शिवाजी विद्यापीठात नूतन कुलसचिवांचे स्वागत
शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे प्रशासनाच्या वतीने औपचारिक स्वागत करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह अधिकारी. |
कोल्हापूर, दि. ३१
ऑगस्ट: मातृसंस्थेप्रती
निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या बळावर डॉ. विलास शिंदे शिवाजी
विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा लौकिक उंचावतील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलसचिव यांचे आज विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने
औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. प्र-कुलगुरू
डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाचे विद्यार्थी असलेल्या डॉ. शिंदे
यांनी येथे शिक्षक, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत आज कुलसचिव पदापर्यंत मजल
मारली आहे, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. या पदावरील व्यक्तीकडून वरिष्ठांसह सर्व
घटकांच्या अपेक्षा असतात. त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असते. मात्र, डॉ.
शिंदे हे त्यांच्या अनुभवाच्या बळावर त्यांची कारकीर्द संस्मरणीय बनवतील, याची
खात्री वाटते. विद्यापीठाच्या सर्व घटकांचे त्यांना या कामी सहकार्य लाभेल, अशी
अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, डॉ. शिंदे यांची कामावरील निष्ठा उल्लेखनीय
आहे. विद्यापीठ नेहमीच त्यांच्या प्राधान्यक्रमावर सर्वोच्च स्थानी असते.
त्यांच्या या निष्ठेचेच फलित म्हणून त्यांना कुलसचिव पद भूषविण्याचा सन्मान लाभला
आहे. ते या संधीचे निश्चितपणे सोने करतील.
सत्काराला उत्तर देताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, विद्यापीठात
उपकुलसचिव पदावर काम करीत असताना जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन असे व्यक्तीगत
प्राधान्याचे विषय घेऊन काम करीत आलो. मात्र, कुलसचिव पदाच्या कारकीर्दीत संस्थात्मक
कामे ही सर्वोच्च प्राधान्याचा विषय असतील. त्यामध्ये उपरोक्त कामांचाही समावेश
असेल. कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी ही जबाबदारी सोपवून जो एक
विश्वास दाखविला आहे, तो सार्थ करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी सर्व घटकांचे
सहकार्य लाभणे फार महत्त्वाचे असून सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठ हितासाठी काम
करीत राहीन, याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व ग्रंथभेट प्रदान
करून विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने नूतन कुलसचिव डॉ. शिंदे यांचे स्वागत करण्यात
आले. मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी यावेळी स्वागत
व प्रास्ताविक केले. आस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे यांनी आभार मानले.
व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विज्ञान व तंत्रज्ञान
विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.
अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, तंत्रज्ञान अधिविभागाचे
संचालक डॉ. एस.एन. सपली, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश
गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.
रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह प्रशासकीय
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment