Saturday, 5 August 2023

“स्पर्धा परीक्षेतील यशात विद्यापीठाचे मोलाचे योगदान”

 राज्यसेवेसह विविध स्पर्धा परीक्षांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या भावना

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व अन्य अधिकारी यांचेसमवेत विविध स्पर्धा परीक्षांत यश प्राप्त करणारे विद्यापीठाच्या केंद्राचे विद्यार्थी.


कोल्हापूर, दि. ५ ऑगस्ट: स्पर्धा परीक्षेतील आमच्या यशामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शन केंद्राचे आणि ग्रंथालयाचे मोलाचे योगदान आहे, अशी कृतज्ञतेची भावना महाराष्ट्र राज्यसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांत यश प्राप्त केलेल्या उमेदवारांनी आज येथे व्यक्त केले.

सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांत यश प्राप्त केलेल्या आपल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आज आयोजित करण्यात आला. त्यावेळी या यशस्वी उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी प्रतीक लंबे यांनी एमपीएससीद्वारे सहाय्यक कक्ष अधिकारी व राज्य कर निरीक्षक आणि राज्यसेवेद्वारे सहाय्यक आयुक्त (महानगरपालिका/मुख्याधिकारी), प्रिया काटकर यांनी एमपीएससीद्वारे राज्य कर निरीक्षक आणि राज्यसेवेद्वारे कामगार अधिकारी, अजिंक्य इंगवले यांनी सहाय्यक निबंधक (सहकार) (राज्यसेवा), सौरभ साळुंखे यांनी पोलीस उपनिरीक्षक (एमपीएससी), प्रशांत श्रृंगारे यांनी पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय क्लार्क (एमपीएससी), रजत खोपडे यांनी मंत्रालय क्लार्क (एमपीएससी), धनश्री मौर्य यांनी न्यायालय क्लार्क (मुंबई उच्च न्यायालय), श्रीधर गुरव यांनी राज्य कर निरीक्षक (एमपीएससी) आणि स्नेहा मोरे यांनी सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (भारतीय पोस्ट) यांनी यश प्राप्त केले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह व ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात येऊन पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी प्रतीक लंबे यांनी अत्यंत माफक शुल्कात विद्यापीठाने उपलब्ध केलेले मार्गदर्शन आणि ग्रंथालय सुविधा यांनी आपल्या यशात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले. अजिंक्य इंगवले यांनी आपण कोणत्याही खाजगी क्लासविना केवळ विद्यापीठाच्या केंद्रामधील अध्ययन साहित्याच्या आधारे केलेल्या स्वयंअध्ययनामुळे यश मिळवू शकल्याचे सांगितले. प्रिया काटकर यांनी विद्यापीठाच्या परिसरामध्ये अभ्यासाला अत्यंत पोषक वातावरण असून इथे आले की अभ्यासाला चालना मिळत राहिली, म्हणूनच यश साध्य झाल्याचे सांगितले. सौरभ साळुंखे यांनी सन २०१९मध्ये विद्यापीठ प्रशासनाने महापूर काळात आपद्ग्रस्तांना केलेली मदत आणि उभारलेली निवारा केंद्रे पाहून प्रशासनात जाऊन जनसेवा करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, स्पर्धा परीक्षार्थींना कमीत कमी शुल्कात जास्तीत जास्त सुविधा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांचे फलित म्हणजे येथील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश होय. या उमेदवारांनी प्रशासकीय सेवेमध्ये आपले काम हीच आपली ओळख बनवावी आणि आपल्यासह आपल्या कुटुंबियांचा आणि विद्यापीठाचा लौकिक उंचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह केंद्राच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

No comments:

Post a Comment