वर्षभर चाललेल्या ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ ध्वनीमालिकेचा हृद्य समारोप
कार्यक्रमास उपस्थित शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी. |
कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: भारताला
स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले
आहे. ते स्वातंत्र्य टिकविणे ही आजच्या तरुणांची व भावी पिढ्यांची जबाबदारी आहे,
असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव भुजंगराव माने यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि
जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजादी का
अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ‘शिव-वाणी’ या युट्यूब
ध्वनीवाहिनीवरुन गेल्या १५ ऑगस्ट २०२२पासून दररोज सकाळी ९ वाजता सलग वर्षभर प्रसारित
करण्यात आलेल्या ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ या ध्वनीमालिकेचा
समारोप आज येळावी (ता. तासगाव, जि. सांगली) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या
प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी
शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक
माने यांचा विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात
आला. याचा संदर्भ देऊन माने आपल्या मनोगतात म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने केलेला
माझा सत्कार हा मी स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या आणि झटलेल्या प्रत्येक
स्वातंत्र्यसैनिकाच्या वतीने अत्यंत विनम्रतापूर्वक स्वीकारतो. भारतीय
स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली
आम्ही १९४२च्या आंदोलनात सहभागी झालो. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील
प्रतिसरकारही यशस्वी करून दाखविले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झटणारी आणि
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते राखणारी माणसं तयार केली. भारताचे स्वातंत्र्य फार
कष्टातून साकारलेले आहे. ते टिकविण्याची जबाबदारी तरुण खांद्यावर आहे. त्यांनी
त्यासाठी पराकाष्ठा करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक
माधवराव माने यांनी आपल्या तल्लख स्मरणशक्तीच्या जोरावर वयाच्या ९९व्या वर्षीही
स्वातंत्र्यलढ्याच्या व प्रतिसरकार आंदोलनाच्या अनेक आठवणी सांगून उपस्थित
तरुणांना रोमांचित करून सोडले.
यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अरुण भोसले
म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यचळवळ म्हणजे इतिहासात स्वातंत्र्यासाठी ९० वर्षांहून
अधिक काळ चाललेला प्रदीर्घ लढा म्हणून नोंदला गेला आहे. त्यामुळे आपल्या
स्वातंत्र्यसैनिकांची संख्याही मोठी आहे. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांप्रमाणे
खालच्या स्तरावर चळवळ चालविणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची फारशी नोंद घेतल्याचे आढळत
नाही. शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती जमा
करून त्यांची नोंद घेऊन एक महत्त्वाचा संदर्भसंग्रह भावी पिढ्यांसाठी निर्माण केला
आहे. हे फार मोलाचे काम असून अत्यंत अभिमानास्पद स्वरुपाचे आहे.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, शिवाजी
विद्यापीठाचा जनसंपर्क कक्ष आणि इतिहास अधिविभाग यांनी स्वातंत्र्यसैनिकांची
मालिका वर्षभर चालवून इतिहास घडविला आहे. ही जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे
सांभाळली आहे. स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात
स्वातंत्र्यसैनिकांची माहिती संकलित करून लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी
केलेले प्रयत्न कौतुकास पात्र आहेत.
कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले,
शिवाजी विद्यापीठाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या
स्मृतींना उजाळा देण्याचा उपक्रम वर्षभर चालवून जणू दररोज अमृतमहोत्सव साजरा केला.
आज या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांची
उपस्थिती लाभणे हा दुग्धशर्करायोग आहे. त्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रमही
अविस्मरणीय बनविला. ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ या उपक्रमातून
विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याच्या स्मृती
जागविल्या आणि एक कायमस्वरुपी दस्तावेज निर्माण केला. हा देशातील अन्य
विद्यापीठांसाठीही एक वस्तुपाठ ठरावा.
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर
यांनी यावेळी ‘शिव-वाणी’ ध्वनीवाहिनी आणि ‘अभिवादन
स्वातंत्र्यसैनिकांना’ या ध्वनीमालिकेमागील निर्मिती प्रक्रिया उलगडून
सांगितली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याच संकल्पनेतून हा उपक्रम यय़स्वीरित्या
साकारल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव
भुजंगराव माने यांनाच समर्पित असलेला ‘अभिवादन
स्वातंत्र्यसैनिकांना’ या मालिकेतील अखेरच्या ३६६व्या भागाचे
त्यांच्याच उपस्थितीत प्रसारण करण्यात आले. या मालिकेवर आधारित प्रश्नमंजुषेमधील
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर मालिकेच्या
यशस्वितेमध्ये मोलाचे योगदान देणारे डॉ. अरुण भोसले, इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश
पाटील, डॉ. दत्तात्रय मचाले, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. भारतभूषण माळी (सांगली), डॉ.
अजितकुमार जाधव (सातारा), डॉ. धीरज शिंदे (कोल्हापूर), डॉ. सुरेश शिखरे, सुस्मिता
खुटाळे, मल्हार जोशी, विनायक ठोंबरे यांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र
व ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास
शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश
गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद
बनसोडे यांच्यासह अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना या मालिकेसाठी योगदान देणारे
जिल्हा समन्वयक, विविध महाविद्यालयांतील इतिहास विभागांचे प्रमुख, शिक्षक, संशोधक
व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रश्नमंजुषेमध्ये
जाधव, खिलारी व घोडे प्रथम
शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वाणी’ वाहिनीवरुन
प्रसारित झालेल्या ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ या ध्वनीमालिकेवर
आधारित जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जिल्हास्तरीय
निकाल अनुक्रमे असा: सातारा जिल्हा: वैष्णवी नानासाहेब
जाधव (शहाजीराजे महाविद्यालय, खटाव), धनश्री संजय पाटोळे (शहाजीराजे महाविद्यालय,
खटाव) आणि कल्याणी तानाजी जाधव (शहाजीराजे महाविद्यालय, खटाव). सांगली जिल्हा: संजीवनी शहाजी
खिलारी (नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालय, झरे), स्वप्नाली शामसुंदर पवार (नागनाथअण्णा
नायकवडी महाविद्यालय, झरे) आणि धैर्यशील मारुती जाधव (आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज,
आष्टा). कोल्हापूर जिल्हा: विश्वास आनंदा घोडे
(मराठी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), तुकाराम महादेव पाटील (र.भा.
माडखोलकर महाविद्यालय, चंदगड) आणि किरण विजय मुसळे (इतिहास अधिविभाग, शिवाजी
विद्यापीठ, कोल्हापूर).
No comments:
Post a Comment