Saturday 5 August 2023

शिवाजी विद्यापीठात ‘बेटी बचाओ अभियाना’तर्फे शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन

संशोधकांसह धोरणकर्त्यांसाठी पथदर्शक: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठात 'बेटी बचाओ अभियानां'तर्गत शोधनिबंध संग्रह ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. भारती पाटील आदी.


कोल्हापूर, दि. ५ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानांतर्गत प्रकाशित करण्यात आलेला शोधनिबंधांचा संग्रह देशभरातील संशोधकांसह धोरणकर्त्यांसाठी पथदर्शक स्वरुपाचा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानातर्फे गर्ल चाइल्ड इन महाराष्ट्र: इश्यूज् अँन्ड प्रॉस्पेक्टस या विषयावर राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतीलही संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले होते. या शोधनिबंधांचे विद्यापीठातर्फे ग्रंथरुपात एकत्रित संकलन करण्यात आले.डॉ. प्रतिभा पवार यांनी संपादित केलेल्या या ग्रंथाचे आज कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अनेक परिसंवाद होत असतात, मात्र त्यांचे अशा पद्धतीने उपयुक्त दस्तावेजीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातील निरीक्षणे आणि निष्कर्षांचा लाभ धोरणकर्त्यांच्या माध्यमातून समाजाला करवून देता येणे त्यामुळे शक्य होते. बेटी बचाओ अभियान हा आंतरविद्याशाखीय उपक्रम आहे. त्या माध्यमातून विद्यापीठासह महाविद्यालयीन स्तरावर होत असलेले जनजागृतीचे कार्य कौतुकास्पद आहे. महाविद्यालयांनी या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांसमवेत जनजागृतीचे कार्य करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थिनींच्या गुणवत्तावाढीचा दर आणि उच्चशिक्षणाच्या प्रवाहातील प्रवेशाचा दर वाढत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचा घटता दर ही सुद्धा सामाजिक चिंतेची बाब आहे. त्या दिशेनेही आता चिकित्सक संशोधनाची गरज निर्माण झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ४७५ पृष्ठांच्या या ग्रंथामध्ये एकूण ४४ शोधनिबंध आहेत. त्यातील २६ इंग्रजी आहेत. त्यामुळे हा ग्रंथ केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील संशोधकांसाठी एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरणार आहे. सद्यस्थितीत राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांतील स्त्री-पुरूष प्रमाणाचा आढावा घेऊन अभियानाच्या पुढील संशोधनाची व जनजागृतीची दिशा ठरवावी लागेल.

यावेळी शारदाबाई पवार अध्यासनाच्या संचालक डॉ. भारती पाटील आणि समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रतिभा देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर योजना पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. जगन कराडे, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. मीना पोतदार यांच्यासह विविध अधिविभाग व महाविद्यालयांतील अभियान समन्वयक, शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment