Friday 1 September 2023

एम.ए.योगशास्त्र अभ्यासक्रमामुळे जगभरामध्ये रोजगाराची उत्तम संधी - ज्येष्ठ योगतज्ज्ञ कृष्णा जोशी

कोल्हापूर, दि.01 सप्टेंबर - योगाभ्यासास जगभरात प्रशंसा आणि लोकप्रियता मिळत आहे.  योगशास्त्राचे गाढे अभ्यासक बनून जगभरामध्ये योगाचा प्रचार आणि पसार करण्याची रोजगार प्राप्त करण्याची उत्तम संधी शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए.योगशास्त्र या अभ्यासक्रमामुळे निमार्ण झालेली आहे, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ योगतज्ज्ञ कृष्णा जोशी (दादा) यांनी आज येथे केले.


            शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागामार्फत या शैक्षणिक वर्षापासून एम.ए.योगशास्त्र या दोन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी ज्येष्ठ योगतज्ज्ञ कृष्णा जोशी (दादा) प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये करण्यात आले.अध्यक्षस्थानीप्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील उपस्थित होते. वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन आणिव्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            पुढे बोलताना ज्येष्ठ योगतज्ज्ञ जोशी म्हणाले, जगभरातील लोक निरोगी जीवन जगण्यासाठी योगाभ्यास करत आहेत.आसन, प्राणायम ध्यानधारणा यांच्या संयुक्त अभ्यासामुळे रोगी निरोगी व्यक्तींना आरोग्यसंपन्न जीवन जगता येते. योगशास्त्र हे अत्यंत चांगल्या पध्दतीने रचलेले आहे.योगशास्त्र मानवी शरीर मनावर सुयोग्य परिणाम घडवून आणते.शरीर आणि मनाच्या जडणघडणीचे सर्व बारकावे लक्षात घेवून योगशास्त्रात विविध प्रकारच्या अवस्थांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.योगिक प्रक्रियांचा शरीरातील महत्वांची इंद्रिये संस्थांवर अधिकाधिक परिणाम होतो.त्यामुळे दररोज माणसाने योगासने केली तर विविध स्वरूपाचे फायदे प्राप्त होतात. श्वसनसंस्था फुफ्फुसांची कार्यशक्ती वाढते.संपूर्ण शरीराच्या पेशींना शक्ती स्फूर्ती मिळते.माणसाला मानसिक शांती लाभून रक्ताभिसरण सुरळीत होते.संपूर्ण शरीर हलके ताजेतवाने होते.मानसिक तणाव नष्ट होवून माणसाच्या शरीरात नवचैतन्य येते. योगसनांचे विविध फायदे असले तरी योगासने करण्याचे काही नियम आहेत.योगासने हे योग्य पध्दतीने केले तरच त्याचे मोठया प्रमाणात फायदे मिळतात.योगासने आपल्याला दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी ऑक्सिजन पुरवतात आणि उत्साह द्विगुणीत करतात. मानसिक आरोग्य सुदृढ बनते. ताण-तणाव कमी होवून चिंता मुक्त होता येते.योगा करण्यासाठी कोणत्याही जड आणि महागडया साधनांची आवश्यकता नसते.योग ही भारताची एक प्राचीन आणि सशक्त व्यायामाची कला आहे.आपल्याला तंदुरूस्त आणि निरोगी राहण्यास मदत करते.  योगामुळे लक्ष आणि एकाग्रता शक्ती वाढते.काम करण्यासाठी आणि दिवसभर सक्रीय राहण्यासाठी उर्जा निर्माण करते.आजच्या व्यस्त जीवनात, तणाव दूर करण्यासाठी योगाकडे एक औषध म्हणून पाहिले पाहिजे.


         आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील म्हणाले, सध्याचे राष्ट्ऱ्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये महत्वाचे एक घटक भारतीय ज्ञान प्रणाली हे आहे.भारतीय ज्ञान प्रणालीचे अध्ययन, अध्यापन कसे केले पाहिजे, याबद्दल विस्तृत विवेचन केलेले आहे.भारतीय शास्त्रीय ज्ञान यामध्ये लपलेले आहे.आपल्या देशामध्ये पूर्वीपासून योगशास्त्राचे ज्ञान उपलब्ध होते.त्याला परत एकदा मोठयाप्रमाणामध्ये ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगाअभ्यास उत्तम प्रकारे आत्मसात केले पाहिजे.विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान घेत असो त्यांना भारतीय ज्ञान प्रणालीची ओळख करून देणे खूप महत्वाचे आहे.विद्यार्थ्यांना मन, मनगट आणि मेंदू सशक्त करण्यासाठी योगशास्त्र अत्यंत उपयुक्त आहे.देशाला आर्थिकदृष्टया मजबूत बनविण्यासाठी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ज्ञानाची नवनिर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील होणे आवश्यक आहे.योगशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्या पध्दतीच्या संशोधन प्रणालीचा अवलंब केला आहे हे विद्यार्थ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे.

याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे मनोगतामध्ये म्हणाले, योगा अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्वाचा विकास करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.योगामुळे मेंदू सक्रीय आणि कार्यक्षम बनतो. ज्ञान निर्मितीची चालना मिळण्याकरिता योगा अभ्यास आत्मसात करणे आवश्यक आहे. योगा अभ्यासाचे महत्व आणि तांत्रिक स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, योगा अभ्यासामुळे मानवी जीवन उच्च स्थितीत पोहचविण्यासाठी शास्त्रीय पध्दतीचा अवलंब केला पाहिजे.आरोग्याच्या सशक्तीकरणासाठी योगा अभ्यासाचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी करतील.योगामुळे आनंदी जीवन जगण्याचा प्रवास सुखकर होणे शक्य आहे.

याप्रसंगी, चंद्रकांत कांबळे यांनी योग नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार यांनी केले.योगशिक्षक आसावरी कागवाडे आणि प्रिती चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.योगशिक्षक कानिफनाथ पंढरे यांनी आभार मानले.

यावेळी, दत्तात्रय पाटील, रविंद्र खैरे, सुरज पाटील, राजेंद्र जाधव यांचेसह विद्यार्थी, शिक्षक, मोठया प्रमाणात उपस्थित होते.

-----

No comments:

Post a Comment