शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. उदय जोशी. मंचावर (डावीकडून) डॉ. राजन पडवळ, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व वैशाली आवाडे. |
कोल्हापूर, दि. २२
सप्टेंबर: सहकार क्षेत्राने
गेल्या काही वर्षांत अनेक चढउतार अनुभवले असले तरी नजीकच्या कालखंडात सहकारी
बँकिंग क्षेत्रासमोरील समस्या कमी होतील, असा आशावाद नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन
को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज् लिमिटेड तथा ‘नॅफकब’चे
संचालक डॉ. उदय जोशी यांनी काल येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या बँक ऑफ इंडिया अध्यासन आणि गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार
सहकार प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. लक्ष्मणराव इनामदार
यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सहकारी
बँकांची भविष्यातील वाटचाल’
या विषयावरील विशेष व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते, तर कुलसचिव डॉ.
विलास शिंदे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे, संजय परमणे प्रमुख
उपस्थित होते.
डॉ. उदय जोशी म्हणाले, देशात बँकांच्या वाढीला मोठी संधी आहे. सहकारी बँकांचे
देशातील प्रमाण अवघे ३ टक्के आहे. त्यांनाही वाढीची संधी आहे. मात्र, त्यांची सेंद्रिय
वाढ झालेली नाही. गेल्या तीनेक वर्षांत आम्ही सहकारी बँकांच्या वतीने धोरण
बदलासाठी म्हणून रिझर्व्ह बँकेकडे खूप रदबदली केली आहे. या बँकांवरील नियंत्रण,
नियमन प्रणाली अधिक सक्षम करा, पण परवानगी द्या, असा आग्रह धरला. परिणामी,
रिझर्व्ह बँकेने आता सहकारी बँकांच्या अनुषंगाने धोरणात्मक लवचिकता स्वीकारली आहे.
धोरणांमध्ये बँकेने अनेक सकारात्मक बदल केल्याचे जाणवते आहे. आपण आपले म्हणणे
योग्य पद्धतीने मांडल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. त्यातूनच आज सहकारी
बँकिंगसाठी पोषक परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे. नजीकच्या काळात आणखी चांगले
बदल दिसतील आणि या क्षेत्रासमोरील समस्या कमी होतील.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी सहकार क्षेत्राला
ऊर्जितावस्था आणण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, सहकारी बँकांनी आधुनिकतेची
कास धरीत डिजीटल सुविधा उपलब्धतेच्या दिशेने जायला हवे. रिझर्व्ह बँकेच्या या
संदर्भातील धोरणांचाही संशोधनात्मक अभ्यास गरजेचा असून या विषयाच्या अनुषंगाने
विद्यापीठ स्तरावर सातत्यपूर्ण चर्चा होणे लाभदायी ठरेल.
यावेळी वैशाली आवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या वाणिज्य व
व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले.
अध्यासनाचे समन्वयक डॉ. राजन पडवळ यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment