Wednesday, 23 August 2023

कोल्हापूरातील फौंड्री उद्योग हे देशाचे वैभव - उद्योगपती प्रफुल्ल वानखेडे

 

 

कोल्हापूर, दि.22 ऑगस्ट फौंड्री उद्योग हे कोल्हापूर शहराबरोबरच देशाचे वैभव आहे.या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मोठी संधी आहे.फौंड्री उद्योगामध्ये जगातील सर्वांत चांगली गुणवत्ता देणारे शहर म्हणजे कोल्हापूर ही खात्रीची जागा होय, असे प्रतिपादन प्रसिध्द उद्योगपती प्रफुल्ल वानखेडे यांनी केले.

            राष्ट्रीय फौंड्री दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ उद्योग कक्ष इन्स्टिटयूट ऑफ इंडियन फौंड्रीमन कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिध्द उद्योगपती प्रफुल्ल वानखेडे यांचे ''नवी औद्योगिक क्रांती आणि संधी'' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेे.राजर्षी शाहू सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते तर प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.


            उद्योगपती प्रफुल्ल वानखेडे पुढे म्हणाले,  कुशल मनुष्यबळाशिवाय फौंड्री उद्योगाचा भविष्यकाळ खूप अंधकारमय होवू शकतो. ज्या राज्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आहे त्या ठिकाणच्या फौंड्री उद्योगाची भरभराटी होत आहे. उद्योग क्षेत्रास सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे कुशल मनुष्यबळाची आहे.त्याची निर्मिती करणे ही आजची गरज आहे.काळासोबत चालणारा माणूसच पुढे जातो. कोणत्याही उद्योगाचा पाया हा त्याच्या प्रक्रीयेचा असतो.इंडस्ट्री 4.0 मधील आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करणे आवश्यक आहे.यामधील आय.ओ.तंत्रज्ञान फार महत्वाचे आहे.फौंड्रीमध्ये सर्वात जास्त गरज ही उत्पादकतेच्या देखभालीची आहे.4.0 चा उपयोग करून उत्पादकता नाकारण्याचे प्रमाण कमी करणे अथवा थांबवणे शक्य आहेे.

सध्या, जगामध्ये सेमीकंडेक्टर निर्मितीची स्पर्धा निर्माण झालेली आहे.त्यानंतर, पुढे ऊर्जा निर्मितीकडे संपूर्ण जग वळणार आहे.जो पर्यंत आपल्याकडे ऊर्जा साक्षरता येत नाही तो पर्यंत आपण दीर्घकाळ टिकून राहू शकत नाही.साखर कारखाने आणि फौंड्री उद्योग एकत्र येवून मोठया प्रमाणात ऊर्जा निर्मिती करणे शक्य आहे.कमी दरामध्ये उपलब्ध होणाऱ्या ऊर्जेमुळे निश्चित प्रगती साध्य होते.  पाचव्या औद्योगिक क्रंातीमध्ये चांगल्या जीवन पध्दतीसाठी सुशिक्षित लोकांचे होणारे स्थलांतर थांबवणे अत्यंत आवश्यक आहे.ज्ञानाचे अभिसरण थांबलेले आहे त्यामुळे संवाद घडविणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी ज्ञानाची निर्मिती करून पुढच्या पिढीकडे सोपविले पाहिजे. फक्त संपत्ती उपभोगण्यासाठी उद्योजक होता समाजपयोगी उद्योजक व्हावे. कोल्हापूर ही काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची भूमी आहे.

फौंड्रीबाबत सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी अद्यावत पुस्तके उपलब्ध होणे फार महत्वाचे आहे.हा फौंड्री उद्योग 100 वर्षे पुढे घेवून जाण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार होणे आवश्यक आहे.एकेकाळी हा उद्योग प्रचंड अडचणीत आला होता.राजकोट, कोर्‌इंबतूर, कोलकत्ता, लुधियाना, दिल्ली या ठिकाणी क्लस्टर निर्माण झालेले आहे.कोल्हापूरमधील फौंड्री उद्योगाची आजही ओळख ही प्रामाणिकपणाची आहे.अद्वितीय विक्री विधान (युएसपी) कसा वाढू शकतो यावर नवीन तरूण उद्योजकांनी काम करण्याची गरज आहे.उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणूस फार कमी प्रमाणात आहे.

            जग हे आपल्या कृतीतून बदलत असते. कृती ही आपल्या एकीकरणाची असली पाहिजे. संघर्ष करून सातत्याने पुढे मार्गक्रमण करत छत्रपती बनलेल्या शिवाजी महाराजांकडे फार मोठी दूरदृष्टी होती. ज्याकाळात समुद्र पार करण्यास बंदी होती त्याकाळात त्यांनी आरमार बांधले.राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे देशातील लोकशाहीच्या प्रगतीचा पाया घातला गेला.1850 साली कोल्हापूरमध्ये वाचनालय होते.पुढच्या शंभर वर्षांमध्ये ते टिकविणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. कारण, वचान प्रगल्भतेमुळे विचारांची आदान-प्रदान आणि माहितीची देवाण-घेवाण करणे सहज शक्य होते.कोल्हापूरच्या अर्थकारणाला फौंड्री उद्योगाने खऱ्या अर्थाने गती दिलेली आहे.

            प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, फौंड्री उद्योगामध्ये काम करणाऱ्यांसाठी पी.जी.डिप्लामो इन फौंड्री हा सर्टिफिकेट कोर्स विद्यापीठाने सुरू केलेला आहे.यामुळे फौंड्री उद्योगास कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी सोयीचे होईल.  संवाद, सामाजिक, सॉफ्टवेअर, व्यवसाय या कौशल्यांचा आंतर्भाव या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे.  यामुळे मोठयाप्रमाणात रोजगार निर्मिती होवू शकते.

            विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले, उद्योग निर्मितीला मोठया प्रमाणात चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्रातील आणि विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्ती एकत्र येवून काम करणे आवश्यक आहे.  विद्यापीठामध्ये उद्योग कॉम्प्लेक्स उभे करण्याचा मानस आहे.  उद्योग कॉम्प्लेक्स विकासाचे केंद्र म्हणून पुढे येण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.देशामध्ये फौंड्री उद्योग फार मोठयाप्रमाणात काम करीत आहे.याचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

            उद्योजक एम.बी.शेख यांनी फौंड्री तंत्रज्ञान पदवीका अभ्यासक्रमाची माहिती दिली. विद्यापीठ उद्योग कक्षाचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत केले.आयआयएफ कोल्हापूरचे अध्यक्ष महेश दाते यांनी प्रास्ताविक केले.सचिव मिलिंद बिरादार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. खजीनदार राहूल पाटील यांनी आभार मानले.

            याप्रसंगी, डॉ.पी.डी.राऊत, डॉ.डी.टी.गायकवाड, डॉ.प्रकाश गायकवाड, डॉ.तानाजी चौगुले, डॉ. सचिन पन्हाळकर, गजानन कडूकर, डॉ.सुभाष माने यांचेसह विद्यार्थी, शिक्षक, प्रमुख उद्योजक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

------

No comments:

Post a Comment