Thursday, 7 September 2023

भारत-जपान यांच्यात विविध क्षेत्रांत सहकार्यवृद्धी आवश्यक: प्रा. योशिरो अझुमा

भारतीय विद्यार्थ्यांचे गणितीय आकलन व कष्टाळू वृत्तीचे केले कौतुक


शिवाजी विद्यापीठात खुले व्याख्यान देताना टोक्यो (जपान) येथील सोफिया विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधक प्रा. योशिरो अझुमा.


कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर: बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भारत आणि जपान यांनी शिक्षण, संशोधनासह विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्यवृद्धी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जपानच्या टोक्यो येथील सोफिया विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधक प्रा. योशिरो अझुमा यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित १३व्या भारत-जपान विज्ञान व तंत्रज्ञान कॉन्क्लेव्हअंतर्गत आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी प्रा. अझुमा यांचे जपान आणि भारतामधील वैज्ञानिक संशोधनाची संस्कृती व शिक्षण: आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन व समकालीन संधीया विषयावर खुले व्याख्यान झाले. वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्रा. अझुमा म्हणाले, जपान आणि भारत यांची सद्यस्थिती बरीचशी परस्परपूरक स्वरुपाची आहे. दोन्ही देशांमध्ये संधींचे अवकाश अत्यंत व्यापक आहे. मनुष्यबळाच्या बाबतीत जपान तोकडा पडतो. भारत मात्र मनुष्यबळाच्या बाबतीत अत्यंत समृद्ध आहे. येथील शिक्षण, संशोधनाचा त्याचप्रमाणे सोयीसुविधांचा दर्जाही वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमध्ये शिक्षक, संशोधक, विद्यार्थी यांनी परस्परांच्या देशांमधील उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठी सुसज्ज व्हावे. खरे तर, भारताला जपानची जितकी गरज आहे, त्याहूनही अधिक जपानला भारताची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रा. अझुमा यांनी भारतीय विद्यार्थ्यांमधील क्षमतांचेही काटेकोर मूल्यमापन या प्रसंगी केले. ते म्हणाले, आयआयटी दिल्ली तसेच इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर येथील प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून भारतीय विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने अनेक बाबींचे निरीक्षण करून निष्कर्ष काढता आले. त्यामध्ये भारतीय विद्यार्थी हे अत्यंत कष्टाळू, प्रचंड स्पर्धात्मक आणि लक्ष्यकेंद्री आहेत. शंभर टक्के गांभीर्याने ते आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. त्यांची गणितीय आकलनाची क्षमता हा त्यांचा सर्वाधिक महत्त्वाचा गुणविशेष आहे. या गणितीय क्षमतांच्या बळावर ते जागतिक स्तरावर वेगळे उठून दिसतात. विद्यार्थिनींचे विज्ञान शिक्षण व संशोधनातील प्रमाण लक्षणीय आहे. अगदी इस्लामिक विद्यार्थिनींचेही प्रमाण नोंद घेण्यासारखे आहे. संशोधकीय लवचिकता हा गुणही महत्त्वाचा आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करून, प्रसंगी वाट्टेल तो जुगाड करून आपल्याला हवे ते निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करतात. हे अन्यत्र दिसत नाही. भारतात मुबलक विविधता असून शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या बाबतीत मात्र काहीशी पिछेहाट दिसून येते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

प्रा. अझुमा यांनी जपानच्या जागतिक पराङ्मुखतेपासून ते आधुनिकीकरणाच्या स्वीकारापर्यंतचा प्रवास उपस्थितांना उलगडून सांगितला. पाश्चात्य वसाहतवादापासून दूर राहात पाश्चात्यीकरण म्हणजे आधुनिकीकरण या संकल्पनेपासून स्वतःला दूर ठेवण्यात यशस्वी झाल्याने जपानचा आधुनिकीकरणाकडचा प्रवास गतीने झाला. त्यात जपानच्या भौगोलिक स्थानाची भूमिकाही महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून कार्यक्रमास प्रारंभ झाला. परिषदेचे समन्वयक डॉ. एस.बी. सादळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. कविता ओझा यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment