या या नूतन जबाबदाऱ्या पेलत असताना क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष न करता आपली कारकीर्द घडवित राहावे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. पाटील यांनी या खेळाडूंशी परीक्षेसंदर्भात येणार्या अडचणी आणि अभ्यासाचे नियोजन याविषयी चर्चा केली. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, प्रा. सुचय खोपडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment