Friday 18 August 2023

विद्यार्थ्यांत सर्व विषयांप्रती जिज्ञासा, आदरभाव आवश्यक: डॉ. नानासाहेब थोरात

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. नानासाहेब थोरात. मंचावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. नानासाहेब थोरात.


कोल्हापूर, दि. १८ ऑगस्ट: विद्यार्थ्यांमध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाचा दृष्टीकोन विकसित करण्यासाठी त्यांच्या मनात सर्व विषयांप्रती जिज्ञासा आणि आदरभाव निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक व ऑक्सफर्ड विद्यापीठाचे मेरी क्युरी फेलो डॉ. नानासाहेब थोरात यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कक्षाच्या वतीने मीट दि सायंटिस्ट या उपक्रमांतर्गत आज सकाळी डॉ. थोरात यांचे आंतरविद्याशाखीय संशोधनातील जागतिक संधी व उपयोजन या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठातील एम.एस्सी.च्या पदवीपासून ते ऑक्सफर्ड विद्यापीठापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीमधील आंतरविद्याशाखीय ज्ञानाचे व उपयोजनाचे योगदान विषद करून डॉ. थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांनी आज ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेकडे अधिक व्यापक दृष्टीकोनातून पाहायला हवे. विज्ञान विषयांइतकेच तत्त्वज्ञान आणि सामाजिक शास्त्रांतील ज्ञान व संशोधनही महत्त्वाचे आहे. एका विषयामध्ये तज्ज्ञ होणे गरजेचे आहेच; पण, अन्य विषयही समजावून घेण्यास प्राधान्य द्यावे. अन्य विषयांतील संज्ञा, संकल्पना समजावून घेऊन त्यांची आपल्या विषयातील संज्ञा व संशोधनाशी सांगड घालता आली पाहिजे. त्यासाठी भरपूर वैविध्यपूर्ण वाचन करून ज्ञानसंपादन करायला हवे. संशोधनाच्या संधी शोधायला हव्यात. या सवयीतून प्रयोगशीलतेला अधिक चालना मिळण्यास मदत होते आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाला बळ लाभते. त्यातून नवसंशोधन व नवनिर्मितीच्या शक्यता वृद्धिंगत होतात. यातून दर्जेदार मनुष्यबळ विकसित होण्यासही मदत होते.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, विद्यार्थी कोणत्या पार्श्वभूमीतून आला, यापेक्षा त्याची ज्ञानासक्ती आणि मानवजातीची सेवा करण्याची आकांक्षा या बाबी महत्त्वाच्या असतात. स्वतऋ डॉ. थोरात त्याचे उदाहरण आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा धाडसी निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. अपयशाची भीती न बाळगता जागतिक संधी मिळविण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासा टिकविण्यासाठी आणि शमविण्यासाठी सातत्याने प्रश्न विचारायला हवेत. महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित करायला हवे. सर्वोत्कृष्टतेचा ध्यास बाळगून विविध विद्याशाखांमध्ये संयुक्त संशोधन सहकार्य वृद्धिंगत होणे आवश्यक आहे. विद्याशाखांमधील, विविध विभागांमधील ज्या साम्यभेदांच्या सीमा आहेत, त्या कमी व्हायला हव्यात. आपल्या विभागातून दर्जेदार मनुष्यबळ निर्माण करण्याची आस घेऊन संशोधन प्रकल्पांची अंमलबजावणी करायला हवी.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय कक्षाचे संचालक डॉ. एस.बी. सादळे यांनी केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, संशोधक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment