Friday, 8 September 2023

भारतातून शिकून परतताना ‘भारतीयत्व’ सोबत न्या

 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे आवाहन

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठात प्रविष्ट झालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठात प्रविष्ट झालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसमवेत परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी.


कोल्हापूर, दि. ८ सप्टेंबर: भारतातून शिकून परतताना थोडासा भारत आणि भारतीयत्व आपल्यासोबत मायदेशी घेऊन जा, असे आवाहन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज येथे शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना केले.

शिवाजी विद्यापीठात १३व्या भारत-जपान विज्ञान व तंत्रज्ञान कॉन्क्लेव्हअंतर्गत आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटक म्हणून डॉ. सहस्रबुद्धे शिवाजी विद्यापीठात आले होते. उद्घाटन सत्रानंतर त्यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांना प्रविष्ट झालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी-विद्यार्थिनींशी आवर्जून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, भारत हा अत्यंत सहिष्णू वृत्तीचा देश असून प्रेमळ व शांतिप्रिय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी येथून परतताना हा भारत कायमस्वरुपी आपल्या हृदयात जपून ठेवावा, असेही सांगितले.

डॉ. सहस्रबुद्धे यांनी भारतामधील विद्यापीठात प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणींविषयी तसेच त्या निराकरण करण्यासाठी काय करता येईल, याविषयी विद्यार्थ्यांना बोलते केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असलेल्या विद्यापीठात शिकण्याची संधी लाभली, याबद्दल आपण विद्यार्थी भाग्यवान असल्याचे सांगून डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी तसेच महाराष्ट्र व भारताच्या इतिहासाविषयी सर्व विद्यार्थ्यांनी निश्चितपणे जाणून घेण्यास प्राधान्य द्यावे. विद्यापीठाच्या ग्रंथालयात महाराजांविषयी अनेक इंग्रजी ग्रंथ आहेत, त्यांचे वाचन करून महाराजांच्या कार्यकर्तृत्वाविषयी त्यांनी आपल्या देशबांधवांनाही अवगत करावे. पुढील पिढीच्या विद्यार्थ्यांनाही भारतात शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाचा परिसर अतिशय आल्हाददायक व अभ्यासाला पोषक असल्याचे सांगितले. कोल्हापूरचे लोक अत्यंत प्रेमळ व सहकार्यशील असून येथील मसालेदार खाद्यसंस्कृती अतिशय लज्जतदार असल्याचेही सांगितले.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, आंतरराष्ट्रीय कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी सादळे, डॉ. जे.बी. यादव, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, संजय परमणे आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment